अर्ध्या तासाच्या वर कधी शास्त्रीय संगीत मन लावून ऐकले, असं झालं नाही. ती माझ्यातली कमतरता मानून मी मुडनुसार गाण्यांचा अस्वाद घेते… संगीत कोणतेही असो त्याच्याशी आपण कनेक्ट व्हायला हवं, ही त्या गीताची पावती असते. पण प्रत्येकासाठी गाण्याचं स्थान वेगळं असतं. माझ्यासाठी ते मुड बदलणारं वाद्य असेल तर इतर कोणासाठी तरी ते त्याच्या प्रिय व्यक्तीने समर्पित केलेली भावना असेल, एका अल्लड मुलासाठी त्यावर थिरकणे हे रसिकतेचे रुप आहे…
मी कधी शास्त्रीय संगीताला मनावर घेतलं नाही. वर म्हणाले तसं गाणं ऐकणे हे सक्तीचं नसतं. संगीतामध्ये आपण मश्गूल होऊन जातो, जिथे इतर कोणी महत्त्वाचं वाटत नाही. मी गीतकाराच्या नजरेतून संगीत ऐकलं नाही, ना पाहिलं. माझ्यातला रसिक श्रोता ज्या ठिकाणी समाधीमग्न होतो ते संगीत मला आवडते. त्यामुळे शास्त्रीय संगीत म्हणजे कानाला कुरकुर, किंवा जाझ म्हणजे शास्त्रीय संगीताची भेसळ किंवा सुफी गाणी म्हणजे सुगीचे दिवस आल्याचा फील. हे तुलनात्मक कॅरेक्टराईझेशन मला करता येत नाही. मुळात स्वतःला बंधनं घालून लोकांना दाखवण्यासाठी संगीत ऐकायचं नसतं. एक रसिक श्रोते म्हणून तुम्ही टेंशन फ्री होण्यासाठी संगीताचा आधार घेतो.
एकदा मला बळजबरी एका ठिकाणी दोन तासाच्यावर शास्त्रीय संगीत ऐकावे लागले… शास्त्रीय संगीत ऐकायला लावले म्हणून त्रास नाही झाला, पण दोन तासाच्या वर मी सलग केवळ गाणी ऐकली असेल असं झालं नाही. गाणी ऐकता ऐकता काही काम करत असेल तर गाण्याहून उत्तम पार्टनर नाही. त्यामुळे शास्त्रीय संगीताबद्दल असलेले फेमस स्टरिओटाइप मी माझ्या बाबतीत लागू देत नाही. तो संगीत कलेचा अपमान असतो.
हे सगळं कनेक्शन यासाठी कारण काल एका रात्रीत ‘बंदिश बँडीट्स’ ही सिरीज संपवली. शकुंतला देवी आल्यापासून मला या सिरीजची उत्सुकता होती. कारण अशा पारंपरिक चित्रपटांचे माहोल रसिकतेचा वेगळा फील देतात. शिवाय सिरीजमध्ये लिरीसिस्ट म्हणून समीर सामंत असल्यामुळे मला नकळत गाण्यांचे बोल ऐकावेसे वाटले. कारण ‘हीच अमुची प्रार्थना’ ही गेल्या कित्येक महिन्यांपासून ऐकत असलेली प्रार्थना त्यांनी लिहिली हे कळल्यापासून या गीतकाराच्या साध्या सोप्या पण मनाला भिडणाराऱ्या विचारांची फॅन होते. त्यांनी लिहिलेल्या ‘विरह’ या गीताच्या शब्दांना जेव्हा शंकर एहसान लॉय आवाजाची साद देतात तेव्हा “तेरे बिना… कहीं भी ना… ब्याकुल मन लागे। ” ही ओळ काळजात घर करून जाते.
याशिवाय चित्रपटाचे संगीत ही जमेची बाजू असल्यामुळे
“सुनता हैं गुरु” या कबीराच्या दोह्यांचे गायन ऐकताना मनाला सुकून मिळत जातो. तेच दुसऱ्या क्षणी छेड़खनाइया या गाण्याच्या ठुमक्यांवर थिरकावेसेच वाटते आणि सजन बिनचा लूप तर वेगवेगळ्या धूनमध्ये मनाच्या बॅकग्राऊंडला फिरत राहतो. बॉलीवुडच्या नेहमीच्या कॉन्सेप्टला बाजूला सारून या सिरीजची कथा वेगळ्या विश्वात नेणारी आहे.
कथा शास्त्रीय संगीत गायक राधे (ऋत्विक भौमिक) आणि पॉप स्टार तमन्ना (श्रेया चौधरी) यांच्याभोवती फिरणारी आहे. मराठीतील कट्यार काळजात घुसली या चित्रपटानंतर सिरीज स्वरूपात बॉलीवूडमध्ये शास्त्रीय संगीताला लक्ष्य करणारी ही पहिलीच सिरीज. त्यामुळे भारतीय शास्त्रीय संगीताचे अनेक छुपे अंग समोर आणण्याचा मोठा प्रयोग आनंद तिवारी, अमृतपाल सिंह बिंद्रा आणि शंकर एहसान लॉय यांनी केला आहे.
चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेले राधे आणि तमन्ना दोघेही परस्परविरोधी व्यक्तिमत्त्व आहे. संगीताचे वेगवेगळे टोक असले तरीसुद्धा ते अनुकूल आणि दीर्घकाळ सोबत राहू शकतात का हे दाखवणारा हा प्रवास आहे. राधेच्या पात्रातील अभिनेत्याचा पारदर्शक अभिनय एका ग्रामीण भागातील मुलाचे पात्र अचूक साकारताना दिसतो. तमन्नाचे मस्तमौला पात्र बहुतांशी आजच्या पिढीला रीलेट करणारे आहे. नसिरुद्दीन शाह यांच्याबद्दल काय बोलावं? त्यांनी साकारलेला शिस्तबध्द संगीत सम्राटचा रोल हा जितका कठोर वाटत असेल तितका ताकदीचा पडद्यावर खिळवून ठेवणारा आहे. अतुल कुलकर्णीचा त्याच्या अभिनयाशी असलेला प्रामाणिकपणा त्याच्या पात्राबद्दल एकाचवेळी कीव करावी की राग यावा ही द्विधा निर्माण करते.
स्वप्न, प्रेमकथा, रोमँटिक क्षण, लग्नासाठी जबरदस्ती, गाण्याचे महत्त्व, कलेची स्पर्धा, दुष्मनी, बदलणारी पिढी या सगळ्यांना एकत्र जोडून योग्य अयोग्यची जाण देणारा हा प्रवास आहे. या प्रवासात फॉलसेटो, गंडाबंधन, संगीत सम्राट, राजेशाही, घराणेशाही, श्वास घेण्याची पद्धत, ठुमरी, मिडियोकर या संगीत क्षेत्रातील नवीन गोष्टी कळतात.
‘ठिकाणांची निवड’ शास्त्रीय संगीतात खूप महत्त्वाची असते. त्यामुळे जोधपूर, राजस्थान हे सांस्कृतिकदृष्ट्या श्रीमंत ठिकाण या सिरिजसाठी निवडण आणि तेथील स्थानिक लोकांचा सीरिजमध्ये असलेला वावर हा प्रेक्षकाला हिंदुस्थानच्या प्रेमात पाडायला मजबूर करतो.
घराणेशाही हा सध्याच्या घडीला समोर आलेला सगळ्यात महत्त्वाचा विषय चित्रपटात मांडला आहे. वारसा हक्काने घराण्याचे नाव जपताना तुम्ही स्वतःची आणि स्वतःबरोबर कुटुंबाची कशी फरफट करून घेतात, याचा उत्तम नमुना चित्रपटात दाखवला आहे. कलेला सर्वस्व मानले तरी जगण्यासाठी लागणाऱ्या बेसिक गरजा भागवण्यासाठी थोड्याफार प्रमाणात कलेला न विकता त्यातून पैसा कमवावा लागतोच. नाहीतर हट्टी होऊन पंडित राधे मोहन यांच्या सारखं एखाद दिवस ना खायला ना राहायला जागा राहील अशी स्थिती होण्यास वेळ लागत नाही.
कबीर आणि राधे हे दोन्ही पात्र निम्म्या निम्म्या पद्धतीने आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात.
पण जुन्या पिढीचे आणि आताच्या पिढीच्या कलेचे एकत्रीकरण हे दोन्ही पिढ्यांना ही सिरीज बघायला भाग पाडतं. या सगळ्यात एक गोष्ट ठळकपणे अधोरेखित होते, तुम्ही कोणत्याही कलेचे कलाकार असाल, तुम्हाला पिढी दर पिढी बदल स्वीकारावा लागेल. तुमची ओरिजनॅलिटी न सोडता बदल स्वीकारून कलेला बंदिस्त न करता प्रत्येक प्रेक्षकाच्या हवाली करावे लागेल. जर तसे शक्य नसेल तर तुम्ही प्रेक्षकांकडून कुठली अपेक्षा सुद्धा करणे चूक ठरते. प्रेक्षक प्रत्येकवेळी बदलणारा असतो. त्याने जगात घडणारा बदल स्वीकारलेला असतो. कलाकार म्हणून आपण कलेला कवटाळून ठेवणं हे कलेसाठी धोकादायक ठरत असतं. आजपर्यंतचा इतिहास आहे, कला तेव्हाच मशहूर होते जेव्हा त्याला प्रेक्षकवर्ग मिळतो. त्यासाठी कलाकाराने आधी प्रेक्षक व्हायला हवं.
