“यांना घरात बसायला काय होतं? जिवापेक्षा सगळं महत्त्वाचं का?, इतक्या दिवसात हे आटोक्यात आले असते पण लोकांना अकली नाही, काय गरज आहे घराच्या बाहेर पडण्याची” ही आणि अशी अनेक वक्तव्य आपण घरात पंख्याखाली बसून करत असतो.
खायला दिवसातून चार पाच वेळा नवनवीन पदार्थ, चीज ब्रेड, रवा मैदा, साबुदाणे, चहा, डाळ भात, आंबारस सगळचं ताव मारून खातो. त्यांनतर थोड्यावेळाने बातम्या लावतो, आकडेवारी पाहतो. ती आकडेवारी पाहून तोंडचं पाणी पळालं अस सहज म्हणतो. मित्र मैत्रिणींना फोन करतो, खूपच बोर झालं तर पंख्याखाली मोठ्या आवाजात गाणी, शायरी, संगीत लावून आवडीच काहीतरी करत बसतो. हे सुख नसलं तर हाताला वर्क फ्रॉम होमचं काम असतं. त्यावरून वैतागतो, काम करावं लागतंय याची चीड येते. रोज घरातले तेच तेच चेहरे पाहून कंटाळतो, संपूर्ण दिवस बंदिस्त होऊन काढायचा या विचाराने चिडतो, प्रियकर/ प्रेयसी मित्र मैत्रिणींना भेटता येत नाही म्हणून कसेतरी वागतोय या आणि अशा अनेक रिकामपणामुळे फ्रस्ट्रेट होऊन शेवटी छोट्याशा कारणाचे निमित्त करून घरात भांडण करतोय, भांडणातून विकोप होऊन दुसऱ्या रिकाम्या जागेत जाऊन बसतोय.
हे सगळं घडत असताना तुमच्या लक्षात येतंय? लक्षात घ्या, तुमच्या डोक्यावर रोज छप्पर आणि पोटात अन्न असतं. भुकेची, हक्काच्या छपराची आणि एकेका दिवसाला दगडासारखे पुढे ढकलण्याची किंमत भवानी पेठ आणि धारावीसारख्या ठिकाणांना उन्हासारखी जाणवतेय.
लोक आक्रमक होण्यास सुरुवात होत आहे.
इथल्या लोकांच्या शरीरात जिवापेक्षा, भुकेचा डोंब उसळला आहे. प्रशासन यंत्रणा या परिसरातील लोकांनी घरात बसावे म्हणून प्रयत्न करत आहे. परंतु भुकेचा प्रश्न सोडवला जात नाहीये, त्यावर उपाययोजना होत नाहीये. यावर उपाय म्हणून लोक बाहेर पडत आहे आणि यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन यंत्रणांकडून कंटेंमेंट झोनमध्ये पत्रे टाकून बाहेर न पडून देण्याचे अशक्य प्रयत्न सुरू आहेत. पण पोटात अन्न नसते तेव्हा माणूस आक्रमक होतो, सगळा अट्टाहास पोटासाठी असतो. त्यामुळे येथील लोक पत्रे तोडून बाहेर पडण्याच्या विचारात आहेत. अजून दहा दिवसात यंत्रणेने परिस्थती आटोक्यात आणली नाही तर या ठिकाणावरून लोक आंदोलनाला उतरतील. हे सावरण्याच्या नादात जे आहे ते अस्थिर होईल. कोरोनाचे युद्ध मागे पडून भुकेमुळे रस्त्यावर युद्ध सुरू होईल.
यावर मी सामान्य व्यक्ती म्हणून सहज म्हणून जातेय, “शासनाकडून त्यांच्या परीने शक्य ते सगळेच प्रयत्न चालू आहेत आणि शिवाय जेही काही चालू आहे ते त्यांच्यासाठी तर चालू आहे ना? त्यांनी सहकार्य करायला हवे.”
त्यावर मला या प्रतिबंधित भागात राहणारा एक रहिवासी सांगतो, “आमच्यासाठी चालू आहे, पण हे असं करून आमचं शरिर रोगापासून वाचेल पण आम्हाला दोन वेळचे खायला नाही, तेव्हा जीव गेला तर कोण जबाबदार आहे? काही संस्था किंवा शासनातर्फे दोन दिवसांनी खाण्यापिण्याची तात्पुरती सोय होते पण पुन्हा पाढे पंचावन्न. शिवाय आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित केल्यामुळे सुटकेचा निःश्वास सोडला होता. पण तिकडे काय आणि इकडे काय दोन्हीकडे इमर्जन्सी परिस्थितीत वैद्यकीय सोय नाही. कोरोनाव्यतिरित इतर आजाराचं काय? अत्यावश्यक सेवांमध्ये केवळ मेडिकल स्टोअर्स उघडे आहेत. पालिकेकडून अत्यावश्यक सेवांचे किट दिले जाते, परंतु तेही पुरेसे नसते. शिवाय दूध बंद केलंय, त्या भागात लहान बाळ आहेत, अशा परिस्थितीत ते काय करणार ?
या प्रश्नांची उत्तरे म्हणून सरकारने या लोकांच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्थेवर खूप जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. पोटात अन्न असेल तर, लोक तडजोड करून अधिक काळ धीर धरतील. शरीरातल्या रोगापेक्षा पोटात उसळणारा भुकेचा विषाणू अधिक जीव घेऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्या डोक्यावर छपराची सोय केली मात्र पोटातल्या अन्नाची गरज भागविणे ही आत्ताची प्रमुख गरज आहे.
छायाचित्र स्त्रोत: संकेत वानखेडे (हिंदुस्थान टाइम्स)
प्रशासनाला कोण सांगेल; ते तर हवेत गोळ्या झाडात आहेत.. गरिंबांचा कोणी वाली नसतो तीच सगळी स्थिती आहे..