एक क्षण न्यायाचा मिळायला हवा होता…
वयाच्या विशिनंतर पुढची दुप्पट तिप्पट वर्ष आयुष्याला मिळणारी साथ एकमेकांच्या संमतीचीच हवी होती…
परिस्थितीचे फासे का टोकाचे टाकले काळाने,
‘तिला तिचा जोडीदार नि मला माझा’ असा वेगवेगळा मांडव का घातला त्याने?
मला आजपर्यंत तिच्या शरीराच्या स्पर्शाचा मोह जडला कधीच नाही, माझा स्पर्श मी राखून ठेवला होता, धगधगत्या आगेच्या लहरींवरून तप्त बाहेर पडणाऱ्या लाव्ह्यासारख्या खऱ्या अक्षतांच्या नैतिक वर्षावात मला फेऱ्यांचा वेळी ‘आजपासुन मी तुझी जबाबदारी आहे’ हा ठाम स्पर्श हवा होता…
आयुष्याने अन्याय वाढला समोर… मी प्याद्यासारखे केवळ पुढे सरकत जाऊ लागलो.
एका नवख्या अरेंज जोडीदाराच्या केवळ येण्याने पाच वर्षाचा लग्ना आधीच संसार असा मोडुन पाडला?
मी तर तुझ्या सोबतीने अक्षतांचा पाऊस अनुभवायला ठेवला होता,
मी एक एक सप्तपदी ऐकताना यावेळी सगळचं ऐकणार होतो, मी क्षुल्लक कारणानेही नव्हतो टाळणार ग लग्नाची भेट…
तू आली मी आलो पण आपलं प्रेम का आलं नव्हतं?
कुठल्या अपशकुनी क्षणी प्रेम आपल्या वाट्याला आलं?
तू माझी मी तुझा होत कित्ती सहज प्रवाहात विरघळत गेलो प्रेमाच्या स्वप्नाच्या…
कुठल्या काळया रात्री ही जाग वास्तवाने आणली आहे आज?
प्रेमाचा पुल आपण बांधत आलो, कैक लग्नाची स्वप्न रेखाटून, आपल्याला लग्नाच्या सफरीला जायचं होतं ना?
मग दुसऱ्याचा सहवास तरी का असावा तुझ्या माझ्या एक असण्यात?
आणाभाका खोट्या की मग एकमेकांसाठी अंतर्मनाच समर्पण हे खोटं ?
लग्नाचे स्वप्न झाले, माझ्या प्रेमाला लग्नाचं आमिष दाखवून सगळचं विस्कटलं…
आता आयुष्याला कुठल्याशा घड्याळाच्या बलकात अडकवून पश्र्चाताप आणि तू नसल्याच्या लाटांचा समुद्र कायमचा बांधून ठेवावा लागणारे,
आजपासून मरेपर्यंत येणाऱ्या प्रत्येक प्रेमाच्या क्षणांना या समुद्राच्या काठी आणून झुरत राहणार आहे, ना ऐल तीरी ना पैल…
एक-दोन नाही, चार आयुष्य प्रेमाच्या आणि लग्नाच्या युद्धात पराभूत होत जाणारे,
मनाचं द्वंद्व सतत चालू राहणारे,
टोकाचे बाण येणाऱ्या अनेक दिवसांमध्ये पश्र्चातापाचे आणि कुढत ठेवणारे अधिक असणारे,
कुठल्या पाकळीचा हिशोब मागत जाऊ?
माझ्या प्रेमाच्या फुलावरच माझी मालकी उरली नाही…
प्रेम परकं होत जातं, ती दूर जात राहते, एकवार एका नजरेने एका शब्दाने एका इशाऱ्याने किंबहुना एका शहाऱ्याने मला तिला थांबायचंय की नाही कळलं असतं,
तिने मागे वळूनच पाहिलं नाही… माझ्या तुटक्या मनाला मी सांगू का तिची काही मजबुरी असेल? मजबुरीने प्रेम का बदलते खरेच?
भावना, विश्वास, प्रेयसी, प्रियकर, प्रेम, आत्मा सगळ्यावरचा विश्वास जळून खाक होतो, त्याच्या राखेत माझा कोंडमारा होत चाललाय, स्वतःच्या असण्याचं छाताडावर ओझं होऊन बसलय…
प्रेमाला प्रेमाने बालिश असताना विसरता येतं,
समजूतदार वयात प्रेम करून विसरणे हा घातपात असतो.
आत्महत्यासुद्धा म्हणेल…
सगळच एकदाचं मारून टाकलं जातं, तरीही मरत काहीच नाही…
मरण एवढीच गोष्ट असते जी कधीच नष्ट होत नाही. त्यामुळे प्रेयसी प्रियकर मनाने मारून टाकले तरी मरत नाही, त्यांना आठवणींचा शाप असतो. भूतकाळ त्यांचा पाठीराखा असतो, प्रत्येक प्रेमाने भरलेला क्षण शापित वाटत जातो…
प्रेमापेक्षा जीव होतीस ग, पाच वर्षाच्या जीर्ण प्रवासात हळूहळू पूर्णत्वाने मुरत गेलियेस आयुष्यात… तू निघून गेलीस, आयुष्याची बाकी शून्य झाली आहे…
एकदा पाच वर्षापूर्वी भेटलेली तू पुन्हा आधिसारखी भेट ना… पुन्हा तुझ्याकडे तू माझी असण्याचा आधीसारखा हट्ट करायचाय, रात्र रात्र जागून चॅटिंग करायचीय, प्रेमाच्या ऋतुत भिजून फक्त तुझाच विचार करायचाय, तुझ्यावर तुझा होऊन हक्क दाखवायचाय… भेट ना एकदा पूर्वीसारखी माझी होऊन !