इतका उबग येतो का हो आयुष्याशी लढताना? तुम्ही त्याचे होता की ते तुमचे होऊ पाहते तुम्ही मिंधे होताना?
थोडा सल्ला पाकळीला विचारू,त्रास होतो का ग सांडताना? तू कोणासाठी करावं, लोक तुझ्यासाठी करणार नाहीत,तरीही उरली उमेद तर करत जा त्यांच्याहीसाठी!
तुझा परतीचा प्रवास तुला वाटतो सुरू झाला,मी सांगते ही वाट अजून तक्रारींची लागलीही नाही तुझ्या वाट्या.
मोहऱ्या मिरची खूप होतेय, पूड घालून सोपं कर, माणूस आहेस तशीच रहा, ढोंग माणसाचे नि रंग
फुलांचे गळून पडता अर्ध वयात.
बी रुजून कोंब फुटून अंकुराला झेलता सगळे ऋतु,
कळी होऊन फुल होते रंग कवेत घेते ग तू,
आज रंग कवेत घेताना रस्त्यात अलवार गळून पडतं हातातलं फुल,
प्रवास तितकाच त्याचा, तिथे तो गळून पडून मृत्यू होतो गाडीखाली, पायाखाली नाहीतर पुलावरून खाली कोसळून. .
तुझ्यासाठी ते त्या ‘फुलाचं स्वच्छंदी बागडणं’ म्हणून तू केलेली मुक्तता असेल. तू घेतलेला त्याचा जीव हा तुझ्या गणतीतही नसेल.!
तरीही तुला तुझ्यावरचा अन्याय टोचत राहील, तेंव्हा तुला तुझ्या जीवनाची गाथाच जडभारी होईल.
त्याचं कुणाचं काय घेऊन बसते माझ्याकडे पाहा म्हणून तू जगाला ओरडून सांगशील,समोरच्याच्या दुःखाच्या बदल्यात तू तुझं दुःखही टाकशील, तुझे फासे पडले पटावर, तरीही तू माणूस म्हणून कितपत जगू शकशिल?
थोडी आत झिरपू दे, थोडं स्वतःला सोडून दे, तू लोकांच्या कथांना तुझ्या आयुष्याशी जोडणं सोडून दे, तुझं दुःख कोणाची तुलना नाही, तुझं वाट्याला आलेलं सगळं तुझंच आहे आणि भर एखाद्याच्या आयुष्यात हे वाटणं ही ती जागा नाही!
तू मोकळ्या आभाळी, मैदानी, पठारावर, दऱ्यांच्यात जा. ते तुझ्यासाठी आहे पण लक्षात ठेव ते तुझे नाही.
कोणाची सोबती होऊ शकते तुझ्या सोबत कोणी नसेल.हा सोबतीचा गर्भगळीत मोही हट्ट सोड, इथे तुझं ऐकणार कोणी नाही, तू स्वतःही नाहीस.
त्यामुळे स्वतःच्या विहिरीच्या आत डोकावून बघ, पायऱ्यांनी जाताना खोलीचा अंदाज घेऊन पाऊल टाक, भीती कायम असते कुठे खाच्कन पाय अटकुन स्वतःच्या आतच अंत होतो की काय.
त्यामुळे माणूस हो, अंतर्मुख नाही ना सार्वजनिक. जगत जा, तुझा अंत तुझ्यापासून नि शेवटही तुझ्यातच!
~ पूजा ढेरिंगे