Happening City,  Marathi City

समाजात अडकलेली मासिक पाळी!

सर्वेक्षणातून काही प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न जेव्हा केला. खरे तर वास्तव किती वेगळे आहे ते जाणवले. कारण पौगंडावस्थेतील मुली आणि स्त्रियांना मासिक पाळीशी संबंधित सामाजिक, सांस्कृतिक आणि टॅबू पद्धतीबद्दल विचारले तेव्हा त्या लाजल्या, निशब्द झाल्या. त्यांचे म्हणणे असते कि, आम्ही केवळ घरचे म्हटले तसच करत आलो, याआधी यावर कधीच त्या बोलल्या नव्हत्या.

या अंधश्रद्धामध्ये घरच्यांनी त्यांना, धार्मिक प्रथा, धार्मिक स्थळांपासून दूर राहणे, औषधे न खाणे, नवीन कपडे न घालणे, लोणच्याला स्पर्श न करणे, काजळ न लावणे, अतिथींचे आदरातिथ्य न करणे, अन्न न शिजवणे या आणि अशा इतर गोष्टींपासून दूर राहण्यास पाळीच्या पहिल्या दिवसापासून सांगितले गेले.

झोपडपट्टीतील मुलींमधील मासिक पाळी आलेल्या मुलींमध्ये सामान्यतः गैरसमज आहे कि या दिवसांत अंघोळ केल्यास रक्तप्रवाह अधिक प्रमाणात होतो. तसेच काही कुटुंबांमध्ये केसांवरून पाणी घेण्यास कठोरपणे बंदी आहे, कारण गर्भधारणेच्या काळात प्रसूतीदरम्यान यामुळे धोका उद्भवतो असा समज आहे. त्याचबरोबर काही कुटुंबांमध्ये, प्रत्येक वेळी मासिक पाळीच्यावेळी शौचालयास गेल्यानंतर तिला तिचे हात मातीने धुवावे लागत असे, त्यानंतरच ती शुद्ध मानली जाते.

 थोडक्यात, या काही अंधश्रद्धा आहेत, ज्या किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीची भीती निर्माण करतात. या टॅबूमुळे या रूढी अजूनही प्रचलित आहेत. त्या भीतीदायक पद्धतीने मांडल्या जात असल्यामुळे स्त्रीयांच्या शरिरावर जीवघेणे परिणाम होत आहे आणि ‘ मासिक पाळीला’ सामाजिक दृष्टिकोनातून क्षुल्लक समजून दुर्लक्षित केल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने, मासिक पाळीबाबत अज्ञान वाढतच चालले आहे. 

शहरी, ग्रामीण, आदिवासी आणि दिव्यांग पातळीवरील मासिक पाळीचे स्वरूप हे सर्वेक्षणानुसार आधारे मांडले आहे ते पाहूया;

शहरी भागात :

प्राचीन काळापासून आपल्याकडे मासिक पाळीचा धर्म आईकडून मुलीला शिकवला जातो. पण आजच्या धकाधकीच्या शहरी स्पर्धेच्या युगात, आई ही सुद्धा मूलभूत ज्ञानापेक्षा जाहिरातीच्या गर्तेत अडकलेली दिसून येते. मुलीजवळ आईच्या आधीच टीव्हीवरील भडक व बीभत्स जाहिराती येऊन पोहचतात. या जाहिरातींत दाखवल्या जाणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्सवरून मुलींना हा काळ वरवरचा आणि सहज वाटतो, पण अनुभव येताच मात्र त्यांची चिडचिड व्हायला लागते. तेव्हा त्यांची सर्वांत जवळची मैत्रीण ही आई असते. मात्र या दिवसांत शारीरिक व मानसिक स्तरावर होत असलेल्या बदलांमुळे स्त्रियांना ताण येतो. त्याचा साहजिकच परिणाम या चार दिवसांकडे दुर्लक्ष करण्याकडे होतो. यातूनच जंतूसंसर्गापासून ते कर्करोगापर्यंतच्या आजारांना निमंत्रण मिळते. मासिक पाळीबद्दल अंधश्रद्धा फक्त ग्रामीण भागापुरती मर्यादित नाही, तर शहरी भागातही तितक्याच प्रमाणात त्याचा प्रभाव अजूनही आहे. परंतु बऱ्याच घरांत जुनी पिढी होती तोपर्यंत बाजूला बसणं, घरात कोणत्याही वस्तूला हात न लावणे, काही हवं असल्यास मागून घ्यायचे त्यासाठी दुसर्यावर अवलबूंन राहावे लागायचे. आधुनिक पिढीत हे स्वरूप बदलून फक्त घरात देवासंबधी कार्यक्रम असेल तर बाजूला बसविले जाते.

