वैतागून संतापून बाहेरचा राग त्याच्यावर ओतत मी चिडचिड केली. अशा परिस्थिती समोरून समजून घेण्याची अपेक्षा असते. मी दारू घेत नाही यावर सौ टक्का बहुमत असणारा तो लागलीच म्हणाला “सटकली का तुझी की घेऊन आलीस? …”
वातावरण भडक होत चाललंय लक्षात येऊन थोडं शांत करण्याच्या तयारीत मी फोन बाजूला ठेवला. वाटलं, दोघे शांत झालो की सोर्ट होईल सगळं. पण त्याचे मेसेजेस वाढत होते मात्र शांत करण्याचे नाही.
हळूहळू परिस्थिती बदलत होती, गंभीर होत होत आधीच रागाने भरलेल्या माझ्या डोक्यात रागाने शब्दांच्या शिड्या चढायला सुरुवात केली होती…
मधेच अचानक एखादाच नात्याचा नाजूक खिळा रागाला टोचून राग शांत व्हायलाही जाणार असायचा, तोच पुन्हा तो ऐकून घेतच नाही दिसताना अजून एक पायरी म्हणत रागाच्या पायऱ्यांचा मनोरा वाढतच जात होता …
त्याच्या किंवा माझ्या बाजूने एखादाच ढिसाळ तीर सुटून मोडलेलं कोसळण्याच्या वाटेवर आलेलं होतं…
किती अणकुचीदार शब्द असतात ना,
झटकन एखाद्या नात्याला शाश्वती देता नि झटकन एखाद्या नात्याला तुटायला टोक देता…!
घटका पडू लागली होती, दोघांच्या मनात नातं तुटण्याची भीती जरी बेसुमार होती तरीही याक्षणी आम्ही दोघेही भयानक कशावर तरी चिडलेलो होतो.
त्यामुळे कित्येक वर्षांच्या नात्याच्या गळ्यात एका विश्वासाच्या विटेसह एक गळफास गच्च होत होता तेव्हा मीच म्हणाले,
“मी निघून जाईल सांगतेय…”
माझा हा टोकदार बाण ‘मला त्याच्या जवळ नेईल’ या अनुभवाच्या शर्थिवरून मी मनाच्या तळाच्या भात्यातून कचरत काढलाच होता…
तोच तो म्हणाला,
“दम देतेस का ?”
दोन टोकाच्या वाक्यांनी मधल्या फळीचा खेळ केला…
मला त्याच्याजवळ न नेता स्वतःकडे फेकलं…
विश्वासाच्या व्यक्तीवर लावलेलेल तुक्के आणि त्याच्याकडून केलेल्या अपेक्षा दोन्हींतून झालेला अपेक्षाभंग तीक्ष्ण असतो.
मी चिडलेली असताना काहीतरी रिऍक्ट होणार त्या आधीच त्याचंही टोक ठरलेलंच असेल ना हा विचार मी केलाच नव्हता. त्यामुळे खूप सहज दोघांनी दोन टोकं गाठले होते.
त्याच रात्री भरधाव पावसाच्या वेगामुळे लाइटी गेल्या होत्या. काळोखाच्या सोबतीला आसवांचा पाऊस मनासह व्यक्तीच्या आठवणींच्या थेंबांनी गालावरही पसरला होता… लाईटीचा सूक्ष्म आधारही नव्हता म्हणून मनसोक्त रडून घेत होते, शेवटी ताज्या आठवणींनी स्वतःला शांत करत झोपेचा एक प्रयत्न म्हणून मी रेडियो लावला…
“ये दिल क्या वफ़ा को समझता भी हैं ?”
वाह रे उपरवाले …
बड़ा मजा आता होगाना तुम्हें,
जो उस पर आया गुस्सा भी बड़े रेहमी से मुझे लौटा दे रहा हैं।
आणि नकळत माझ्या मनातल्या प्रत्येक रंगीत आठवणीवर पांढरा चाफा ठेवत जाऊन ओठांवर प्रेमाच्या कळीचे शब्द उमटू लागले,
“क्यों होता हैं प्यार.? ना तुम जानो न हम| ”
पण …
सगळं संपलं…
.
.
.
असं मी म्हटलेच असतं, जर त्या नात्याच्या गळ्यात ती वर वापरलेल्या वाक्यातली विश्वासाची वीट दिली नसती तर…
मग काय रात्री रुसलेली रात्र नव्या सूर्याला घेऊन, त्याने
‘शुभ प्रभात’ म्हणताच मी मॉर्निंग रडक्या… लिहून परतवून लावली.
खरे रात्रीचे खेळ तर हे प्रेमी युगल करतात. जे रात्रीत कितीशा क्षणांची चिमूट ठेवून जातात, काही लक्षात राहण्यासाठी काही रात्रीच्या पापण्यांसह मिटण्यासाठी !
त्यानंतर मला आठवलं, भांडणाच नाही, “त्या विटेचं त्या नात्यात अडकून राहणं…”
विश्वासाची वीट घट्ट ठेवा, एकमेकांवरील विश्वासाची वीट एकवेळ कमकुवत होईल पण जर तीच वीट कैक वर्ष एकमेकांच्यात मिसळून प्रेमाच्या विश्वासाची वीट बनली असेल तर कुठलाच सहज क्षण त्याचा मालिक होणार नाही.
विश्वासाची वीट घट्ट ठेवा, एकमेकांवरील विश्वासाची वीट एकवेळ कमकुवत होईल पण जर तीच वीट कैक वर्ष एकमेकांच्यात मिसळून प्रेमाच्या विश्वासाची वीट बनली असेल तर कुठलाच सहज क्षण त्याचा मालिक होणार नाही.
वरील मजकूर वाचण्यापुरता मर्यादित असतो. हल्ली अस काही होत नाही. अर्थात टाळी एका हाताने नाही वाजत हे लक्षात असावं… पण नात्याला उलगडायला वेळ द्यावा. नक्कीच द्यावा.. पण इतका पण नाही की नाते कधीच जुळणारच नाही.