तुटलेली स्वप्न…

यू आर नाईस्ली प्लेयिंग विथ युवर लाइफ……. बेस्ट ऑफ लक

‘तू स्वतःच्या आयुष्याशी खेळतेय ?’

‘हाहाहा नाहिईइई ग मी फक्त प्रयोग करतेय… ‘

‘एssss मी पुस्तक वाचू ?’

‘आरशात भूत दिसतय माझंच ?’

‘तो कॅमरा दे बरं इकडे!’

‘सुज्याने मेसेज केलाय …….’

‘भेटायला जौ?’
एक दिवस असा येतोच येतो, जेव्हा कुणीच सोबत उरत नाही आणि मग ही अशी ओढाताण होते. खऱ्या अर्थी जगणं महाग होतं. मागे वळून बघतो तर आख्खा काळोख दिसतो. चुटकी वाजवावी नि समशान वाटावं, इतकी शांतता, इतका एकटेपणाचा कुबट वास आजूबाजूला येतो.
स्वतःच्या असण्यावरच शंका यायला लागते. अशावेळी गच्चीवरून जीव द्यावा तरी कोणी मित्र वाचवायला नसतो, ना विष पिलं तर हातातून बाटली खेचायला आई असते. आधीची जागा सोडल्याने ती दारं- खिडक्याही माझी राहिलेली नसतात, उशीचं मातीमळाण झालेलं असतं तीही आता सोबत नसते. टेबलावरची चार-पदरी चिट्ठी माझी नसते ना चहात टाकायला आणलेली साखर माझी असते.
तेव्हा मला कळतं, मी दुबळी आहे किंवा मी परावलंबी आहे. इगो अहंकार सगळ्यालाच ठेच पोहोचते, पण वेळेने वेळ मारून नेलेली असते. माझी नाचक्की होऊन हार मानायलाही मी तयार असते पण तरीही आजूबाजूला कुणीच नसतं.

तेव्हा मी हताश होऊन गबाळे कपडे घालून रस्त्याला चालू लागते. गबाळे कपडे मला सांगतात, तुझ्या कपड्यांची सुत तुझी योग्यता ठरवताय, मला राग येतो चिडचिड होते … पण मी चालत राहते…
मी षंढ आहे ? कि मी शून्य आहे ? माझं अस्तित्व आहे ?
त्या चिडचिडीतच मी त्या वादळी रस्त्यावरुन डोंगरावर जाते.
डोंगरावर जाताना सशाच्या बिळात घुसण्याचा मोह टाळते, उन्हाला चुकवते आणि शोधते स्वतःचीच पायवाट. मांजर आडवी जायलाच लागते पण आधीच सगळं बिघडलेलं असताना भिती राहत नाही कशाची, तिला जाऊ देते मी, फक्त यावेळी गतिरोधक ओळखायला शिकते …….
मग मनमुराद जाते, येईल त्या वाटेवर… हरवले तरी हरकत नसते…
सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज करते, गोंधळते, आजूबाजूला हावरटासारखं माणूस शोधते पण कोणीच सापडत नाही.
चिमणी भेटते.
नुकतीच जन्मलेली पण तिच्या मुक्तविहारात मुरलेली चिमणी. तिच्या उडण्यावर ठाम आत्मविश्वास असणारी चिमणी.
सोबतीला अजून एक चिमणी आहे, ती तिची सखी असावी, उडताना पडत असते ही परंतु तिची सखी तिला आधार देत नाही. ही पुन्हा पडते, पुन्हा त्याच आत्मविश्वासाने उठते. यावेळीही सखी हात देत नाही.
तेव्हा मला कळलं,
‘सोबत कुणीही असो ! उठावं तुला एकटीलाच लागेल! जोपर्यंत तू तुझ्या स्वत:त साठी उठणार नाही, तोवर तुझ्या तू नसणार आहेस. ‘
माणसाला आनंदाच्या क्षणी बोलवावं पण आपल्या प्रयत्नांत त्याला आमंत्रण देऊ नये, तो स्वार्थी होतो अशावेळी.

आणि या चिमणीमुळे चक्क मला मी सापडते ‘स्वतंत्र मी.’
स्वतःला शोधण्याचा आनंद पुरतो ‘आयुष्यभर…’
आणि माझा नवा प्रवास सुरु होतो स्वावलंबनाच्या दिशेने…
“मग मला काळ्याशार गवताच्या धूकयात,त्या कुट्ट काळोखात कोणाचीच सोबत लागत नाही कारण स्वप्न असतात खायला आणि जिवंत ठेवायलाही…”
मग मला कळायला लागतं, “काळ्या नेलपेंटी व्यर्थ नसतात त्यांच्यात सामर्थ्य असतं, रिकाम्या नखात रंग ओतण्याच,मंत्रमुग्ध करण्याचं…
तशीच तुटलेली स्वप्न व्यर्थ नसतात, त्यांच्यात सामर्थ्य असतं ताजं, मजबूत नि नवंकोरं स्वप्न पाहण्याचं…” एक स्वावलंबी आत्मा बनवण्याचं.

“परतीचा प्रवास उमेदीने सुरु होतो, कशाचंच ओझं उरत नाही जेव्हा माणसाला स्वत:चं ओझं वाटत नाही.”

ही अशी तत्वज्ञानपर वाक्य फक्त लिहित वाचत नसते, ती खरी कारणीभूत असतात, आयुष्याचा भार वहायला. स्वत:च्या उमेदीसाठी आयुष्यभर पुरेल असं स्वत:चं तत्वज्ञान असावंच, मला माझ्यातच मिळालं, घेतलं नि त्या चिमणीसारखं भरारी घ्यायला पुन्हा तैय्यार झाले….

Please follow and like us:
error

1 thought on “तुटलेली स्वप्न…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *