हातापायाची कातडी जीर्ण पाचोळा होत आली,
मृगजळ श्रीमंतीची लाच ना आस राहिली!
सुखाचा शोध रातच्या जेमतेम जेवणात संपतोया, समाधानाचा सुस्कारा झोपडीच्या छपराने सुटतोया. नशिबाच्या कपाळावर मीही माघार घेतोया…
सुधारेल म्हणता म्हणता दमछाक होऊ लागलीय, बास आता खूप झालं, थकवा गळ्याशी आलाया.
कसलीच ना उरली आस ही, आला दिवस मावळावा, आविष्याला कोणाच्या केरसुणी सम दिस न यावा!
उरला सुरला माझ्यातला मी संपेल फासाच्या दोरीवर नाहीतर रेल्वेच्या रुळावर, कुठे का असेना कोणाला फरक पडेल या करोडो संसाराच्या पाठीवर?
आला दिस घासून घासून पुसून संपतो,घासायला जगाची जाताना घासून मीच आतला संपून जातोय.
कुठे, का, कुणासाठी आणि कशासाठी ? जन्म सार्थकी लावू म्हणता, या नरकातल्या नाटकी दुनियेसाठी?
जीव कोणाचा स्वस्त नसेल माझा तो आहे, श्वासावर केवळ माणूस जगत नाही हे जगजाहीर आहे… मी चाललो म्हणत म्हणत, टोकाचा इंतजाम झालाय, मी आज जाणारे, उरणार नाही, नावालाही…
अऱेरे…
पण थांबा जरासा, तिथं माझं असं काहीतरी मिणमिणतय, अहो खरं सांगतोय,माझ्या घरात पणतीचा जन्म होतोय!
रोजचा माणूस राहण्यापेक्षा मी बाप होतोय, ऐका गाववाल्यो, माझ्यात बाप जन्म घेतोय!
जिव्हाळ्याचा ओलावा दाटून येऊ लागतोय, दारूचा अड्डा आता नरकच वाटतोय.
माझ्यातल्या बापाचं बाळ होतंय नि या हक्काच्या पणतीच्या जीवावर सपान नवं पाहू लागतय!
जीव महाग झालाय, खरं सांगतो जीवाला हक्काचा मालक मिळाला! हक्क सपान पहायचा मिळतोय, कारण माझ्या दारात पणतीचा अभ्यास चालतोय! सगळ्या अंधःकारावर उजेड शिक्षणाचा येईल, जेव्हा माझी पणती सुशिक्षित होईल!
गरिबीची भाकर तिला चवीची लागल, पण कष्टाच्या श्रीमंतीने तिला माणूसपण लाभल!
उरून सुरून माझी राहणार नाही तेव्हा पणती, मला कवेत भरून घेऊ दे आज तिची ऊब नि उजेडात ती!
पणतीची पत्नी होईल कुण्या परक्याच्या घरची…
सुटता सुटणार नाही माहेर सासरपणाची मेख, मला प्रश्न पडत जाईल, का झालीय तुझी आई, बायको माही?
कोणी बाप इतका टोकाचा निर्दयी कसा असतो, प्रथा म्हणून पोटच्या पोरीला दुसऱ्याची करून टाकतो?
पण एक इश्र्वास कायम मेल्यानंतरही राहील, तिच्या विचारांच्या प्रकाशात जगाला न कळलेला बाप तिला कळल!
तेव्हा मी या जन्माला म्हणेल, मरण थोडं पोस्टपौंड करतोय,
कारण जगणं खऱ्या अर्थानं बाळसं धरतय!
– पूजा ढेरिंगे
Pingback: स्वप्नांची खिडकी- Window of dreams