सीरिजमध्ये नतमस्तक व्हावे इतके सुंदर दृश्य आहेत. संगीत गाताना मुद्दाम चुकीचे राग गाणं हे खूप अवघड जात असेल, हा किंचित विचार मनाला हसवून जातो. यात लीप सिंकचे कामही तसे अवघडच असेल. पण सीरिजमधील कलाकारांनी हे खूप ताकदीने निभावले आहे. राधे आणि तमन्नाचे प्रेम एकमेकांच्या संगीतावरील प्रेमामुळे जरी झाले असले तरी त्यांनी खूप प्रैक्टिकल प्रेम आणि संगीत या दोन्हींना समान आदर दिला आहे. त्यांच्यातील प्रेमाला कुठलाच क्लिषे शेड नाहीये. त्यामुळे प्रेमकथा असली तरी त्याचा सूर नेहमीसारखा नसल्यामुळे प्रेक्षक म्हणून आपल्यात नवं काहीतरी बघत असल्याची भावना तयार होते.
याशिवाय ही सिरीज खूप काही शिकवून जाते. तुमचं कलेसाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी असलेलं समर्पण कोणत्या टोकाचे असायला हवे, हे दर्शवणारा ‘राधेचा प्रायश्चित घेतानाच सिन’ खूप त्रासदायक असला तरी कलेचं महत्त्व ओळखायला हे कष्ट घ्यावे लागतात हे सांगणारा आहे. तेवढा संयम आणि ओढ असावी लागते. यावेळी सीरिजमध्ये दाखवलेला मेणबत्तीचा आणि सुर्यास्ताचा वापर करून रियाज करण्याचा सिन नेत्रसुख देणारा ठरतो.
मला शेवटचे दोन एपिसोड खूप जास्त आवडले… ज्यात सातव्या एपिसोडपर्यंत शांत असलेली मोहिनी (शिबा चढ्ढा) लीड रोलमध्ये येते. तिचा अबोल स्वभाव काहीतरी रहस्य आहे याची कुणकुण देत राहतो. शेवटच्या दोन एपिसोडमध्ये समाजाचं, घराणेशाहीचं आणि नसीरुद्दीन शाह यांच्यातल्या गुरूच रहस्य, असुरक्षितता आणि ईर्ष्या गळून पडते. तेव्हा गुरूचा राग येतो, घराणेशाहीचा पूर्वीपासून येणारा राग आज अधिक बळकट होत जातो… घराणेशाही ही खऱ्या अर्थाने कलेला लागलेला डाग वाटतो. कारण एका कलाकाराने त्याच्या कलेच्या जोरावर आणि प्रेक्षकांच्या संमतीने चार चौघात स्थान मिळवलेले असते. पण त्याची येणारी पिढी कलेची कदर करणारी असेलच असं नाही… आणि गुरूने केलेली ईर्ष्या ही लैंगिक बाबींवर आधारित तर नसेल ना हा प्रश्न पडून वाटते, पुन्हा स्त्रीला परंपरेच्या जोरावर काबीज करून पुरुषाने असुरक्षित भावनेने स्त्रीवर अधिकार मिळवला आहे.
कदाचित स्त्री म्हणून जगत असल्यामुळे मला जेव्हा स्त्री एखाद्या गोष्टीचा खंबीरपणे ताबा घेते, तो भाग खूप जास्त टच होऊन जातो… त्यामुळे मोहिनीचं राधेला संगीत शिकवणे आणि ती शिकवण्याची पद्धत तिच्या स्त्रीपणाला कुठेच मागे न टाकता उलट त्यातून संगीताची निर्मिती कशी होते, हे समजावून सांगणारी असल्यामुळे हे पात्र लिहिणाऱ्या लेखकाच्या दृष्टीला सलाम करावासा वाटतो.
निगेटिव्ह काही असेल तर एपिसोड्स काही प्रमाणात अनावश्यक दृष्यांमुळे लांबवले गेले. परंतु कुठेही लिंक तुटत नाही. नवरसांचा वापर असलेली ही सिरीज बॉलीवुडचा दर्जा वाढवणारी आहे. शेवटी एवढंच सांगेल, गाण्याचं तुमच्या मनात स्थान कोणतं आहे? या प्रश्नाचं उत्तर जे असेल त्यावरून तुम्हाला ही सिरीज आवडेल की नाही हे ठरेल.