९६; तुमची प्रेमकथा!

  • by

मनोरंजन हे चित्रपटाचं अस्तित्व आहे. त्याला सामाजिक, वास्तविक, भावनिक आणि काल्पनिक जोड दिली की पूर्णत्व येतं. हा प्रत्येक फॅक्टर प्रादेशिक भाषा किंवा बॉलीवुड सिनेमे या दोन्हींमध्ये नाहीच बघायला मिळत. यापैकी वर्षातून एखादा चित्रपट मनात आणि इतर अवार्ड्ससाठी हृदयात घर करतो. याव्यतिरिक्त वर्षाला हजाराच्या घरात फिल्म्स प्रोड्युस होतात, त्यातील काही चित्रपट संवेदनशील सामाजिक विषयांना टच करून येण्याचा लांबलचक प्रयत्न करतात, एखादं वर्ष ऐतिहासिक नाट्यमय चित्रपटांचं असतं, काही चित्रपट एखादी गंभीर भूमिका मांडून प्रेमाचा अँगल ट्रँगल दाखवून बळच अंग प्रदर्शन दाखवून, एखादं तन मन धनचं गाणं ऍड करून चित्रपटांचे पोस्टमोर्टम करतात. ऑब्व्हियसली चित्रपट बनवणे म्हणजे एका दिवसाचे काम नाहीच त्यामागील प्रत्येक कामाचे महत्व जाणून आहे, त्यामुळे वाटते प्रत्येक सिनेमानंतर प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रतिसादावरून सेल्फ अनॅलिसिसची आपल्या चित्रपट सृष्टीला गरज आहे. कारण वरील सगळे फॅक्टर्स म्हणजे सिनेमा नाही.

कथा हा सिनेमाचा आत्मा असतो आणि कथेचा स्क्रीन प्ले म्हणजेच कॅमेरातून रंगवलेली ती कथा पडद्यावर आणणे, हा तीन तासांचा रिजल्ट असतो. या मेजर दोन्ही गोष्टींमुळे मी दाक्षिणात्य चित्रपटांच्या प्रेमातच आहे. कारण ते चित्रपट स्वतःतच पूर्ण असतात. मूळ कथा, कथेला साजेशी भावना, भावनेला न्याय देणारी पात्र, कथेभोवती फिरणारी हेल्दी कॉमेडी, प्रेमाचं महत्व, गुंडगिरी याची तंतोतंत सांगड आणि या सगळ्यातून व्यक्त होताना आपल्या सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर नकळत नैतिक मूल्य बिंबवणेे हे हित साधले जाणे. त्यातून लोकांचे मनोरंजन तर होतेच पण हे मनोरंजन सर्वोच्च दर्जाचे असते. गेल्या कित्येक वर्षात बॉलिवूडमध्ये किंवा मराठी चित्रपटात हेल्दी आणि नॅचरल कॉमेडी नावाचा प्रकारच पाहायला मिळाला नाही. सतत गोलमाल-३ पर्यंतच्या सिरीज, पागलपंती, ती अँड ती हे नाही वर्क होत. त्यात अधिक मस्तीचा फॅक्टर म्हणून सेक्स विषयाशी खेळणारे मस्तीझादे, क्या कुल हैं हम, पती पत्नी और वो, टकाटक, शिकारी” हे केविलवाणे प्रयत्न… कुठल्याच क्षेत्राचे कष्ट कमी नसतात, पण तोच तोचपणा येऊ लागला कि सिनेमासारख्या मजेशीर चिल गोष्टीतून रिलॅक्स होणे हि फिलिंग कमी होत जाते.

याबाबतीत साऊथचे चित्रपट आजही घमासान खोटी खोटी फायटिंग करतात, इकडच्या घरातून चष्मा उडवला कि डायरेक्ट दुसऱ्या घरात हिरोच्या डोळ्यावर बसतो, हिरोईन म्हणून आजही त्याच घागरा चोलीला जोडलेल्या ओढणीतून बाहेर डोकावणारी सुंदर ललना असते, हिरो मात्र इतका सामान्य असूनही असामान्य वाटत राहतो, खलनायकाचा तर जवाबच नसतो हिरोपेक्षाही तिकडचे खलनायक अधिक आकर्षक आणि पिळदार असतात, त्यामुळे हळूहळू सगळं वास्तव अवास्तव वाटू लागते.
दाक्षिणात्य सिनेमांमध्ये कुठलाच विषय ओढून ताणून मांडलेला नसतो. कारण प्रत्येक घटकाचे सादरीकरण हे बहुतांशी सर्वमान्य आणि समाजातील प्रत्येक घटकाला लक्षात घेऊन केलेले असते. त्यामुळे आपले चित्रपट म्हणजे चिंतेचा विषय असतो. दाक्षिणात्य लोक आजही चित्रपटांसाठी सुट्ट्या देऊन- घेऊन त्यातील चटपटीतपणा आणि महत्त्व कायम ठेवत आहे…

हे लिहिण्याचे कारण म्हणजे बालपण, टीनेज ही फेज संपल्यानंतर जेव्हा आयुष्याचं फ्रस्ट्रेशन काढायचं असतं तेव्हा सिनेमाकडे विरंगुळा म्हणून पाहिले जाते पण तेव्हा बॉलीवुड चित्रपट म्हणजे डोक्याचा ठोका वाढण्याची कामं… अशावेळी मी पॉप्युलर साऊथ सिनेमांची लिस्ट चाळते.
दाक्षिणात्य चित्रपटांवरील हे प्रेम आजचं नाही, पण आज हे लिहिण्याचं निमित्त म्हणजे ’96 हा चित्रपट.