सॅनिटरी पॅड्स तुमचा जीवही घेऊ शकतात…

होय, कारण शहरी भागात ज्या स्त्रिया नोकरीवर जाणाऱ्या आहेत त्या चौथ्या दिवशी सॅनिटरी पॅड्स सहा तासाहून अधिक वेळ ठेवतात. सॅनिटरी पॅड्स योनीच्या ठिकाणी अधिक वेळ ठेवल्यामुळे त्यातील प्लास्टिक आणि इतर सामग्री म्हणजेच सोडियम ऍक्रिलेट, पोटॅशियम ऍक्रिलेट, अल्किल ऍक्रिलेट हे योनीच्या भागास घातक असतात. यामुळे संसर्ग होऊन गर्भास धोका आणि तो त्रास न कळल्यामुळे जीव जाण्याचा धोका असतो.

ग्रामीण भागात :

जास्तीत जास्त मुलींनी शाळेत जावे यासाठी राज्य पातळीवर प्रयत्न होऊ लागले. पण या प्रयत्नांनंतरही मुलींचे घरी राहण्याचे प्रमाण वाढत होते. बऱ्याच पाचवी सहावीच्या मुली मोठ्या संख्येने शाळा सोडू लागल्या होत्या. याचे कारण शोधले असता लक्षात आले कि, मुलींच्या पहिल्या मासिक पाळीत उद्भवणाऱ्या अनेक समस्या आणि नव्या अनुभवांना त्यांना तोंड द्यावे लागत होते.

ग्रामीण भागात तर मासिक पाळी हि एक समस्या वाटते आणि त्यांना या समस्येबद्दल काहीही माहिती नसते. ९-१२ वयातील मुलींसाठी तर हि मासिक पाळी एक त्रासदायक अनुभव असतो, जो समाजाने निषिद्ध मानल्यामुळे व मर्यादा घातल्यामुळे अव्यक्तच राहतो आणि परिणामी, माहिती संदर्भात ग्रामीण भागातील प्रत्येक घटक हा प्रचंड ‘माहितीशून्य’ आहे.

ग्रामीण भागातील स्त्रियांची स्थिती भयानक आहे. कारण गैरसमजुती, कर्मकांड, अज्ञान; इतकंच नव्हे तर सर्वांत मोठी अडचण आहे आर्थिक अडचणीची! हातावर पोट घेऊन जगणाऱ्या कुटुंबांकडून स्त्रियांच्या मासिक पाळीसाठी महिना २०० ते ३०० रुपये खर्च उचलणं ही अशक्य गोष्ट असते. अशा वेळेस कितीही नवं तंत्रज्ञान समोर असलं तरी ग्रामीण व मध्यमवर्गीय कुटुंबं ही पूर्वीपासून चालत आलेल्या कालबाह्य साधनांचाच उपयोग करतात. यामध्ये सुती वा सिंथेटिक कपडा, वर्तमानपत्रं, वाळूच्या पिशव्या, पॉलिथिन बॅग्ज इ. मासिक पाळीमध्ये केवळ सॅनिटरी नॅपकिन्सच वापरावीत असंही नाही. सुती कपडाही वापरता येऊ शकतो. पण या कपड्याची स्वच्छता ठेवणंही ग्रामीण स्त्रियांना शक्य होत नाही. त्यातून खाज येणं, जंतुसंसर्ग होणं, पांढरं पाणी जाणं यांसारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे केवळ स्त्रियांचंच आरोग्य धोक्यात येतं असं नाही, तर संपूर्ण सामाजिक आरोग्य धोक्यात येतं, हे आपण आजही समजून घेत नाही.

ग्रामीण भागातील प्रमुख चिंता ही ‘स्वच्छता’ आहे. स्वच्छता न पाळण्यामागे प्रमुख कारण म्हणजे मासिक पाळीचा आजवर जपला गेलेला टॅबू! हा टॅबू गुप्तपणे आजही एखाद्या गुप्तरोगासारखा लपून ठेवला जात आहे. मासिक पाळीत महत्त्वाचं म्हणजे कापड वापरण्याचे प्रमाण अधिक आहे. तरीही त्यात वाढ म्हणजे मासिक पाळीत वापरलेले कापड हे एकत्र कुटुंबपद्धतीमुळे ते कापड मोरीत वाळत घातले जाते. त्यामुळे दमटपणा राहून कपड्याचा दुर्गंध येतो, आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो. महागडे सॅनिटरी नॅपकिन्स ग्रामीण स्त्रिया वापरू शकत नाहीत. यावर अनेक सामाजिक संस्था व आरोग्य संघटनांनी आवाज उठवला. तेव्हा सरकारी संस्था पुढे आल्या. पण या संस्थांकडून कमी दरात जे नॅपकिन्स पुरवले गेले ते अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने स्त्रियांना जंतुसंसर्गाला समोरं जावं लागलं.

ग्रामीण स्त्रियांच्या आरोग्य रक्षणासाठी महागडे डॉक्टर्स व खर्चिक तंत्रज्ञानही लागत नाही. लोकजागृती करून स्त्रियांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं एवढंच गरजेचं असतं. ‘लाख मेले तरी चालतील पण लाखाच्या पोशिंद्याला आपण वाचवलंच पाहिजे’, असं आपण म्हणतो, पण स्त्रियांकडे पोशिंदा म्हणून पाहण्याची दृष्टी जोपर्यंत तयार होत नाही, तोपर्यंत पुरुषी मानसिकतेतून तिच्या आरोग्याची हेळसांड होतच राहील.

आदिवासी भागात:

आदिवासी भागात बऱ्यापैकी भागात कापड वापरले जाते. परंतु काही ठिकाणी तांदूळ काढल्यानंतर त्याचे काड असतात किंवा मक्याचे आवरण वापरले जाते.

मक्याच्या कणसाचे आवरण पॅडच्या रचनेनुसार करून, त्याच्या आत राख किंवा माती किंवा गहू तांदळाचे खोड/ काड याचा भुगा करून वापरले जातात. हे पर्याय सुरुवातीला योनीच्या ठिकाणी टोचतात, परंतु याशिवाय गत्यंतर नाही हे कळल्यानंतर तेथील स्त्रिया याचा स्वीकार करून हळूहळू याची सवय करून घेतात.

एकूणच आदिवासी राहानिमाणावरून निरीक्षणाअंती लक्षात येते कि, हे लोक गहू, ज्वारी खात नाही. त्यामुळे पोषक आहार त्यांना मिळत नाही ज्यामुळे कुपोषणाचे प्रमाण अधिक आहेच. परंतु महिल्यांच्या बाबतीत सकस आहार नसल्यामुळे मासिक पाळीच्यावेळी ब्लीडींगचे प्रमाण कमी आहे. त्याचबरोबर हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळते आणि अंगावरून पांढर जाणे हे तीन मुख्य तोटे समोर येतात. पण त्याचबरोबर आदिवासी स्त्रिया काटक असल्यामुळे त्यांना त्रास होतो पण त्रास जाणवत नाही.

आदिवासी अंधश्रद्धा:

आदिवासी क्षेत्रात प्रत्येक भागात अंधश्रद्धा आहे. याचे उदाहरण समोर ठेऊन गडचिरोलीसारख्या आदिवासी भागाचा अभ्यास केल्यानंतर समोर येते कि, आदिवासी भागांत मासिक पाळीतील या आठ दिवसांसाठी स्त्रियांकरिता विशिष्ट घर असते त्याला ‘कूर्माघर’ संबोधले जाते. या घरात पाळी आलेल्या स्त्रियांना ७ दिवस ठेवले जाते, ते वैयक्तिकही असते आणि सार्वजनिकही असते. कूर्माघर म्हणजे एक सहा बाय सहाची खोली असते, ज्यात जेमतेम महिला झोपू शकतील एवढी जागा असते. त्यातच त्यांनी खायचं, प्यायचं, बादलीभर पाणी साठून ठेवायचं, त्यातच आठ दिवस पाळीतील कापडही धुवायची आणि या घराचा मूळ हेतू म्हणजे या दिवसांत तिने बाहेर यायचेच नाही, तिची सावलीही पडू द्यायची नाही. सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले तर या काळात स्त्रियांना विश्रांतीची गरज असते म्हणून हि कल्पना योग्य जरी समजली तरी घटितांनुसार तेथील सगळी घरे हि बांबूची असतात. त्यामुळे तिथे राहणे सोयीस्कर नसते. जागा छोटी असल्यामुळे योग्य ती स्वच्छता राखली जात नाही. त्यामुळे मानसिक शारीरिक त्रास होत असतो. याचे उदाहरण म्हणजे गडचिरोलीत जयंतीचा अधिक रक्तदाबाने झालेला मृत्यू, ते झाल्यांनतर सात दिवसांनी कळलं.

पश्चिम महाराष्ट्रात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे तीन चार माणसांच्या कुटुंबात एकाच स्त्री असते, अशा भागात ती महिला स्वतःउन येऊन गर्भाशयाची पिशवी काढून टाकते. कारण पाळी आल्यामुळे स्वयंपाक कोण करणार यामुळे ते काढली जाते. आणि याबाबात डोक्टर काही सांगत नाही कारण त्यांचा व्यवसाय त्यावर चालतो.

दिव्यांगांची मासिक पाळी

मी, तुम्ही, सरकार आणि फारफारतर स्वयंसेवी संस्था या मासिक पाळी म्हटल्यानंतर कुठपर्यंतचा विचार करतील तर, ग्रामीण, शहरी आणि त्यातच थोडा वेगळेपणा म्हणून आदिवासी स्त्रियांचा. त्यात वेगवेगळे प्रयोगही करतील किंबहुना आजही होत आहेत. पण मग या वर्गवारीत सगळ्याच स्त्रिया समाविष्ट होतात का ? दिव्यांग मुली या स्त्रिया नाहीत का ? त्यांना मासिक पाळी चुकली आहे का?

याचा विचार करून जेव्हा अशा मुलांची शारीरिक मानसिक स्थिती पडताळून, जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा सगळा गोंधळच उडाला कारण सर्वसाधारण धडधाकट मुलीलाही पाळी आल्यानंतर गोंधळून जातात. दिव्यांग मुली तर मानसिकरीत्या स्वतःतच हरवलेल्या असतात. मग अशावेळी अभ्यासातून असे लक्षात आले कि, सर्वधारणपणे या मुलींचेही पोट, पाठदुखी सुरु होते. परंतु त्यांच्या त्यांच्यातील दिव्यांगांनुसार पाळीतील रक्तप्रवाहाचे प्रमाण निश्चित होते.

पहिली गोष्ट दिव्यांगांची मासिक पाळी वेगळी नसते. परंतु दिव्यांग स्त्रियांची पाळी हि पालकांची जबाबदारी ठरते.

दिव्यांगांचेही पोट दुखते, पायाला गोळे येतात, चिडचिड होते. यात सगळ्यात आव्हानात्मक म्हणजे मतिमंद मुलींना आलेली मासिक पाळी. कारण त्यांची इंद्रिये योग्य तो प्रतिसाद देत नसल्यामुळे नेमके रक्त का वाहते हे समजत नाही.

पहिली मासिक पाळी येते तेव्हा मानसिक आणि शारीरिक रित्या असा अनुभव असतो की, ते त्यांच्या जेवणावर, पाणी पिण्यावर नियंत्रण ठेवतात. कारण त्यामुळे शौचास जाणे, लघवीला जाणे टाळले जावे. कारण दिव्यांगाचे त्यांच्या शरीरावर नियंत्रण नसते. त्यामुळे जेव्हा अशा मुलींना पहिली पाळी येते तेव्हा त्यांना कळत नाही. घरच्यांनी याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. तरीही सुरुवातीला त्यांचेही रक्त येते. सुरुवातीला काही प्रमाणात रक्ताच्या गाठी पडतात.

परंतु पालक किंवा संस्था अशा मतिमंद मुलींची गर्भाशयाची पिशवी काढण्यास प्राधान्य देतात. जेणेकरून संस्थेकडून शारीरिक शोषण होऊ नये आणि पुढे जाऊन तिला गर्भधारणा करावी लागू नये म्हणून, ही पिशवी काढणे योग्य ठरते.

सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर दिव्यांगांसाठी फायद्याचा ठरतो कारण सॅनिटरी नॅपकिन्स हे एकाजागी चीटकते. त्यामुळे त्यांच्या हालचाली करताना अडचणी येत नाही.

दिव्यांगासाठी जनजागृतीचा भाग म्हणजे, दिव्यांगांसाठी त्यांच्या त्यांच्या शारीरिक आकारानुरुप कस्टम पॅड बनविले जावे. यात प्रसार माध्यमे ही मागे आहेच परंतु समाज माध्यमांनी या लोकांना दिलासा दिला आहे कारण या व्यासपीठावरून कमी प्रमाणात का होईना पण लिहिले जात आहे.

(क्रमश: ) 

Please follow and like us:
error

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *