वाऱ्याची झुळूक येते, प्रेम होऊन जातं…
त्या खाली उभ्या असलेल्या मुलाने तिला अलवार पाहिले. नेहमी मुली पाहतो तसचं त्याने पाहिले. मित्राच्या खांद्यावर हात ठेवत थोडी मान तिरकी करून… मला पसंत पडली मग ती माझीच, हा विचार त्याच्या बघण्यात होता.
मुलगी बाल्कनीत पुस्तक वाचत होती, हातात डायरी पेन होता, नाजूक डोळ्यांना चष्म्याची काडी होती, डोळ्यांवर केसांच्या बटांचे खेळ चालू होते,
त्याला वाटले अभ्यासू असावी, तिला वाटले त्याला शिक्षणात रस असावा…
त्याने तिच्या नजरेस नजर मिळवण्याचा प्रयत्न केला, तिने टाळण्याचा भारी प्रयोग केला…
कुठेच कसलाच थांगपत्ता नव्हता,
हा प्रेमाचा सुरंग न पेटलेलाच बरा होता…
प्रेमाला माझा विरोध कुठे होता?
पण त्याने तिच्या कृतीला नाही चेहऱ्याला पाहिले होते,
तिने त्याच्या चेहऱ्याला नाही कृतीला पाहिले होते…
तो तिच्या सौंदर्याला बघत राहिला,
ती त्याच्या नजरेत ज्योतिबाला बघत राहिली…
हा मुक ‘गैर’संवाद हळूहळू रोज घडू लागला…
बघत बघत लग्नापर्यंत विषय गेला…
तो क्षण भाळण्याचा दोघांच्यात घडला,
भविष्याच्या दीर्घ संसारातील प्रत्येक दिवसाचा कुणीही विचार नाही केला…
इथेच अडून राहिला संसार…
कसा? तो असा;
त्याला तिला घरात सजवून ठेवावे वाटे, चेहऱ्यावर मेक अप, अन् डोक्यावर पदर,
नजरेत पतिव्रतेचे भाव अन अस्तित्वहीन ती !
तिला पुस्तकांच्या शाईशी एकरूप होऊन, समाजातील रुढींचे प्रवाह बदलावे वाटे,
पण तिला कुठे ठाऊक होतं संसाराच्या रणभूमीवर हि लढाई पती अन पत्नीत होईल पहिली !
इथेच हा खेळ नजरेचा संपला,
लव्ह अॅट फर्स्ट साइट म्हणत प्रेमाचा अडवेंचर दि एंडला पोहोचला,
तिला आता त्याच्यात माय सावित्रीवर चिखल फेकणारा ‘समाज’ दिसू लागला,
अन् त्याला वाटू लागले, बुकं शिकून आता हि आपली जागा घेऊन, जागा दाखवून देईल.
हळूहळू संघर्ष जोरदार झाला,
क्षणात सुरू झालेला प्रेमाचा प्रकार
चव्हाट्यावर आला,
नाही म्हणत म्हणत प्रेमाचा उद्धार झाला,
दिखाव्याच्या प्रेमामध्ये दोघांचा खरा चेहरा नागडा पडला… जेव्हा प्रेमाच्या बुडबुड्यांचा पूर ओसरला…
प्रेमाला अपेक्षांचा वास आला,
तिथूनच हा प्रेमाचा सुरुंग प्रेमाचा विनाश करण्यास सरसावला….
वाऱ्याची झुळूक लागून वणवा मनांमध्ये पेटला,
नि शेवटी तिला कळलं,
वाऱ्याची झुळूक येते, प्रेम होऊन जातं… प्रत्येकालाच !
थोडी दूरदृष्टी ठेवून बघायला हवं, तो जोडीदार कसा आहे?
प्रेम जरी लव अँट फस्ट साइट होत असेल तर दोघांनीही पुढील आयुष्याचा पुरेसा विचार करुनच निर्णय घ्यायला हवा. प्रेमाच्या झाडाला वाढवताना त्यांच्या भल्याबुऱ्या फळांची लक्षणे अगोदरच जाणून घेतलेली इष्ट.
Totally agree 🍀🌼