‘९६ चित्रपट वेगळा आहे…
बालवयात जेव्हा प्रेम होत जातं आणि मोठे होताना ते प्रेम आपल्यापासून तोडलं जातं तेव्हा ‘प्रेम’ हे काटेरी कुंपण कसं आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला अबोल करून टाकतं या भोवती फिरणारा हा चित्रपट आहे. सॉफ्ट रोमान्स, एक रात्र, प्रचंड भावना, गप्पा, ऑक्वर्डन्स, गूढता…!
लहानपणीचं प्रेम मोठे झाल्यावर भेटणं, तेही लग्न झाल्यानंतर… काय फिलिंग असेल ?
ती फिलिंग व्यक्त करणारा ‘९६ चित्रपट आहे. नव्वदीचा जन्म असलेल्या ७० टक्के मुलांची स्थिती रामसारखी आहे. ‘तिच्या लग्नात जाऊन जेवायचं’ हा कटू विनोद प्रत्येकाच्या आयुष्याचा अटळ भाग असतो त्यामुळे चित्रपट खूप जास्त आपला वाटत जातो.

तारुण्याच्या भर मध्यावर २२ वर्षांनंतर आपल्या तिला/ त्याला रियुनियनसाठी भेटणं…
तेव्हा तोही येणं आणि तिचं लग्न झालेलं असणं.
ती सिंगापूरला राहत असणं, तिने लवकर येऊन त्याची वाट पाहणे.
हिरो राम काळा सावळा, जाड, अस्ताव्यस्त केस, दाढी मिषा वाढलेला. म्हणजेच मुख्य पात्र हे कुठल्याच आदर्श दिसणाऱ्या, पिळदार शरीरयष्टी असलेल्या हिरोसारखे नाही… पोटाचा घेर, केस वाढलेले, दाढी मिशा कुरळ्या पडलेल्या, हिरोईन मात्र गोरीपान, कपाळावर दाक्षिणात्य संस्कृतीतली ती लाल बिंदी, आकर्षक नजर. हिरॉईनचे नाव ‘जानू’ असणं आणि प्रत्येक संवादात आपल्याही कानावर सतत जानू पडत राहणं, त्या पात्राशी जोडण्याचा हा लेखकाचा प्रयत्न सफल होत जातो. नंतर संवाद सुटा होत जातो, तिचं त्याला वर्जिन आहे का विचारणं, तू लग्न कर- मला तुझ्या बायकोला भेटायचे आहे म्हणणं… हा संवाद २२ वर्षांनी भेटल्यानंतर होणं शक्य वाटते.
“कसं का असेना पण प्रेमात पडलं की कविता करावी” एवढं समर्पण येत जातं. आपल्या व्यक्तीसाठी प्रेमाच्या भावनेला एक कविता अर्पण केलीच जाते, ती आपोआप होत जाते, हे खऱ्या आयुष्याला रिलेट होत जातं.

एकूणच ‘९६ म्हणजे प्रत्येक मुलाच्या/ मुलीच्या आयुष्यातले ते ‘राहून’ गेलेलं प्रेम आहे. त्या प्रेमाचं स्वप्न जगणं म्हणजे ‘९६ आहे. ‘९६ मध्ये एक रात्र आहे, त्याचं बुजरा होऊन तिच्याशी न बोलणं आहे, तिचं खूप मुक्त असणं आहे, तिचं अरेंज लग्नापेक्षा त्याच्याबरोबर स्वप्नात रंगवलेल्या लग्नाकडून असलेल्या भावना व्यक्त करणं आहे. तिचं त्याच्या घरी राहणं आहे. कुठलीच फॉर्मलिटी न करता त्याला कपडे वाळत घालायला लावणं आहे, प्रत्येक शब्द आणि त्याला जोडून असलेली प्रत्येक भावना त्याला कळायलाच हवी ही दुतर्फी अपेक्षा आहे. अशा चित्रपटावर रिव्हयू न लिहिणेच पसंत करेल, कारण हा चित्रपट म्हणजे “केवळ दोन्ही प्रेमी युगलांच्या भावनांचं मुक्त प्रदर्शन आहे.” त्या भावना आपल्याही नकळत अलगद आपल्या आत झिरपू लागतात इतका सॉफ्ट सिनेमा आहे. स्वच्छ नितळ प्रेमाच्या पाण्याला त्याच्या मिठीच्या ओंजळीत घ्यावं, सजवाव आणि सेलिब्रेट करावं इतकी सुंदर आणि सहज रात्र आहे ती.

चित्रपट संपताना या एका रात्रीच्या भेटीचं फुल म्हणून दोघांचं आयुष्य म्हणत तिनका तिनका म्हणत राहतं,
“कुछ ऐसा कर कमाल के तेरा हो जाऊँ,
मैं किसी और का हूँ फ़िलहाल, के तेरा हो जाऊँ।”

एकदानक्कीपहाच !

©️Pooja Dheringe

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *