त्याच्या येण्याचं सावट पळवून लावू म्हणता,
तुम्हाला जाणवतंय का, हा रियालिटी चेक आहे विकासाचा…
तुम्ही आता करताय उपाययोजना,
तुमची आता दिसतेय धडपड केवढी,
दरवर्षी हजाराच्या घरात चित्रपट, बॅनरबाजी, दौरे जमवता,
तेव्हा उघड्या बुबुळांनी दिसत नाही सुविधांची गरज मोठी?
संकटे आली की हातपाय मारतो,
नागरिक म्हणून जगताना प्रत्येक नागरिक रामायणात न रमतो,
त्याचं पोट विकून डोक्यावर कर्ज आहे भुकेच्या तुकड्याचे,
त्याच्या राज्यात गरिबी आहे दोनवेळच्या जेवणाची!
त्याला तुमच्या सरकारने रस्त्यावर बसण्यामध्ये समाधानी केलंय…
खूप जास्त नाही स्वतःपेक्षा थोडं विकसित देशालाही असतं केलं!
भुकेने मरतोय, पाण्याने व्याकुळ होतोय,
तो नागरिक तुमच्याच देशाचा आहे का हो, जो परदेशी विषाणूपेक्षा भुकेच्या विषाणूने दरवर्षी मरतोय ?
जन्म जेव्हा माणूस म्हणून घेतला होता, तो भाव मनात आणा,
तुम्ही त्यानंतर कधी माणूस म्हणून राहिला होता?
परदेशातला विषाणू केवढा तरी नवीन आहे,
हा जन्माला घातलेला विषाणू दर सरकारच्या वेळी वाढतोच आहे.
खूप काही नाही धास्तावलेले नागरिक आहे,
त्या धास्तीमुळे एखाद दुसरा सुविधांचा अभाव पाहून मरत आहे…
चार म्हणता म्हणता हजारांवर गेली संख्या त्याला काय होते, जिथे १३६ कोटींचा जीव किड्या मुंग्यांसारखा आहे…
उद्या दिसतील कोणी त्यांच्या झोपड्यांत मेलेले, कोणी गटारीच्या कोपऱ्यावर पडलेला, काही रस्त्यांच्या दिव्यांच्या खाली… हे झाकण्यासाठी उगवतील झाडे मतदानाच्या पूर्वीच्या विकासाची!
देश तर लॉकडाऊन केला, गरिबांच्या भुकेला येईल का लॉकडाऊन करता?
एवढं टाळलं तर दिसेल १०% श्रीमंत भारत…
मेलेला भारत आजही उपासमार, गरिबी, बेरोजगारी, कर्ज, असुविधा, नैसर्गिक आपत्तींने मरतोच आहे…
उरलंय काय?
सरकारच्या खुर्चीवर दरवर्षी बसता, मतदान येण्यापूर्वीच त्याचा प्रचार तुम्ही करता,
थोडं वाकून मतांच्या बाहेर एक पेटी आहे पहा,
त्या पेटीत दर दिवशी भुकेने मेलेल्यांचे तुमच्यावर रोखलेले रक्ताने बरबटलेले डोळे तुम्हाला दिसतील.
किळस येईल, कणव येईल, पश्र्चातापाची सवय होईल,
की झालीय म्हणू?
सत्तेत नसेपर्यंत माणूस राहता तुम्ही,
सत्तेत गेल्यावर विषाणू का होता तुम्ही?