कोऱ्या करकरीत जागेला सुबक लोखंडी लटकन, चकचकीत रंगकाम, स्पेशल हायलाईट, श्रीमंत बाजेची कव्हरं असलेलीच पुस्तकं, अशी ठरवून बांधलेली पुस्तकरांग दिखाव्याने शोभून दिसते का …?
त्यापेक्षा तो दिवस आठव, एका गर्द गहिऱ्या क्षणी एखादं सुख पायाजवळ चालून यावं तसं एक पुस्तक चालूून आलं होतं. तेेव्हा वाचतानाा जी तंद्री लागली, ती अशी सतत नाही लागत. आपला त्या पुस्तकाशी काहीतरी संवाद होतो, वाईब्ज हातातून नसांतून हृदयातून मेंदू पर्यंत जातात. पहिल्यांदा मेंदू आणि हृदयाचं एकमत होऊन घडलेला मिलाप म्हणजे अवांतर पुस्तक वाचन.
एक दिवस अचानक तंद्री लागलेला काळ कितीदा तरी फ्लॅशबॅक म्हणून सरकत राहतो. तो क्षण इतका निवांत असतो की आपण वर्षानुवर्ष ती तंद्रि लावण्याचा प्रयत्न करत राहतो. अनेकांना त्या क्षणाचा किस्सा दोहरून सांगतो. पण तो दिवस पुन्हा येतो क्वचितच!
मेडीटेशनपेक्षाही जास्त निवांत क्षण पुस्तक वाचताना सापडतात.
त्या कोऱ्या करकरीत बुकशेल्फच्या कहाण्या कुठल्या संग्रहात लावाव्या इतक्या सुबक असतील. पण एकदाच गडगंज पुस्तकं आणून ते केवळ शोभेची वस्तू म्हणून लावण्यापेक्षा एकेक पुस्तक संपवून प्रत्येक पुस्तकाची कथा वेचत आयुष्याला विण घालत जावी.
स्वतःच्या हातानेे, पैशांची जोडणी करून आणलेली पुस्तकं कप्प्यात कितीदा तरी मन घालून अन नंतर आठवण आल्यावर चाळताना पुस्तकांशी झालेला संवाद आठव. वाचताना नकळत बुकमार्क म्हणून पुस्तकाचंच दुमडलेलं कोर पान, कुठेतरी तुकडा पडलेलं, मधूनच दोन भाग झालेलं, कसलातरी डाग असलेलं, नाहीतर पाण्याने, धुळीने अक्षरशः माखलेलं, नाहीतर पुस्तकातल्या कागदाचे साल पडू लागलेलं, हे वेगवेगळ्या रूपात होणारे संवाद असतात पुस्तकांशी वाचकांचे! ही संवादाने समृध्द झालेली वयाची सुरकुती पुस्तकावर दिसायला हवी.
कारण शोभेची वस्तू म्हणून सजवलेल्या बुक्षेल्फाचा तोरा जरी दिमाखात मिरवला जात असला तरी माणसाच्या मनात भिनलेले ते पुस्तकासोबतचे क्षण खूप प्रायव्हेट अन् फुल्ल ऑफ लाईफ असतात… त्यांना झालेल्या आपल्या हातांचा स्पर्श तितकाच मोलाचा असतो…
वस्तू चकचकीत सुबक, आकर्षक दिसतात… पण कोरी पुस्तकं माणसाचं व्यक्तिमत्त्व अन्, विचारांची क्षमता सांगतात.
कारण बुक्षेल्फ अन् पुस्तकं दाखवण्याचा विषय नसतो, तो आपोआप माणसाच्या आत भिनलेला असतो. पुस्तकं वाचून तुम्ही समोरच्याला कमी लेखण्यासाठी वारंवार ज्ञानाचे डोस पाजा असं म्हणत नाही, कारण पुस्तकातून ज्ञान घ्यायचं, विचार घ्यायचा की शब्दसंग्रह की व्याकरण हा ज्याचा त्याचा प्रश्न… फक्त त्याचं भांडवल व्हायला नको असं वाटतं.
भले तुम्ही कव्हर घालून टापटीप ठेवा त्याला, पण कव्हर घातलेली पुस्तकं सुद्धा वयात येऊन म्हातारी होऊ लागतात.. त्यामुळे धूळ खात लोकांना दाखवण्यापेक्षा प्रायव्हेट ठेवून त्यांच्या अस्तित्वाचं सार्थक आपला जन्म सार्थकी लावण्यासाठी करावं! तिथे त्यांची अन् तुमची धन्यता असते!
म्हणूनच ही फोटोतली रिकामी जागा नव्या कोऱ्या वर्षानुवर्ष धूळ खात पडणाऱ्या पुस्तकांना द्यायची, स्वतःच्या ज्ञानाने भरायची, दिखाव्यासाठी पुस्तकांना द्यायची की मग ज्ञानार्जन करून स्वतःत पेरून घ्यायची, आपण ठरवायचं!
पुस्तकांचा सुर घ्यावा, ध्यास घ्यावा अस्सलतेचा, हे वर्तुळ वाढवावं, वाटावं, भाग्यवान व्हावं नि
दान द्यावं नव्या पिढीला, पृथ्वीवरच्या खऱ्या सुखाचं!
– पूजा ढेरिंगे
पण कव्हर घातलेली पुस्तकं सुद्धा वयात येऊन म्हातारी होऊ लागतात..
हे लय भारीय 🙏🙏
Pingback: Family man 2 review