“त्याच्या केवळ रंगाच्या स्पर्शाने तू इतका फिकट झालास?
आपल्यातल्या पहिल्या रंगाचा स्पर्श तू सगळ्याआधी माझ्या गालांना ईस्पेशली त्या तिळाला केला नाही म्हणून तू लाल झालास?
किती रंगीत झालाय तुझा चेहरा, तेही कुठलाच रंग न लावता कुठल्याश्या चिडचिडीच्या काळ्या रंगानी. तरीही तू आला नाहीस? तू चीडशील, रागवशील यावर. कारण तू ‘येऊ का विचारलं होतं’ तेव्हा मी नाही म्हटलेलं.
त्या वेळात ‘तो’ आला आणि रंग लावून गेलाही. पण तू आलाच नाहीस. मी नाही म्हटले पण त्या ‘नाही’तला ‘हो’चा हक्क तुला न कळण्याइतका नवा आहेस का तु? जेव्हा गालावरील तीळाला तुझा नाही त्याचा स्पर्श झाला. पूर्वी सुख मिळायचं त्याच्या स्पर्शाने. पण आज कणव आली.
आज ‘तू‘ हवा होतास नाही, आज तू ‘च’ हवा होतास. तो नाही!'”
मी जीभ चावून वैतागात सगळचं बोलून मोकळी झाले मला आत्ता लक्षात आलं होतं. शेवटी एखाद्याचं धन उघडं पडावं तशी माझी मनातली भावना बाहेर पडली.
त्या व्हिडिओ कॉलचं बटण कट करणार…
“हा मजाक नाही चालू. तुलाही माहिते माझ्याबद्दल आणि मलाही. नाही इजहार केलाय. तुलाही हे सुंदर रंगीत चित्र तसचं ठेवायचंय आणि मलाही ते चित्र उलगडवून सांगायचं नाहीये. सोप्प आहे, गायतोंडेची चित्र समजत नसली तरीही तिथल्या रंगांचा, चित्राचा, चित्रातल्या जिवंतपणाचा मोह तिथे थांबवून ठेवतो, तसं प्रेमाचं आहे. चित्र समजायचं नसतं त्याला अनुभवायचं असतं. आपण काही वेगळं करत नाहीये. जगासारख नाहीये म्हणून ते प्रेम नाही असं नाही. त्यामुळे फोन कट करू नकोस.”
माझाही ताबा सुटला आणि मी बोलायला सुरुवात केली, “काय बोलू मी? सगळ्या देहाने तुझी आस लावून ठेवली होती. तू नाही आलास… सगळीकडे रंगाची उधळण होतेय. देरी तु येण्याची आहे. आवडत्या व्यक्तीने आपल्याला तोच तो काळा, राखाडी, लाल, पिवळा, रंग लावावा पण प्रेमाच्या व्यक्तीने लावावा, एव्हढुसा सोहळा या चित्रात यावा यासाठी मनाचा हा अट्टाहास होता, तो आज व्यर्थ गेला म्हणू का?”
आता मात्र मी त्याच्यावर सोडलं सगळचं.
त्यावर तू म्हणाला, स्साला तूच म्हणायचं मला येऊ नको आणि परत हे असं. तुम्ही मुली म्हणजे रूबिक क्युब्ज असतात, आपल्याला वाटतं कोडं सुटणारे, पण गोल गोल फिरून शेवटी बोललेल्या संवादाच्या आतला अर्थ कळतच नाही… सगळं बिटविन द लाईन्सच बोलायचं असतं का? आणि तो लाख तुझ्यापर्यंत येईल, तू नाही म्हणायचं होतस ना… का तू त्याला रंग लावू दिला? तुला एकदाही मला काय वाटेल वाटलं नाही…? तू असं कुणालाही कसं रंग लावू देते? … इतका रंगाचा मोह झाला होता का?”
त्याच्या या वाक्याने माझी रंगाची लाट सळसळली, “ए हॅलो एकतर तू आला नाहीस त्यात मला काय बोलतो हां? … आणि कोणे तू माझा? मी तुझी वाट पाहायला?”
मी स्वतःवर अडून राहीले. चूक त्याचीचे म्हणत राहीले. राग अनावर होता, दोघांचाही. शेवटी त्याच घाईने माझ्याशी शब्दही न बोलता त्याने फोन कट केला. आता मात्र मीही ठरवून टाकलं, गेलं खड्यात सगळं! काय नसतं प्रेम ना होळी… सगळे मनाचे आणि भावनांचे चोचले.
आणि त्याने फोन कट केल्यानंतरच्या अर्ध्या तासांच्या माझ्या टोकाच्या विचारात असताना तो तसाच आजारातून उठून पांढरा सदरा घालून, लाल रसरसत्या रागातल्या चेहऱ्याचा करंडा घेऊन, प्रेमातल्या जेलसीच्या रंगाचा मोहरा घेऊन नजरेसमोर हाजिर झाला.
रोखलेल्या डोळ्यांत पाहून, त्याच्या असुरक्षिततेच्या अंगारात, डोळ्यांच्या कडा त्याच्या नकळत पाणावल्या होत्या. त्रागा आतून जाणवत असला तरीही दोघांच्या हृदयातील ‘भेटलो’ ती ओढ मनोमनी थंडावा देत होती. तरीही त्याच्या हालचालींत रागाचा लोहा तापला होता… त्या क्षणात एकमेकांच्या डोळ्यांत पाहून दोघे शांत होण्याचा प्रयत्न करू लागलो.
न राहवून मी म्हटलेच… आता कशाला आलास?
तो – आलो …
मी – पण का?
तो – माहीत नाही?
मी – कळल्यावर या मग.!
तो – प्रेमाचा रंग उडू नाही म्हणून.
मी – म्हणजे?
तो – जो रंग मका समोर पाहून आला ना नजरेत, गालावर आणि या स्पर्शात त्या रंगाची गोष्ट आहे ही. ती कळत नाही अनुभवावी लागते.
“ऐलान मोहब्बत का नहीं, इजहार का करने आया हूं,
तेरा आशिक बनकर नहीं, तेरा हमराही बनकर आया हूं|”
आणि अलगद त्याने दोन्ही हातांनी माझ्या डोळ्यांवर हात ठेवला. मी आतून कावरीबावरी, मन खालीवर हेलकावत स्तब्द होण्याचा अविरत प्रयत्न करीत होते, चलबिचल मन सावरते कुठे, तोच त्याने कुणी बघितलं नाही या आवेशाने अलगद एक बारीकशी मिठी मारली.
त्याच्या त्या उबदारपणाने अंगावरचा तो त्रयस्थाचा घाणेरडा रंग निलाजरा गळून पडला. त्याचा स्पर्श मऊसर होऊन माझ्या कणाकणावर स्वार होऊ लागला…
मी मिठीतुन बाहेर पडून त्याची माफी मागणार. तोच … “ए वेडे! येणारे अनेक येतील. रंग वरवर लावून हक्क दाखवून जातील. साबणाने निघून जाईल तो. पण प्रेमाच्या स्पर्शाचा रंग तो तुझ्यात मिसळवणारा तुझा असा ‘तोच‘ असेल! मीच आहे तो, खास असेल!
“आणि आलाय की तो …” मी लाजून म्हणत बोलू लागले. रंग इतका जवळ असतो? इतक्या जवळ की मिठीतून मुठभरही सुटू नये! या रंगाला होळी नाही, इश्काच्या सोहळ्याची देरी असते. हा तुझ्या मिठीचा रंग मुठभर नाही आयुष्यभर राहणारे! खास तोही. !”
स्पर्शाच्या रंगाचा ओलावा टिकून उजळून बहरून जाते आयुष्य!
त्यामुळे येत जा रंगपंचमीला!
-पूजा
छायाचित्र सौजन्य – इंटरनेट
काय बोलावे ते पण कळेना आणि किती कौतुक करू या सगळ्याच आणि कल्पना खरं अस घडत असेल का जे प्रेमात आहेत त्यांच्या आयुष्यात किंवा ते खरंच इतका विचार करत असतील जे तू लिहिले आहे… 👌👌👌 खूप छान लिहिले आहे.
खूपच छान..
अतिशय सुंदर…💜
खूपच छान.. 👌👌👌 खूप छान लिहिले आहे.
खूपच सुंदर.. खूप छान लिहिले आहे.
नात्यातला हा रंग टिकवून ठेवणे खुप गरजेचं आहे… खूप छान पैकी मांडलं आहे..👌👌