जरा जपून

चूक बरोबर ठरवणारे तुम्ही आहात कोण??
घटनास्थळी तुम्ही होते का?
एक प्रगल्भ, स्वतंत्र व्यक्ती म्हणून तुम्ही कशाला समर्थन करत आहात?
एक वाक्य मागे खूप वायरल झालं होतं, “जोपर्यंत खरं चप्पल घालून घराबाहेर पडणारच असतं, त्या आधीच खोटं गावभर फिरून आलेलं असतं…”
पूर्वी खरं आणि खोटं या दोन्हींत सामाजिक, आर्थिक, राजकीय घटकांचे मोजमाप व्हायचे. आता याची जागा वायरल, ट्रेण्डिंग या मॉडर्न पद्धतीने घेतलीय. खऱ्या आणि खोट्यातला मधला धागा असतो हा वायरलपणा!
हे वायरल करणाऱ्याला त्याचा हेतू पूर्णपणे स्पष्ट असतो. पण जेव्हा ही वायरल अफवा साखळीने वाढू लागते, त्याचा विषाणू जनसामान्यांना अगवा करू लागतो.

आपल्याला समाज म्हणून याचं काहीच घेणं देणं नसतं की हे खरय की खोटं. आपल्याला केवळ आपण जगाच्या बरोबरीने अपडेटेड आहोत हे जगाला दाखवायचं असतं. त्यामुळे धडाधड शेअर, फॉरवर्ड, कॉपी पेस्ट हे शस्त्र वाटू लागले आहे.

पण तुमच्या या दिखाऊपणाचा अभ्यास तुमच्याही नकळत कोणीतरी करत असतो.
तुम्ही अमुक एका विचारधारेचे असतात, तेव्हा तुम्हाला एका विशिष्ट गटात बसवणारा आणि तुमच्या बौद्धिक आणि मानसिक दृष्टिकोनाला वैयक्तिक फायद्याच्या चौकोनात आणणारा एक समूह असतो.
त्यामुळे जेव्हा तुम्ही तुम्हाला पटणारी एखादी गोष्ट वायरल करता, ते मुळात तुमच अर्धवट मत असतं, त्याला मीठ-मोहरी लावून समाजात पाठवण्याच काम कधीच साध्य झालेलं असतं.
तुम्ही भूमिका मांडता, हे वक्तव्य बऱ्याचदा वाचनात येतं पण तुम्ही हाताळत असलेले तथ्य खरंच तथ्य असतात ना? ही तपासणी करता तुम्ही?
आपण सगळेच आज एका माध्यमाचा भाग आहोत. वृत्त किंवा इलेक्ट्रोनिक माध्यमांना आज आपण नावे ठेवतो. त्यांना मी जस्टीफाय करणार नाहीच, पण कळत नकळत आपण त्यातलाच एक भाग बनत चाललो आहोत. लोकशाही आज सोशल मीडियावरील मतांनही गृहीत धरत आहे.

वरील सगळ्या लिखाणाचा हेतू एवढाच आहे, सगळीकडे वक्तव्य आणि हळहळ व्यक्त होतेय तो पालघरची घटना. घटना अजूनही अंधारात आहे. काळ नाजूक आहे! आताच्या घडीला सर्रास सोयीने व्हिडिओ कटिंग, ऑडियो बदलून सामाजिक विषमतेची निर्मिती, अर्धवट व्हिडिओतून सामाजिक भावना पेटवणे, त्यांना अधिक तीव्र करणे, किंवा विश्वासार्ह माध्यमातून अफवांतील सत्य जोर देऊन सांगणे, या आणि अशा अनेक प्रयत्नांतून आयटी सेल्स, राजकारणी, धर्मांध, आणि आर्थिक फायदा बघणारे लोक समाजातील लवचिक मानसिकतेच्या माणसांना प्रवृत्त करतात. जितके व्यक्ती तितकी मते असूच शकतात, त्या मतांमध्ये मतभेदाचे अनेक प्रसंगही येतात यापुढेही येतील. परंतु त्यातून जीव घेण्या-देण्याच्या अमानवी घटना घडत असतील तर आपण समाजाचा भाग बनून या सगळ्यातून माघार घ्यावी. समाजातील दुबळ्या, लवचिक आणि माणुसकीवर विश्वास असणाऱ्या लोकांना आदर्श समाजाचा आरसा स्पष्ट दाखवण्यासाठी समाज म्हणून आपली समज प्रगल्भ होणे अत्यावश्यक आहे.
तुमचा विचार मांडताना तो चौफेर विचारांतून मांडतो आहे का हे पाहणे, राजकारणाच्या बाबतीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आणि मत मांडण्याची संकल्पना प्रत्यक्षात आहे, ती मतमतांतरे वैचारिक पातळीवरच आहेत का, हे तपासून पाहणे, तुमच्यापर्यंत पोहोचलेले व्हिडिओ, ऑडियो खरंच विश्वासार्ह आहेत का हे तपासून पाहू, तसे नसल्यास ही वायरल साखळी आहे तिथेच थांबवणे, पैशासाठी समाजाला ढवळून देण्याचे काम करत असाल तर तुम्हीही याच समाजाचे भाग आहात हे भान विसरून चालणार नाही.

तुमच्या या कृत्यांवर लक्ष ठेवणारी सायबर पोलिस ही यंत्रणा आजही कार्यरत आहे. या काळात ती अधिक तत्परतेने काम करत आहे. जर चुकूनही एखाद्या सूक्ष्म घटनेच्या आरोपात तुम्ही अडकला तर त्यापुढे कंप्युटर स्क्रीनच्या मागे राहूनच आयुष्य जगावं लागण्याची तयारी करा. त्यामुळे काहीही शेअर करताना तुम्ही कोणत्याही मार्गाने समाजाला दूषित तर करत नाहीये ना हा प्रश्न मनाशी येऊ द्या.
समाजाचा भाग म्हणून समाजातील माणसे वाचली पाहिजे. समाजात आग लागली तर, समाज म्हणून तुम्हीही त्यात मरणार आहात!

Please follow and like us:
error

1 thought on “जरा जपून”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *