थँक गॉड, आपण ‘जोकर’ नाही !

  • by

“एखाद्याला केवळ हसू माहिती आहे असा माणूस कसा दिसत असेल ?
तुमची आई सतत जन्मापासून सांगत असेल की, तुुझा जन्म हसवण्यासाठी झालाय, तर?
किंवा लहानपणी तुमच्यावर अत्याचार झाले असेल तर?
किंवा मग तुमचं आयुष्य रोज एखाद्या शोकांतिकेच्या प्रयोगांसारखे असेल तर?
तर आपल्या आयुष्याची उमेद संपून जाईल. पण एवढं असूनही तुम्ही रोज हसता, रोज हसवता…
लोकांच्या हसण्यासाठी तुम्ही स्वतःच्या आयुष्याला जोकर बनवता, एकदा नाही दिवसाच्या प्रत्येक शोला…
तुमच्या हसवण्याला लोक किंमत देऊन ते स्वतःसाठी विकत घ्यायला येतात.

या सगळ्या सर्वायव्हलमध्ये तुमचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ या दोघांचं मिश्रण तुम्हाला आतून पिळत असतं. रोजच्या घडीला भूतकाळात घडलेलं काहीतरी खुपत असतं. भूतकाळामुळे दुर्दैवाने तुम्ही जन्मतः खूप कमजोर झालेले असतात. माणसांच्या दुनियेत तुमचा जन्म झालेला असतो तुम्ही अगदीच विसरून जातात. त्यामुळे
कमजोर लोकांना नेहमी प्रश्न पडतो, ” या जगात सगळे एवढे क्रूर का आहे. ?” तो प्रश्न कमजोर शरिराचा नाही, तो स्वच्छ मनाचा प्रश्न असतो. पण “समाजाला स्वच्छ मने नेहमी दुबळी वाटतात.” कारण मुखवटा घालून वावरणे आता त्यांच्या अंगवळणी पडलेले असते आणि अर्थात चित्रपटातला ‘जोकर’ही त्यातून सुटत नाही.

‘जोकर’ चित्रपट पाहताना सुरुवातीला तो काहीच उलगडत नाही. कारण जोकर पाहण्यासाठी स्टेबल मन असणं खूप गरजेचं असतं. कारण ही कथा नकारात्मक शेडसची आहे. या कथेत माणसाच्या कमजोरीचे प्रत्येक पैलू उघड्यावर दाखवले आहे. कथा जरी आर्थर फ्लेक नावाच्या जोकरची असली तरीही ती कथा प्रत्येक माणसाच्या पौगंडावस्थेत होणाऱ्या युद्धाची आहे.

कथेचा स्पोईलेर न टाकता एवढे सांगेल, एका स्टँड अप कॉमेडियन/ जोकर/ विदूषकाची ही कथा आहे. समाजातील अन्याय सहन करणाऱ्या दुर्लक्षित घटकाची ही कथा आहे. कथेतील जोकर त्याच्या आईबरोबर राहत असतो. आईच्या नशिबी दुःख आल्यामुळे तिने आर्थरला नेहमी हसण्याचा संदेश दिलेला असतो. कारण हसल्यामुळे आर्थर त्याच्या आयुष्याचे सगळ्यात मोठे कुरूप दुःख पचवायला शिकेल, कदाचित हास्यामुळे त्याला ते पचवणं सोपं जाईल, हा तिचा मानस असतो.

आर्थरसाठी ‘लोकांना हसवणे कला आणि आईने सांगितलेला मंत्र’ असतो. त्यामुळे कॉमेडियन बनण्यासाठी तो नोट्स काढतो. त्याच्या फेवरेट कॉमेडियनचे शोज बघतो.
आपल्या आवडत्या कलेच्या अस्तित्वाचाच भाग होणं एवढं गहिरं असतं, हे आर्थरकडून कळतं. जर आपण स्वतःला कलेच्या पायाशी समर्पित केलं तर??. तर त्यातून कलेचा मास्टरपीस जन्मेल! पण ते समर्पण इतकं स्वैर नसावं की आपल्या कलेवरचा ताबा सुटला तर कलेमुळेच आपले आयुष्य विनोद बनेल.

हा चित्रपट जोकरच्या नजरेतून प्रेक्षकांकरिता कॉमेडीचे वेगवेगळे प्रकार समोर आणतो. स्वच्छ विनोदी कॉमेडी एका बाजूला नि एखाद्याचा सतत अपमान करत कॉमेडी करणे एका बाजूला. विक्षिप्तपणा याची सीमा म्हणजे आर्थरला त्याच्या आवडत्या शोमध्ये बोलावले जाते. तिथे जेही घडतं तो आपल्याच आवडत्या कलेने आयुष्याच्या पटावर मांडलेला आपला विनोद असतो.

सततच्या हसण्यामुळे आर्थरला हसण्याचा आजार झालेला असतो. “माझ्या हसण्याला माफ करा…” म्हणत एक कार्ड नेहमी तो त्याच्याजवळ ठेवत असतो.  हा आजार खरेतर लहानपणापासून त्याच्या आयुष्याला मिळालेल्या वातावरणामुळे होतो.  सततच्या हसण्यातून फिल्म मेकरने प्रत्येक हास्यामागे असलेली प्रत्येक भावना व्यक्त केली, तीही अचूक विज्युअल्स, संगीत, पात्र नि आपल्या दैनंदिन जीवनाशी ताळमेळ साधत.

त्यामुळे सतत जाणवतं, आपल्यातही एकेकाळी आर्थर वाढत होता. आपल्यातला आर्थर मेला कारण आपल्या आजूबाजूला चांगली लोकं आली आणि कदाचित आपल्याला प्रत्येक भावनेला भावनेच्या नजरेने अनुभवता आलं.
आपल्याला हस म्हटलं की हसता आलं, रडताना आपण धाय मोकलून रडलोही. उदास वाटलं तेव्हा शांत बसलो, एखाद्याचा राग आला तर हात उचलायलाही शिकलो.
त्यामुळे कुठल्याच भावनेचा फवारा आपल्या आत दाबला गेला नाही. पण आर्थरच्या आयुष्यात दाबल्या गेलेल्या प्रत्येक भावनेचा आवाज विद्रूप आहे. वेगळा आहे. “जिथे हास्याची चेष्टा झाली आहे.”

आर्थरचा मेकअप हा विषय आकर्षक आहे. एखाद्या विदुषकाला पाहून आपल्या मनात जी प्रतिमा येईल, तोच जोकर असतो. पण त्या मेकअपचं रहस्यही मेकअपमध्ये वापरलेल्या कॉस्मेटिकसारखं असतं, दडपलेलं…! आर्थरचा मेकअप पाहताना त्याच्या ओठांच्या लकेरीचे निरीक्षण करा, त्यात ओठ उदास म्हणजेच खाली असतील तरीही दिसताना ते हसरेच दिसतील.
सुरुवात होते तेव्हा आर्थरच्या संपूर्ण चेहऱ्यावरचा मेकअप तंतोतंत असतो. फक्त काजळ पसरलेले असते आणि हाताने स्वत:ला हसवण्याचा प्रयत्न आणि ओठांशी खेळून हास्याचा प्रतीकात्मक प्रयत्न चालू असतो. “चेहऱ्यावरील ते हाताने तयार केलेलं खोटं हसणं आणि संपूर्ण कोरीव मेकअपमध्ये  निळ्या काजळाचं आखीव रेषे बाहेर जाणं” हे जर निरीक्षण कळत गेलं तर तुम्हाला चित्रपटाची बिटविन द लाइन्स म्हणजेच चित्रपटाच्या आतील चित्रपट उलगडत जाईल, तिथे सुरू होतो जोकर!

प्रत्येक ट्रॅजेडीची म्हणजे शोकांतिकेची एक सुरुवात असते. आर्थरसाठी ती लहानपणीच झालेली असते. पण त्यानंतरही खरी सुरुवात होते, जेव्हा समाज आर्थरला कमजोर समजू लागतो, त्याला बुली करू लागतो. त्याच्या या कमजोरीला उत्तर म्हणून आर्थरचा सहकारी त्याला परिस्थितीशी लढण्यासाठी बंदुक देतो आणि सगळा चित्रपट वेगळाच टर्न घेऊ लागतो.

खरी सुरुवात होते, जेव्हा ट्रेनमध्ये एकट्या असलेल्या मुलीला सोसायटीत सभ्य म्हणवणारे तीन लोक छेडतात, तेव्हा या परिस्थितीकडे पाहून जोकर सतत हसतो. खूप जोरजोरात, एकाच लयीत! त्याच्या हसण्याचा इतका परिणाम होतो की,  मुलगी वाचते पण ती माणसं याला पकडतात … कमजोरीचा खरा तमाशा मांडतात. आर्थर कुणाच्याही एका पायाच्या लाथाळल्याने दूर फेकला जाईल एवढा कमजोर असतो. तेच होतं इथेही, तो सांगण्याचा प्रयत्न करतो की मला हसण्याचा आजार आहे, तरीही ही सभ्य माणसे त्याला न जुमानता त्यांच्या शक्तीचे प्रदर्शन करत राहतात. हात, बुक्क्या, पायाने मारत राहतात. त्यामुळे नाईलाजाने तो त्याच्याजवळ असलेली बंदूक माणसांवर रोखतो. तीन खून होतात, सगळीकडे चर्चा होते.

कुणी शरीराने कमजोर असलं तरी त्याचा राग कमजोर नसतो. न पटणारे होते पण अन्याय सहन करणं मूर्खपणाचे वाटते. त्याने दिसणारी समस्या हसून सोडवण्याचा प्रयत्न केलाही. पण “समाजाला कमजोरपणा दिसला की त्याला मारायचं असतं.” तेच करत होते ते सभ्य उच्चभ्रू लोक, मेले हकनाक.

या बंदुकीमुळे अनेक किस्से होतात नि त्याला कामावरून काढून टाकले जाते. कामाच्या शेवटच्या दिवशी कामाचे सामान घेऊन जाताना ऑफिसच्या बाहेर ‘डोन्ट फर्गेट टू स्माईल( हसायला विसरू नका)’ हा बोर्ड लावलेला असतो. ते खोडून तो फॉर्गेट टू खोडून ‘डोन्ट स्माईल म्हणजेच हसू नका’ असा विरोधाभास करतो. याला म्हणतात स्वतः बरोबर कलेचं अस्तित्व घेऊन जाणं. !

जगात ज्या माणसांना गणतीतही धरले जात नाही, त्यांचं आयुष्य कुठल्या जोकरपेक्षा कमी नसते. हे जोकरच्या “ALL IS HAVE ARE NEGATIVE THOUGHTS” डायलॉगमधून व्यक्त होते.

चित्रपटात जोकरच्या अभिनयाबरोबरच काही दृश्ये मनात घर करतात. संपूर्ण चित्रपटात बसमध्ये चित्रित केलेली प्रत्येक फ्रेम किलिंग आणि स्टोरीबद्ध आहे. बस, त्याच्या आजूबाजूचा परिसर नि जोकरच्या छटा याची रंगसंगती मनाला मनोरंजनाचा उत्तम नमुना अनुभवायला देते. याशिवाय एक दृश्य आवर्जून मनात घर करते ते म्हणजे सकाळच्या वेळेत खड्डे नसलेल्या रस्त्यातून अलवार बस जातेय आणि बसमधील ९० टक्के लोकांच्या हातात काळया पांढऱ्या रंगाचे वृत्तपत्र.!

पण सुकर दृश्यापेक्षा मनात वेगळाच चित्रपट चालू असतो नि एक क्षण येतो जेव्हा आयुष्याच्या शेवटच्या घटकेला जोकराच्या मेकअपच्या अस्तित्वाचा भाग असलेल्या लाल रंगाच्या हास्याला जोकर रक्ताच्या लाल रंगाने ओठांवर हसू रेखाटतो, अंगावर काटे उभे राहतात. तेव्हा आयुष्याचा खरा चेहरा फाडणे काय असत कळते… हास्यामागचे विद्रूप आणि क्रूर सत्य होते ते…

एवढं कळलं की जे आपल्याकडे भावना व्यक्त करण्याचं वरदान आहे, आपल्या आजूबाजूला एकटेपण नाही, सकारात्मक माणसं आहेत, त्यामुळे आपण ‘जोकर’ नाही.
शेवटी, चित्रपटात चार पाच वेळा म्हटलेली एकच ओळ,
HOPE MY DEATH MAKES MORE CENTS THAN MY LIFE
आणि ही ओळ प्रत्येकाच्या आयुष्याचं एकमेव सत्य ठरते. कारण मेलेल्या देहाच्या तुलनेत तुमच्या जन्माची किंमत कणभरही नसते. याचा अर्थ होणाऱ्या प्रत्येक मृत्यूनंतर आपल्याला पाहायला मिळतो, आणि जोकरच्या असं म्हणण्याचा अर्थ शेवटच्या काही तासात कळत जातो.

एखाद्या शोकांतिकेवर बनवलेला हा चित्रपट हसण्यामागचे दुःख सांगतो, नि पोषक आयुष्य नशिबी येण्यामागचं सुख अधोरेखित करतं.
चित्रपट पाहताना जोकरच दुःख आपलेसे करताना त्याचा भाग बनू नका, त्यातून स्वतःला भाग्यवान समजून आयुष्याला मिठी मारा. जे आहे ते खूप आहे, त्यातच सुख आहे, हे समजा आणि आनंदी व्हा!

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *