उद्धव ठाकरेंमध्ये मला राजकारणी कमी आणि एक शिक्षक अधिक दिसायचा. कारण सफेद शर्टवर, पिवळ्या सोन्याच्या साखळ्या असा पेहराव म्हणजे नेता! ही व्याख्या एकंदर राजकीय चित्रावरून तयार झाली होती.
शिवाय, पांढरा कुर्ता कम शर्टवर अनेक डाग म्हणून राजकारणी सफेद रंगाच्या कुर्त्यात असतो, हा डोळ्याला पट्टी न बांधता झालेला समज होता. राजकारणाशी जेव्हा ओळख झाली तेव्हा हा समज अधिक दृढ होत गेला. त्यामुळे उद्धव यांना मी कुठल्या मुख्यमंत्र्यापेक्षा डोंबिवली फास्ट सिनेमातल्या संदीप कुलकर्णी या नटाच्या सोशिक भूमिकेत अधिक बघायचे. तसाच सैल इन केलेला सदरा-पँट, ढेरी नावाचा अवयव पोटापुरता मर्यादित, त्यामुळे वजन उंचीला धरून शरीर, डोळ्यात सतत नाजूक भाव, डोळ्यांवर सतत कसलीतरी काळजी, त्यामुळे चष्म्याचा वाढलेला नंबर, डोळ्यांखाली आलेलं काळं आणि कोंपलिमेंटरी म्हणून हातात बटाट्याची भाजी आणि पोळी बांधून आणलेला डबा…
शिवसेनेचा भगवा हा जास्त बाळासाहेबांच्या काळात शोभायचा, म्हणणारी आमच्या आधीची पिढी. ही पिढी आम्हाला बाळासाहेबांचे कर्तृत्व, त्यांचा धाडसीपणा सांगायची. माझ्या पिढीने पाहिलेला हा पहिला कर्तबगार नेता म्हणावा लागेल, जो येणाऱ्या पिढीसाठी आदर्श ठरेल. त्यांनी बाळासाहेबांचा गुण घेतला, कॉपी न करता. पण त्यांनी त्यांची काम करण्याची शैली बदलली नाही. त्यांची काम करण्याची पद्धत संपूर्णपणे त्यांची आहे, वेगळी आहे. आजपर्यंत एवढा शांत नेता या गादीवर पाहण्याची सवय नाही. अनेकजण त्यांच्या या स्वभावाला, सुसभ्य, नम्रपणाला त्यांची कमजोरी समजतात. पण येणारी संकटं त्यांच्या कर्तृत्वाची उत्तरे देईल. त्यांनाही ही संधी मिळत राहील.
त्यामुळे एखादा सामान्य दिसणारा माणूस किंवा शिक्षकी शारिराकृती असलेला व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकतो हे तर्क केवळ आदर्शवादी पुस्तकातले वाटायचे.
ठाकरे यांचा पेहराव आदर्श व्यक्तिमत्वाला साजेसा असला तरी राजकारणी प्रतिभेला ‘आदर्श’ हा शब्द थोडा व्यंग वाटायचा. हे व्यंग या काळात गळून पडताना दिसतेय.
‘पेहरावापेक्षा व्यक्तीचे कर्तृत्व बोलके असावे’ हे मान्य असले तरी राजकारणी पेहराव हा नेहमीच चर्चेचा विषय असतो, मग तो मोदी कुर्ता असो, नेहरू शर्ट असो किंवा गांधी टोपी… त्यामुळे या सगळ्यामध्ये प्रत्येकाच्या घरात सूट पँट मध्ये वावरणाऱ्या पुरुषाला पाहण्याची सवय झाल्याने लोकांना ठाकरे त्यांच्या पेहरावातून आपलेसे वाटतात. शिवाय पुढे ढेरी तो पुढारी, हा ट्रेंड पैसेखाऊ नेत्यांचा असल्याने या पूर्वीचे बहुसंख्य पुढारी याच वर्गातले आले. पण ठाकरे त्या मानाने आदर्श नावाला साजेसे दिसता, वावरता. ज्या पद्धतीने ते परिस्थिती हाताळताना दिसत आहे, त्यावरून त्यांच्याकरता आपुलकीच वाटते, एवढे मात्र मनापासून.!
आता नेमके माझ्या बालपणातल्या पुस्तकांचे वास्तव झाले की राजकारण्यांनी पेहराव बदलण्यास सुरुवात केली हे सांगता येणार नाही. पण या सूट पँटीतल्या मुख्यमंत्र्यांने भविष्यात स्वतःच्या वर्दीला डाग नको पाडायला एवढी अपेक्षा आहे.
त्यांच्या बद्दल आपलेपणा वाटण्याचं माझं कारण म्हणजे त्यांचा कलेकडे असलेला ओढा. त्यांच्याशी कनेक्ट होण्याचं कारण त्यांच्या बोलण्यातून जाणवतं. बऱ्याच जणांना त्यांचं ते असणंच खटकते. राजकारणात कोणाला कोण आवडेल, कोणाची मते पटतील याची प्रत्येकाची कारणे वेगळी असतात, पूर्णपणे व्यक्तीसापेक्ष असतात. राजकारणातले मतभेद वैयक्तिक ताशेरे ओढण्यावर आणू नये एवढे शहाणपण आले की आपण राजकारणाच्या विषयावर बोलायला मोकळे!
#वाढदिवसाच्या शुभेच्छा
©Pooja Dheringe