अंग्रेजी मिडीयम हा इरफान खानसाठी पाहण्याची धडपड होती. इरफानच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर त्याचे अनेक चित्रपट वरती आले. मला अंग्रेजी मिडीयमची अधिक उत्सुकता होती. माझ्याकडे उपलब्ध असलेल्या इतर कुठल्याच ऑनलाईन अॅप सबस्क्रिप्शनवर हा चित्रपट उपलब्ध नव्हता. हॉटस्टार वीआयपी आणि टेलिग्रामवर उपलब्ध आहे. अंग्रेजी मिडीयम हा चित्रपट १३ मार्चला म्हणजेच कोरोनाच्या महामारीची सुरुवात होत असताना आला. इरफान खानचे कमबॅक आणि त्याची ऊर्जा बघण्यासाठी प्रेक्षक आतुर होते, पण कोरोनाच्या लाटेत चित्रपट विरून गेला.
काल सुदैवाने हा चित्रपट युट्यूबवर आला, तो पुन्हा काढून टाकतील म्हणून ताबडतोब पाहून घेतला. इथे लिंक पोस्ट करणार तर चित्रपट रिमुव्ह करण्यात आला होता. पण वाईट वाटून घेण्याची गोष्ट नाही, कारण हा चित्रपट तुम्ही फक्त नि फक्त इरफानसाठी पहावा. त्याव्यतिरिक्त चित्रपटात विशेष अस काहीच नाही. साधारण कथा आहे, इंग्लिश येत नसल्यामुळे परदेेेशी जाताना इंग्लिश न येणाऱ्या वडिलांचे झालेले वांदे. वडील म्हणजे चंपक अर्थात इरफान खान.
साधी सरळ स्टोरीलाईन आहे, चंपक हा सिंगल पॅरेंट आहे. मुलीच्या जन्मावेळी आईचा मृत्यू होतो. त्यांनतर प्रत्येक सिंगल पालकाच्या मनात आपल्या अपत्याला वाढवताना येणारं कन्फ्युजन सहज मांडलं आहे.
इतर सिंगल फादर्सच्या डोक्यात येत असेल तो विचार चंपकच्या डोक्यात येतो, बायको वारल्यानंतर मुलीचा बाप व्हावा की आई? आज आई असती तर…? या प्रश्नांचा हा प्रवास आहे.
चंपकच्या मुलीचे लहानपणीपासून विदेशी जाण्याचं स्वप्न आहे. लहानपणी बापसुद्धा ही महागडी स्वप्न पाहू देतो पण मोठं झाल्यानंतर मात्र मुलीचं बोट बापाकडून सुटलं जात नाही. आईला छुपा पदर असतो, बापाला काळजाचा पाझर मनातच झिरपू द्यावा लागतो.
मुलीचे विदेशी जाण्याचे प्रयत्न चालू असतात, अशातच तिला तिच्या कॉलेजकडून लंडनला जाण्याची संधी मिळण्याची शक्यता असते. त्यावर चंपक म्हणतो, ‘भारत को अँग्रेजो से आझादी मिलने को २०० साल लगे!’
हे वाक्य बोलल्यावर लगेच डोक्यात येतं, ” भारतातल्या पोरींना त्यांच्या पालकांकडून स्वातंत्र्य मिळायला किती पिढ्या जातील त्यांनाच माहित…”
एकट्याने मोठं केलेल्या मुलीचा आणि वडिलांचा प्रवास सुरू होतो. चित्रपट अंग्रेजी मिडीयम असला तरी माझं लक्ष मुलीला वाढवणाऱ्या बापाकडे जास्त होतं. अशा चित्रपटांना आणि अशा नात्यांना भाषेचं बंधन नसतं. मायेचं आणि काळजीचं सौंदर्य असतं.
आपल्या मुलीच्या आसपास परपुरूषाला पाहून असुरक्षित झालेला बाप केवढा मायाळू दिसतो, तो इरफानमध्ये दिसतो. लंडनला जाण्यासाठी टॉपर मुलाची मदत घेऊन मुलगी मन लावून शिकू लागते. एखाद्या ढ मुलीचं/ मुलाचं परीक्षेत चौथे येणं चित्रपटाची कथा पुढे ढकलण्यासाठी ठीके, पण अवास्ताविक वाटते. तरीही चित्रपट अवास्तविक असतात म्हणून उत्सुकता निर्माण करणारे असतात. याला फिल्मी भाषेत, फॉल्स बिलिफ दाखविल्याशिवाय प्रेक्षकांना चित्रपट भावत नाही, असे म्हणतात.
तरीही, चित्रपट पुढे ढकलण्यासाठी इंग्लिश भाषेमुळे सुरू झालेली घटना रंगवण्याचा अयशस्वी प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.
शिवाय करीना कपूर, डिंपल कपाडिया यांची भूमिका आहे. पण कथा मजबूत नसल्यामुळे चित्रपट पाहण्याची तलब भागत नाही.
पण या निमित्ताने नकळत मला माझ्या आयुष्यात इंग्रजीचं असलेलं महत्त्व आठवून गेलं. इंग्रजी म्हटलं की कॉंशियस होणं, टेंशन येणं, ट्रांसलेशन, युट्यूब व्हिडिओ ( एका दिवसात इंग्रजी शिका टाईप), कॉपी करून समोरच्याशी ऑनलाईन बोलताना पेस्ट करणं, मेसेज खोडण, इंग्लिश चुकलं तर समोरचा जज करेल या भीतीने सरळ हिंदीत संवाद पुढे नेणं… समाजात इंग्लिशचा वापर वाढल्यामुळे मनात न्यूनगंड आणि भितीसह एक समज वाढू लागला. ‘हे अंग्रेजी आपल्या देशाचं नाहीच. देश आझाद झाला पण इंग्लिश मात्र चिटकून राहिली.’
चित्रपटातल्या एक दोन घटना अंग्रेजीला धरून आहेत. त्यात विमानतळावर घडलेला ड्रग्सचा सिन अगदीच रीलेट करणारा आहे, हसण्याची संधी आहे.
आणि एकच डायलॉग जेमतेम लक्षात राहतो,
“वो लोग अंग्रेजी बोलू है तो का,
देस तो हमरा ही महान हैं।”
याशिवाय, चित्रपट बाप आणि लहानपणापासुन तारुण्यात जाणाऱ्या मुलीचा प्रवास वाटतो. कधी कधी मोठे होताना आपण शॉर्ट टेंपर आणि चिडचिड होत जातो, काहिवेळेला पालकांना आपल्या पिढीची स्पर्धा कळत नसते, ती प्रत्येक पिढीनुसार बदलणारी असते. पालक आणि तुम्ही एकमेकांचे असतात, पण दोघांमधल्या वयाच्या अंतरामुळे खूप वेगळे होत जातात तुम्ही. प्रेम करतो, तेव्हा प्रियकर/ प्रेयसीवर चिडताना प्रत्येकजण खुप संयमाने त्या नात्याला सांभाळतो. पण पालकांचं आणि मुलाचं नातं या काळात नाजूक होतं, जपायला हवं. मुलांच्या मनात पळणारे क्षणभंगुर स्वप्न पूर्ण करताना मुलांच्या धडपडीत, पालकांच्या आतला समुद्र मुलांना कळायला उशीर जातो. हा चित्रपट इरफानचा कमबॅक असला तरी चित्रपटाच्या मजबूत कथा नसलेल्या चित्रपटांसाठी इरफानची ही लास्ट इनींगच. तो बंजर जमिनीवर अभिनयाची पेरणी करत होता, उठून दिसत होता.
बाकी चित्रपटाबद्दल लिहिण्यासारखं आणि लक्षात ठेवण्यासारखे काही नाही. त्यामुळे जेव्हा चित्रपट बघायला मिळेल तेव्हा नक्की पाहा, तो इरफानचा शेवटचा चित्रपट असल्यामुळे आणि त्याच्या अभिनयासाठी.
।पूजा ढेरिंगे।