काहीजण त्यांच्या दैनंदिन आयुष्यातून बाहेर पडायला खूप घाबरतात. ते मुद्दाम नाही, पण नकळत्या वयात सगळच कोणाच्या तरी सांगण्यावरून केलेलं असल्यामुळे असं होणं स्वाभाविक आहे. एक काळ होता जेव्हा मी नवीन हेअरस्टाईल करून बाहेर जायला घाबरायचे. जीन्स टॉप शिवाय काही घातले तर आपण जगावेगळं दिसू हा न्यूनगंड होता आणि ते दिसणं खराबच असणार आहे हा कुठल्या जगातून आणलेला ओव्हर कॉन्फिडन्स होता देव जाणे! त्यामुळे मी जे जसं आहे तसच ठेवायचे. असही मुलगी असल्यामुळे आई, मावशी, मामी, आजीने हातांना सवय लावलेली, घेतलेली वस्तू आहे त्या जागीच ठेवायची. पण या सवयीमुळे त्या मला शिस्त लावत असल्या तरी त्याची दुसरी बाजू म्हणजे ती गोष्ट दुसरं कुठेतरी लाजवाब दिसेल ही शक्यताच माझ्या मनातून पुसली गेली. म्हणजेच प्रयोग करून पाहण्याचं स्किल मी दुर्लक्षित केलं.
या अशा वागण्याचा नेमकं काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचं उत्तर आहे, गेल्या काही दिवसांपासून मी निरीक्षण करतेय की या छोट्या छोट्या बंधनांची जागा मोठं झाल्यावर माणसाच्या आयुष्यात खूप मोठी होते. हे दैनंदिन आयुष्यातून बाहेर पडू न शकणारी माणसं खूप तेच ते आयुष्य जगतात. सकाळी उठून, कामाला जाऊन, काम करून, जेवून, चहा पिऊन पुन्हा घरीच येतात. रस्त्यात त्यांना कोणी काही सुंदर, चविष्ट विकणारा दिसला तरी ते घेत नाही. कारण आहे ते तसच केलं नाही तर काहीतरी चुकेल ही भीती! या भीतीमुळेच आजही अनेक लोकं ‘कला’ जोपासत नाही. काय माहित किती हातांमध्ये कलेचा वसा असेल पण चौकटी बाहेरचं काहीतरी ट्रायच न केल्यामुळे ते आपल्याला जमतच नाही हा गैरसमज आतल्या आर्टिस्टला मारून टाकतो आणि ठिक आहे, एखाद्याच्या हातात नसेलही कला, पण त्याने ट्राय करून पाहिलं म्हणून काही वाया गेलं का? उलट काहीतरी नवं ट्राय केलं याने डोक्याची शांती होईल. कारण वयाच्या एका टप्प्यावर लक्षात येतं की, मन:शांती सगळ्यात मोठी संपत्ती आहे!
त्यामुळे मी माझी चौकट मोडून शक्य ते सगळं ट्राय करून पाहण्याचा प्रयत्न करते. कारण माझा या आयुष्यावर, या आयुष्याच्या डिजाइनवर प्रचंड विश्वास आहे. या जगात पाहण्यासारख, अनुभवण्यासारखं खूप काही आहे. पण आपणच कोणीतरी आपल्याला गुलाम बनवून जगत असल्यासारखं जगू लागलो तर कसं वाटणारे आयुष्य सुंदर?
माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात एक हेही कळलंय की सगळ्यात अन्कफर्टेबल ठिकाणी आपल्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट घडत असते. त्यामुळे आपल्या रोजच्या कंफर्ट मधून बाहेर पडून सूर्य, तारे, निसर्ग, माणसं आणि जग पहा! या जगात अमर्याद दृष्टिकोन आहेत, जे या एकाच आयुष्याला करोडो अर्थ देणार आहेत !
-पूजा ढेरिंगे