कल्पनेतलं प्रेम खूप बहरलेलं असतं. आपल्याला प्रेम होतं त्या पहिल्या दिवसासारखं ते असतं…
प्रेमात पुनर्जन्म झाल्याची भावना असते. पण जसं आपला जन्म रोजचा होऊ लागतो तसं नव्या भावना जुन्या होऊ लागतात. त्यात वास्तवाची भेसळ होऊ लागते.
फक्त समोरच्याकडूनच होते अस नाही, आपल्याकडून सुद्धा होते… पण आपण ज्यावेळी विचार करतो अस का होते ? आधिसारख प्रेम का नाही राहिले? तू आधीसारखा राहिला नाही म्हणून चिडचिड करू लागतो , तेव्हा आपण आपल्या पार्टनरवर चिडतो. त्याला आपल्या चिडण्याच मूळ कळत नाही किंवा तो रूटीन मध्ये एवढा गुंतून जातो की त्याला हे बदल लक्षातच येत नसतात.
आपलं समर्पण पूर्णपणे असतं आणि हे बदल सुरू झाल्यावर आपण आधीपेक्षा जास्त नाजूक होत जातो. प्रेमात देव दिसावा इतकं श्रद्धेने आपण आपल्या जोडीदाराच्या सगळ्या गोष्टींना समजून घेऊ लागतो.
नात्याचे बदल स्वीकारणं गरजेचं असतं… ते जुने दिवस निःशंक खूप मोहक असतात. पण बदल ही एकमेव शाश्वत गोष्ट असते. त्यामुळे तुम्ही घडलेल्या सुखद वेळेला थांबवून ठेवू शकत नाही. आठवणीतले दिवस संपलेले असतात, म्हणून आपल्याला त्यांच्याबद्दल आपुलकी वाटते. आजचा दिवस आठवणी झाल्या की तोही सुरेखच वाटतो.
उचंबळून आलेल्या भावनांना स्थिरता द्यावी लागते. प्रेम आपल्यात स्थैर्य आणतं. पण त्यानंतरचा प्रवास ती स्थिरता टिकवून ठेवण्याचा असतो. नाहीतर घसरत जातात पाय कुठल्या दुसऱ्या मोहाच्या जाळ्यात… एकदा पाय घसरला की तिथून पुन्हा परतीचा मार्ग नसतो. त्यामुळे नात्यात येणारे बदल मिळून डिस्कस करावे, त्यातून जे निष्पन्न होईल ते दोघांचं असेल. नातं सोप्प होतं जेव्हा तिथे दोघांचं मिळून एक आऊटपुट हातात येतं. फक्त प्रेम हातातून सुटू द्यायचं नाही. ते दोघांसाठी तेवढंच महत्त्वाचं, नाहीतर आपलंही नातं जगातल्या कित्येक रुक्ष नात्यांसारख उरतं, कसलाच परिणाम न होणारं, हक्क म्हणून नाही कर्तव्य म्हणून उरलेलं!
आपल्या नात्यात पक्षी होण्याची ताकद आहे की एखादा ऋतू होण्याची ताकद आहे, हा शोध इथे लागायला पाहिजे. प्रेम करताना कसलेच कष्ट घ्यावे लागत नाही, त्यामुळे ते कुणालाही होतं, पण ते प्रेम मुरत जायला नात्याचं सुख शोधत राहायचं. प्रेम टिकवण कुठल्या ऐर्यागैऱ्या व्यक्तीचं काम नाही. प्रेम टिकवणारा खरा प्रेमी असतो.
– पूजा ढेरिंगे