लग्नानंतरची समीकरणे!

  • by

लग्न झाल्यानंतर बायको आल्यावर मुलगा शहाणा होतो किंवा त्याचे लग्नाआधी होणारे लाड एकतर बंद होतात नाहीतर कमी होतात, याचा बहुतांश आई आणि शेजारील समाजाला त्रास असतो. बायकोने सांगितलं म्हणून ताट उचलू लागला, घरातल्या कामांना हातभार लावू लागला, बायकोच्या हाताखालचा बैल झाला, असे टोमणे कानावर येऊ लागतात.

या सगळ्यात ती मुलगी सुद्धा लग्नाआधी तितकीच असमंजस, तिच्या आईसाठी परी असते हे सवयीने विसरले जाते. बऱ्याच मुलींनी तर घरातली कामेही केलेली नसतात. त्यांची ही अशी आयुष्य बदलून समाजाने नियम घालून दिला म्हणून ती घरकाम करते, स्वतःच्या सवयी बदलवते, स्वतःच देखणं आयुष्य सोडून लग्न केल्यानंतर तिला जर सतत या अशा वातावरणात टाकायचे असेल तर खरंच लग्न या सुंदर नात्याला अर्थ आहे?

नवऱ्याला एक काम सांगितलं तर बायको कशी शहाणी आणि निर्दयी आहे, असे सुर लावणाऱ्या समाजातल्या पुरुषांनी पुरुष असल्याचा थोडा कमी फायदा घेऊन लॉजिक आणि स्त्री पुरुष समानतेच्या तत्वावर हे वागणं मोजावं. या प्रकारात ३ केस असतात,

एक केस अशी असते की नवरा कामावर जातो, बायको घरी असते. तेव्हा तिने करावीच घरची कामे. पण त्यात ती काँटिण्यू त्याच वातावरणात असते, अशा केसमध्ये कमीत कमी चांगल्या सवयी म्हणून जेवल्यावर आपलं ताट उचलून बेसिंकमध्ये ठेवलं, स्वतःची काही कामे स्वतः केली तर काय बिघडते?

दुसरी केस अशी, जिथे दोघे नोकरी करतात. पण सुट्टीच्या दिवशी बायकोने विश्रांती घ्यायची नाही. याउलट नवऱ्याने तंगड्या वर करून ताणून द्यायचं आणि या अशा वागण्याचं मुलाच्या आई, वडील, शेजाऱ्यांना वाईट वाटण्यापेक्षा अभिमान वाटतो. त्यांच्या मते हेच ते “बायकोला मुठीत ठेवणं”. या केसमध्ये चुकून एखाद वेळी नवऱ्याला मनवून त्याने चहा बनवला की वर्षभर त्याच्या आईला सुनेने केवढा अन्याय केला याचं आयतं कोलीत मिळतं.

तिसऱ्या केसमध्ये बायको कमावते, नवरा घरी असतो. हा सीन जास्त करून गरीब, कामवाल्या काकू वर्गात जास्त पाहायला मिळतो. जिथे पैसा तीच कमावते, घरकाम तीच करते आणि नवऱ्याच्या दारूला पैसे तीच देते आणि त्याचा मार तीच खाते.

मी निरीक्षण करतेय, आताच्या पिढीतले नव्यानेच पुरुष बनलेले लग्न झालेले पुरुष ही कामे करायला तयार आहे. पण त्यांच्या आई, शेजार, वडील आणि नातेवाईक हे त्यांना जबरदस्ती चुकीच्या वळणावर नेत आहे. खूप छोट्या गोष्टी असतात, स्वतःचं ताट उचलणे, ओला टॉवेल वाळत घालणे, स्वतःच्या वस्तू त्याच्या त्याच्या जागी ठेवणे पण या चांगल्या सवयी मुलींना जशा रागावून, फटकरून लावल्या जातात त्या मुलांना लावताना घरचे इतके पक्षपाती का होतात? आणि यावर जर बायको त्याला बदलवू पाहत असेल तर पुन्हा आई, शेजार, वडील आणि नातेवाईक बायकोने युद्ध सुरू केल्यासारखे शस्त्र काढून का तयार असतात? लग्न झाल्यानंतर जसं मुलीच्या आयुष्यात बदल होतात, तिचं आईच्या हातून मिळणारं आयतं ताट बंद होतं, तिचे कपडे कपाटातून घेऊन धुवून पुन्हा वाळल्यावर घड्या घालून आहे त्या जागी येणं बंद होतं. मोजायला गेलं तर बारीक सारीक म्हणता म्हणता पूर्णच शारिरीक, मानसिक बदल होतात. तिचं घर बदलणं हा प्रचंड बदल तर समाजाने तिच्या यादीतून काढूनच टाकलाय. तसे मुलाच्या आयुष्यातही बदल नक्कीच होत असतील. पण हे एवढ्या लेव्हलला? का त्याच्या बायकोने लग्नानंतर सुद्धा त्याला आई ठेवायची तसं राजा बनवून ठेवायचं ? फक्त लग्न झालंय या एका गोष्टीमुळे मुली नवीन आयुष्य स्वीकारतात, मोठ्ठे बदल आणि सवयी बदलवतात. बऱ्याच घरात जिथे नवरा बायको दोघेच राहतात, तिथे मोठ्या प्रमाणात ही परिस्थिती बदलली आहे. पण आजही बायको असताना आपला मुलगा काम करतो, ताट उचलतो, जेवायला घेतो हे आई, वडील, शेजाऱ्यांना पटत नाही, झेपत नाही. हे बदलायला हवे! घरच्यांचं, शेजारच्यांच हे सतत अधेमधे केल्यामुळे ते दोघे नवरा बायको म्हणून नीट एकमेकांना ओळखूही शकत नाही. जिथे प्रेमापेक्षा समाजातल्या चौकटीत त्या व्यक्तीला भूमिका निभवण्याची सक्ती येते, तिथेच ते नातं केवळ दिखव्याचे उरते.

काळानुसार हळूहळू नवरा बायकोचे रोल मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत. ५०% नवरा आणि बायको दोघेही कमावतात, अशी परिस्थिती वाढणार आहे. कधी काळी “पैसा” या एका गोष्टीमुळे स्त्रीकडे “घर” सोपवण्यात आले होते. आता “महागाई”मुळे ज्यावेळी एकाच्या पैशात भागणार नाही आणि दोघेही कमावणार तसतसे स्त्रियांचं व्यक्त होणं आणि ही कामे स्त्रीची आणि ही पुरुषाची हे बंद होऊन अटलिस्ट पुढच्या पिढीच्या आई, वडील, शेजारी मुलाला “राजाबेटा” या भ्रमात वाईट सवयी लावणार नाही. कारण बऱ्याच मुलींच्या घरी त्यांना राणी सारखं वाढवलेल असतं. “लग्न” या नात्यामुळे तिचं राणित्व हिरावले जाते, प्रथेच्या नावावर. फक्त “स्त्री आहेस” म्हणून अशक्य गोष्टी लादल्या जातात. तर ही असमानता का? याचे उत्तर मिळणं अवघड आहे.

(हा माझा वैयक्तिक अनुभव नसून लग्नानंतर मुलींच्या आयुष्यात होणाऱ्या बदलांचे आजवर निरीक्षण केले, ते मांडण्याचा हा प्रयत्न.)

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *