माहेर सोडण्याचा दिवस भावनाशून्य करणारा असतो. बाईच्या मनाला कळतच नसतं नेमकं समोर हे काय घडत आहे. आतापर्यंत चित्रपट, किंवा दुसऱ्यांची मुली सासरी जाताना खूप सहज आणि प्रथेनुसार वाटतं. पण जेव्हा वयाची पंचवीस वर्षे एका वास्तूत घालवलेले असतात, कित्येकदा तिच्याशी नकळत बोललेलो असतो, काहीही न करता ती तिथे केवळ असते यातून आधाराची भिंत लाभल्याने सुखावून जात असतो, ती वास्तू आपल्या रोजच्या जगण्याचा भाग नसणार याने मनाला अस्वस्थ व्हायला होतं.
जेव्हा कपड्याची बॅग भरायचा दिवस येतो, मन दाटुन येतं. काहीच वेगळं घडत नसतं. घरात आई नेहमीची भाजी बनवत असते (पण तिचं सगळं लक्ष आपल्याकडेच असतं), बहिणी त्यांची कामं करत असतात (पण मनातून अनेक जुन्या आठवणींनी हळव्या झालेल्या असतात) मावशी काळजीने बोलत असते, विचारपूस करत राहते (इथून जाते हे जाणवू न देता) हे कंसातलं सोडून सगळ्यांचं सगळं उत्तम सुरू असतं. मी बॅग भरताना उगाच एकेक कपड्याकडे बघत राहते. एखाद्या कपड्याची घडी विस्कटते, मन मांडे खात त्याला माहेरातून सासरी जाणाऱ्या मुलीच्या आयुष्याच्या घडीशी जोडू लागते. माहेरात रोजचं असलेलं माझंच कपाट आज रिकामं होत होतं. कपडे आवरण्यासाठी नाही, कपडे दुसऱ्या घरातल्या कपाटात जाण्यासाठी. ते दुसरं घर… फक्त जागा बदलत नाही, मनाचा तोलच ३६५ अंशात बदलतो. तिथल्या जागेत कसं रहायचं हे ठरलेलं असलं तरी मनाला कोणाचाच आधार मिळत नाही. माहेर सुटतं (शरिरिरीत्या का असेना) पण त्या माझ्या हक्काच्या घराला माहेरचा टॅग देणं मला जमणार नाही. उगाच कोणाचं तरी स्थान निश्चित करायला दिलेली ही नावं असतात. पण या हक्काच्या घराला, वस्तूंना, माणसांना, सुखाला कुठलं स्थान देऊन मोकळं व्हायचं नाहीये. म्हणूनच कदाचित कपाटातले कपडे भरताना हात थरथरतात, अंग गरम होतं, कुणी बघू नाही म्हणून आवाजाची पट्टी वरची होते, आणि नकळत विनाकारण तो प्रसंग घडत असताना चिडचिड होते. त्रासदायक असतं, जागा बदलणं. नवी माणसं डोळ्यासमोर दिसणं. आताआताच्या काळात आवडीची झालेली माणसं डोळ्यासमोर दिसणार पण त्या बदल्यात जुनी, आपली माणसं दिसणार नाही. हा बदल मनाची जागा हलवणारा आहे.
कपड्यांची बॅग भरतेय पण पहिल्यांदा मुलगी असूनही कपड्यात जीव अडकला नाहीये. कुठूनतरी निघून कुठेतरी पोहोचताना जून्याला मागे टाकणं प्रत्येकाला जमत नसतं. माणसांपासून दूर जाऊ लागलो की वस्तूपेक्षा माणसं किती मौल्यवान हे जाणवू लागतं. कालकालपर्यंत बहिणींशी कपड्यांवरून भांडणारी मी आज त्यांच्यापासून काही किलोमीटरने दूर जाणार इतकी खिन्न होतेय. या भावनेला कुठल्या कुपीत बंद करून ठेवू कळत नाहीये. कारण ती शेअर करून सार्वजनिक करायची नाही, पण दाटलेले मन पाठ सोडत नाही. त्यावेळी फक्त मनाला एवढंच कळतं माणूस माणसाचा आणि माणसाच्या प्रेमाचा भुकेला असतो.
Please follow and like us:
2 thoughts on “लग्न सिरिज…”
Sagar Sathe
खुप खुप छान … अगदीं सुरेख वर्णन…आणि मझ पण असच काही होत ..जेव्हा जॉब साठी घर सोडलं होत …अजून पण डोळ्यातून पाणी येत आठवण आली की
खुप खुप छान … अगदीं सुरेख वर्णन…आणि मझ पण असच काही होत ..जेव्हा जॉब साठी घर सोडलं होत …अजून पण डोळ्यातून पाणी येत आठवण आली की
खूप सुंदर कसलं भारी लिहिलय.. शब्द अगदी मनाला स्पर्श करून जातात..❤️💯