#film_spoiler
#bulbul
भूत प्रेताला मानता का?
चांगलय! मी पण नव्हते मानत. मला आजपासून मानावसं मनापासून वाटतं. पण ते भुत बुलबुल असेल तरच… !
बुलबुलची पहिली झलक मला फिल्ममध्ये दाखवण्याआधी पोस्टरवर झाली. काहींंनी याला फेमिनिस्ट हॉरर म्हटलं,काहींना अतिशयोक्त्ती वाटली. फेमिनिस्ट हॉरर ऐकुन चेहऱ्यावर वेगळे भाव उमटले. कारण यापूर्वी फेमिनिझम हा पुरुषांसारखं वागण्यात आहे, अशी अफवा वाढत चालली होती. इथे स्त्री आणि पुरुष यांची तुलना केलीच नाहीये. शिवाय पुरुषाला पुरुषाच्या जागेवर ठेऊन स्त्रीने कस असायला हवं हे सांगण्याचा स्पष्ट प्रयत्न केला आहे. तो प्रयत्न एकदमच इतक्या वेगळ्या पद्धतीने केल्यामुळे भारतातील स्त्री यावेळी हॉरर व्यक्तिमत्त्वात दाखवणे वास्तविकतेशी जोडत होते.
अनुष्का शर्माच्या वादग्रस्त पाताल लोकसारख्या दमदार वेबसिरिजनंतर ‘बुलबुल’ ही दुसरी लक्षवेधक फिल्मसुद्धा सामाजिक विषयावर भाष्य करणारी आहे. डिरेक्टर अन्विता दत्त हिच्या पहिल्या पदार्पणाचा हा प्रयत्न आज भारतात नंबर वनला आहे. कथा एका बंगाली हवेलीतील बालवधूची आहे. अठराव्या शतकातील ही कथा असल्यामुळे स्त्री ही गुलामीचं प्रतीक दाखवली आहे. जिथे भारताची गोऱ्यांबरोबर होणारी स्वातंत्र्याची लढाई एका बाजूला होती तर दुसरीकडे स्त्रियांची लढाई समाजाकडून दिल्या जाणाऱ्या अन्यायकारक गुलामीशी चालू होती. पण या गुलामीवर जर कुणी आवाज उठवला असता तर ती स्त्री हुबेहूब ‘बुलबुल’सारखी रोमांचक दिसली असती, असं जाणवतं.

ही कथा आहे लहानपणी लग्न झालेल्या बालवधू बुलबुलची. जी मोठी होत असताना काय काय सहन करते आणि तिच्यावर होणारा अत्याचार कोणत्या टोकाला जातो हे बघण्यासारखं आहे. तेव्हा वाटतं, या पुरुषप्रधान संस्कृतीच्या गुलामीत जीव गेलेल्या स्त्रियांचा काउन्ट कुठे असेल? किती स्त्रियांची आयुष्य अशीच वाया गेली. त्यात बुलबुलने सहन केलं ते भयावह आहे, कल्पना करूनही अंगावर लाल शहारा आणणारं आहे. इतर स्त्रियांसारखी बुलबुल अन्याय सहन करून गप्प बसणारी नव्हती पण ना ती गाजावाजा करून जगाला सांगणारी होती. ती नेहमी हसतमुख राहते, कुठल्याही गूढ संशयित घटनेचं उत्तर तिला विचारलं तरी ती केवळ हसून सामान्य परिस्थिती असल्याप्रमाणे त्याची उत्तरं देत राहते. काही क्षण वाटतं ही अभिनेत्री का घेतली, नुसतीच स्मितहास्य नि स्वतःतच मग्न आहे… पण या चेहऱ्यावरच्या स्मित हास्याला स्पष्टीकरण आहे, तो भुताचा खेळ बघण्याची मजा आहे. ती तिच्या गुलामीला उत्तर देत कशा पद्धतीने रहस्यमय स्त्री बनत जाते. स्वतःच्या अत्याचाराचा बदला पूर्ण झाल्यानंतरही ती गावातील स्त्रियांच्या अन्यायाविरुध्द उभी राहते. चित्रपटात पाच वर्षांच्या बुलबुलचे वयाने तिप्पट मोठ्या इंद्रनील बरोबर लग्न लावले जाते. ज्याचा लहान जुळा भाऊ, महेंद्र (जो मेंटली चॅलेंज्ड आहे) आणि सर्वात लहान सत्या (जो बुलबुलच्या वयाचा असल्यामुळे तिचा सर्वात जवळचा आहे, तिच्या सासरचा पहिला मित्र, आणि त्या लहानग्या वयात ज्याला ती तिचा नवरा मानत असते) इंद्रनील बुलबुलवर त्या काळात बायकोच्या सौंदर्यावर प्रेम करावं तसं नेटकं प्रेम करत होता, पण त्यांच्यात काय बिघडतं, सत्या लंडनला का जातो, मेंटल महेंद्र कसा मरतो, भाभी बिनोदिनी काय प्रकरण आहे, आणि शेवटी बुलबुल कोण आहे? या प्रश्नांना मोहक आणि प्रभावीपणे मांडणारा हा चित्रपट आहे. एक रौद्र शृंगारिक कथा नाहीतर स्त्रियांवरच्या अन्यायाची फ्रस्ट्रेशन टेल म्हणता येईल!
वीस वर्षांनंतर कथा वेगळी फिरणारी आहे. सत्याला काही कारणास्तव लंडनला शिकण्यासाठी पाठवलं जातं आणि वीस वर्षांनंतर तो कायद्याचा अभ्यास करून आल्यानंतर महेंद्रच्या अचानक घडलेल्या मृत्यूचे गूढ, अनाकलनीय परिस्थितीत इंद्रनीलने कायमचे घर सोडणे, आणि नाजूक बुलबुलची कणखर ठकुराईन होणं, हे आल्या आल्या दिसल्यामुळे सत्या गडबडून जातो नि याची उत्तरे शोधतो, त्या उत्तरांना जोडणाऱ्या गूढकथा फिल्म बघताना खिळवून ठेवतात.
या चित्रपटात काही गोष्टींची प्रतिकं मनाला गुंतवत नेतात. जसं पायातल्या जोडव्यांचा एका स्त्रीच्या संपूर्ण आयुष्याशी जोडलेला संबंध! एक गोलाकार छोट्या चिमूटभर लांबी एवढी त्या जोडव्यांची खोली असते, पण यासारख्या सिंदूर, मंगळसूत्र, साड़ी, डोक्यावर पदर, बांगड्या (म्हणायला सोपय <हातात बांगड्या भरल्या का? काय बाईलीसारखा गप्प बसलाय>) आणि जोडवे… ही बाह्य बंधनं असली तरी त्यातून नकळत काहीतरी मेसेज बिंबवला जातो. लग्न झाल्यानंतर तिच्यावर परंपरेच्या बुक्याखाली ही बंधनं बांधली जातात…
चित्रपटाच्या सुरुवातीला बुलबुलच्या लग्नाच्यावेळी एक संवाद आहे,
बुलबुल- बिछुए क्यों पहनते हैं। (बिछुए: जोडवे)
मावशी – क्योंकि यहां एक नस होती हैं, उसे दबाओ नहीं ना तो वो उड़ जाती हैं।
बुलबुल- चिड़ियां के जैसे?
मावशी- नहीं, वश में करने के लिए होते हैं बिछुए।
—–
जेव्हा ती स्वतःसाठी वैयक्तिक असं काही राखून ठेवते तेव्हा तो अभिमानाने म्हणतो,
इंद्रनील: एक पत्नी के लिए उसके पति के अलावा और क्या निजी होता है।
आणि जेव्हा ती तिच्या समान वयाच्या सत्याला आपला जवळचा मानू लागते, तेव्हा लग्नाच्या पहिल्या रात्री ती म्हणते मेरे पती तुम नहीं सत्य हो!
तेव्हा तो म्हणतो, “बड़ी हो जाओगी, तो समझ जाओगी, पति और देवर में क्या अंतर होता है।”
मोठं झाल्यावर तिला काय समजणार होतं? मोठं झाल्यावर आपण केवळ समजून घेऊन सामंजस्याने भाग बनत जातो अशा समाजाला कीड लावणाऱ्या प्रथांचा.
म्हणजे घरातला तिच्या वयाचा मुलगा हा दिर आणि तिच्या वयाच्या तिप्पट वयाचा प्रौढ मनुष्य तिचा पती… ?
कशी ही प्रथा पडली असेल? कशासाठी ? नवरा गेल्यानंतर घर सांभाळायला बराच काळ बायको मागे गुलाम म्हणून राहील म्हणून ? की मग शरीर उपभोगायला ? की मग … काही प्रथा केवळ स्त्रीचा जीव घेण्यासाठी बनल्या होत्या त्यातलीच ही एक प्रथा.
पण या सगळ्यात अधिक राग मला स्त्रीचाच येतो. या समाजात एक स्त्री जी स्वतःला सिद्ध करू पाहते पण दुसरी स्त्री तिला सतत तू किती दुबळी आहे, याचे धडे बिंबवत राहते.
यात ती दुसरी स्त्री बुलबुलची भाभी बिनोदिनी आहे. ती बूलबुलच्या प्रत्येक कृतीला स्त्री असल्याची जाणीव करून देत राहते.
एका संवादात ती म्हणते,
जिसका काम उसी को साजे हैं। ठकुराइन हैं ठाकुर नहीं।
पुढे साज शृंगाराच्या वस्तू कुतूहलाने पाहताना ती बुलबुलला म्हणते, “हमारी मानो तो नए बिछुए ले ही लो, आपके ढीले से हो गए हैं।” इथे तिला म्हणायचं असतं तुझ्या मर्यादा मोकळ्या होत चालल्या आहे. तुझ्यावर स्वतःचा ताबा राहिला नाही. माहेरचा मिळालेला रिवाजाचा मारा सासरी होतोच… कारण पहिल्याच सिनमध्ये तिची मावशी तिला हेच सांगते. त्यामुळे काय सासर काय माहेर? जर माहेरी तिला तिचं स्वातंत्र्य देता आलं असतं तर ती सासरी गुलाम नसती झाली. किमान तिला सासरची जबाबदारी आणि उपभोगाची गुलामी यातला फरक कळला असता.
स्त्रीचा राग येण्याचं दुसरं कारण म्हणजे,
वीस वर्षांचा काळ गेल्यानंतर भाभी बिनोदिनीचा पती वारल्यामुळे ती मुंडण करून वावरताना दिसते. पण ही केशवपनाची प्रथा स्त्रीला दुबळ करण्यासाठी पडली. कारण या प्रथेनुसार बाईचे केस हे तिचं सौदर्य असतं. ज्यामुळे ती मादक आणि आकर्षक दिसत असते म्हणून तिच्या त्याही नसेला दाबणे, गरजेचे ठरवले होते. पण खरंच यांना काय कळलं असतं आताच्या पिढीने कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी कापलेल्या केसांचा आधार? केशवपन हे दुबळेपणासाठी नाही कुणाच्या आयुष्याला सावरण्यासाठी लावलेला आधार ठरतो, हे समजून घ्यायला कित्येक स्त्रियांची आयुष्य विधवा म्हणून जिवंतपणीच निर्जीव बनून संपली. शिवाय भाभीला मुंडण करणं हे दुबळेपणा वाटण्यापेक्षा बुलबुलने पुरुषाप्रमाणे समाजात वावरणे हे जास्त दुबळेपणाचे वाटते. त्यामुळे या बिनोदिनी सारख्या छोट्या मेंदूच्या बायांची या समाजाला गरज नाही… या स्त्रिया जितक्या वाढतील तितका महिलांवरील प्रथांना आणि पुरुषी अहंकाराला माज येईल. आताचा काळ २०% बदलला असला तरी तेव्हाच्या तुलनेत ही दरी भरून निघत आहे याचा कणभर दिलासा आहे.
स्त्रियांचा आवडता रंग कोणता? हा प्रश्न जेव्हा पडतो, सगळे पिंक असं एकसुरात म्हणतात. पण मला तिच्या आयुष्याचा रंग लाल वाटतो. तिला प्रेम होतं तेव्हा लाल गुलाब हवं असतं, प्रेम तुटतं तेव्हा रागाने लाल होऊन सगळं आयुष्य संपवाव वाटतं, वयात आल्यावर पाळी येते तेव्हा लाल रंग वाहतो, लग्न होतं तेव्हा लाल सिन्दुर भांगात भरतात, बाळ होतं तेव्हा लाल रंग बाहेर पडतो, आणि बलात्कार होतो तेव्हा….
कुठेय पिंक? गोडी गोडी गुलाबी रंग?

जिथे विनाश होणार असतो तिथे ती निर्मिती करत असते. ती विनाशाच्या एक पाऊल मागे असते, पण ती या कुरूप निर्दयी जगाला वाचवते. याच जगाची पुनरावृत्ती करत असते. तरीही तिला तिनेच निर्माण केलेल्या जगात अन्यायाची वागणूक दिली जाते. कधी पुरुषप्रधान समाजाच्या इगोसाठी ती अन्याय सहन करते तर कधी तिच्या घरातल्या जवळच्या स्त्रियांवरील विश्वासाला बळी पडून!
या सगळ्या अन्यायाच्या धुमश्चक्रीत तिला डॉ. सुदीप म्हणून एक पुरुष जितक्या ताकदीने उभा करणारा भेटतो तितक्याच ताकदीने दुसरा पुरुष तिचा विनाश करायला तयार होत असतो.
हा दुसरा पुरुष इंद्रनील आणि त्याचा जुळा भाऊ महेंद्र आहे. सत्या आणि बुलबुलचे प्रेम संबंध असल्याच्या शंकेतून आणि बुलबुलचे सत्यासाठी झुरण्यातून बंड करून उठलेला इंद्रनील तिच्या उघड्या अंगावर लोखंडी सळईने एखाद्या निर्जीव वस्तूला माराव इतक्या संतापाने मारत राहतो मारत राहतो मारत राहतो… जोपर्यंत लाल रक्त शरीराच्या प्रत्येक भागाला लागून तिच्या पाय आणि कंबरेचा चुरा होत नाही तोपर्यंत …
नि एवढं करून तो तिथून निघून जातो…
तरी ती जगण्याची उमेद ठेवते, नि तिथे येतो तो दुसरा पुरुष महेंद्र. तो बधीर पुरुष आहे, त्याची मनस्थिती ठीक नाहिये. तो डोक्याने अधू आहे. त्याचे सेन्स काम करत नाहीये. पण त्याला बलात्कार कळतोय… तो हरामखोर जातीचा तिच्या त्या भागाचा पार चुरा करूनच दम घेतो. बलात्कार इतका सोप्पा सहज का होत चालला आहे…
ती वेदना… माझे हात थरकाप करून उठतील जर मी ते लिहायचाही प्रयत्न केला तरी. इतका तो अभिनय असला तरी माझ्या अंगावर शहारे आणून पोटाला पिळ देणारा होता. इतका जिवंतपणा आणि त्या जिवंतपणात मेलेल्या कित्येक मासूम मुलींच्या आरोळ्या दिसून गेल्या. डोळ्यात पाणी आणि अन्याय करणाऱ्या त्या श्र्वापदाचा जीव घेण्याचा अंगार हातात दाटून येतो… लंपट जातीचे…. हरामखोर साले… चित्रपट अंगावर येतो.
मरणाच्या शेवटच्या श्वासात उभी असताना, संपूर्ण अंगभर लाल रंगाचा स्त्राव वाहत असताना तिच्या मांड्यांना माखलेला लाल रंग जेव्हा महेंद्रची बायको साफ करते आणि म्हणते, थोडा पागल हैं, पर गेहने मिलेंगे। तुम चुप रहना।
थोडा पागल हैं, लेकीन इज्जत मिलेगी! इसलिए चुप रहना।
थोडा पागल हैं, पर उससे नहीं तो उसके भाई से सब मिलेगा! इसलिए चुप रहना।
बडी हवेली में बडे राज होते हैं, इसलिए चुप रहना।
या अशा मंदबुद्धी बायांना आधी तुरुंगात टाकलं पाहिजे. संविधानाने जन्माचा अधिकार दिला, स्त्रीचं आयुष्य बरबाद करणाऱ्या अशा स्त्रियांना शिक्षा व्हावीच.
अन्यायाचा हा पाढा संपून भुताचा अध्याय सुरू होतो. या अशा हिंस्त्र, अहंकारी वृत्तीचा विनाश करणाऱ्या भुताचा खेळ!
पण ही माणसं एका झटक्यात मारून टाकली. या असल्या माणसांचे दाताने लचके तोडून एवढ्या एका क्षणात नाही संपवायचं अशांना. त्यांना मनाने, शरीराने सगळं टॉर्चर करून मग मारून टाकायचं. असं मारायचं की त्या विनाशाला पाहून अन्याय करणाऱ्यांवर स्त्रियांबाबत दरारा निर्माण होऊन हे पुन्हा घडणार नाही.
या चित्रपटाच्या शेवटी एवढंच वाटतं, प्रत्येक अन्याय सहन केलेल्या स्त्रीने बुलबुल व्हायला हवं! या समाजाच्या चुकांना माफि देण्याचे चुकीचे संस्कार लागले आहे. ही वळणं बदलली तर नवी दिशा मिळून जग तिला स्त्री म्हणून स्वीकारेल.
जियो रे मेरी बुलबुल!