ब्रेकअप, व्यक्तीचं सोडून जाणं!


एका व्यक्तीच्या सोडून जाण्याने तुमच्या आयुष्यात किती उलथापालथ होणार असते याचा अंदाजा येतो?
कित्येक अनोळखी पाट्या लागतात मग कधी काळी एकमेकांच्या श्र्वासांच्या जवळ असलेल्या दोघांच्या मनांना, ओठांना, भावनांना, आणि शरीराला…
प्रेम करताना समाज विसरून प्रेम झालं, तेव्हा जे काही घडलं ती जादू होती. प्रेम एखाद्या परिसासारखं जवळ येतं. करंट सोडून जातं, तुम्ही बेभान झालेले असतात, नशेत असल्यासारखे. त्यातून तुम्हाला शुद्ध येते. तुम्ही समाजाच्या पायाशी असतात.
मग सहजच मोडतात काही लग्न, काही नाती, काही समाजमान्य नसलेली नाती.
मनांची आहुती देऊन या समाजात अनेक नको असलेले नाते सोबत फिरताना दिसतात. दिखाव्याची, नको असलेली, केवळ सामाजिक नाती!

समाजातून तुमची एक्झीट महत्त्वाची असते. जर तुम्ही समाजात अडकला तर मग हळूहळू तुम्ही तुमच्याच पसंतीच्या मुलाचा/ मुलीचा रंग पाहू लागता, त्याची भाषा, त्याची जात, त्याचे कपडे, मग त्याचा पगार, मग स्टँडर्ड, मग घर, हळूहळू घरातले आणि शेवटी यातलं काहीतरी खटकतं. इतकं की, ते नातं अर्थशून्य होत जातं. कधी अस्तित्वातच नव्हतं असं वाटू लागतं. मग जे सगळं त्या नात्यात नाही त्याबद्दल विचार करणं सुरू होतं… परफेक्ट काहीच नसलेल्या जगात त्या नात्याला परफेक्ट करण्यात ( टू बी स्पेसिफिक समाजाच्या नजरेत परफेक्ट करण्यात) आयुष्याचा महत्वाचा वेळ वाया घालवू लागतो.

प्रेमात तुम्ही कुठल्यातरी एका गोष्टीमुळे पडतात. पण जसजसं प्रेम पुढे सरकू लागतं, दोन चार वर्षे होऊ लागतात तेव्हा तुमच्या मनात असंख्य गोष्टींचं मोजमाप, तुलना सुरू होतात. तुमच्या मनात झाल्या नाहीत तरी तुमच्या घरच्यांच्या मनात सुरू होतात. मग नकळत तुम्ही त्यात ओढले जातात. बऱ्याच घरांमध्ये मुलींना ‘आवाज’ आणि ‘मत’ नसल्यामुळे त्या सरसकट भरडल्या जाऊ लागतात. त्यांना दुसऱ्याचं ऐकण्याची इतकी सवय लागून जाते की त्या बेधडकपणे बोलूही शकत नाही की, ‘हो, माझं याच्यावर प्रेम आहे आणि मला याच्या बरोबरच लग्न करायचं आहे’. मुलींवर त्यांच्या संगोपनाचा इतका प्रचंड परिणाम झालेला असतो की आयुष्याचा सगळ्यात मोठा निर्णय त्या स्व बळावर घेत नाहीत.
घरच्यांचं म्हणणं असतं, त्या उपवर झाल्या म्हणून लग्न लावून द्यायचं. पण दुसऱ्या बाजूला तेच म्हणतात, त्या इतक्या मोठ्या झाल्या नाहीत की त्या स्वतःच्या लग्नाचा निर्णय स्वतः घेऊ शकतात. त्या त्यांच्या पसंतीचा मुलगा नाही निवडू शकत, पण उद्या घरच्यांच्या मर्जीने लग्न करून दिलेला मुलगा दारुडा, मारणारा नाहीतर छळ करणारा निघाला तरी त्या सावरायला भक्कम असतात.

यावर पर्याय काय असतात रे विठ्ठला?
मुलींनी पळून जायचं? – म्हणजे मनासारखं वागायचं?
आई वडिलांच्या मनासारखं वागायचं? म्हणजे मुलाशी प्रतारणा करायची? – मनाविरुद्ध वागायचं?
खरं बोलायचं? – असं झालं तर मार खाऊन, शिव्या खाऊन, मुलीचं शिक्षण बंद होण्याची भीती!
कधीच घरच्यांना कळू न देता ते नातं विसरून …?  खरचं नातं विसरून जायचं? बाप रे! कसं जमेल? या जगात अनेकींनी जमवलय. मुलींनी ते जमवलं आणि अनेकांनी त्या मुलींचं ते दर्दनाक ब्रेकअप कित्ती पेल्यांमध्ये रिचवलय…

कठीण आहे बा विठ्ठला तुझ्या जगात जगणं,
स्वतःचं आयुष्य जगायचं म्हणत दुसऱ्याच्या मनासारखं वागणं!

– पूजा ढेरिंगे

कित्ती जीव असेच मनातून मरुन जात असतील ना तुझ्या पायाशी? तू यांच्यासाठी काहीतरी कर, प्रेमाला तुटण्याचं वळण नको देऊ, कोणाला बळजबरी कोणाचं होऊ नको देऊ!

– पूजा ढेरिंगे

Please follow and like us:
error

2 thoughts on “ब्रेकअप, व्यक्तीचं सोडून जाणं!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *