सर्वाईवल एवढा एकच पर्याय असेल, त्याबदल्यात आत्महत्या करायची नसेल तर कसं स्वतःला स्वतःच्या कमजोरी विरुद्ध उभं करावं लागतं याची खूप नेटकी जुळवणुक ‘क्रिमिनल जस्टिस’ या वेबसीरिजमध्ये केली आहे. विक्रांत मेस्सी तसा आपला आवडता अभिनेता. पण त्याच्या पाठोपाठ पंकज त्रिपाठी, जॅकी श्रॉफ, अनुप्रिया गोयंका यांच्या अभिनयाने क्रिमिनल जस्टिसला वेगळा सिरियसनेस येतो. कुठेच लिंक तुटत नाही. सिरीज शेवटपर्यंत आपल्याला बांधून ठेवते. जसं स्त्रीच्या नजरेतून दिसणारे काही पुरुष हरामखोर असतात. पण सगळेच पुरुष वाईट नसतात, हवसची नजर प्रत्येकाची नसते, गुलामीची वागणूक प्रत्येकाची नसते हे ही सिरीज सांगते.
पुरुषसत्ताक संस्कृतीने बाईचे होत आलेले नुकसान जगजाहीर आहे. पण पंकज त्रिपाठी जेव्हा म्हणतो, “दस सबूतों पर भी भारी एक स्त्री की गवाही हैं। ” तिथे खाडकन डोळे उघडतात. कधीकधी वाटतं पुरुषांनी जर स्त्रियांवर होणारे अन्याय त्यांचं स्वतःचं आयुष्य म्हणून पाहिले तर हे जग हळूहळू कित्ती न्याय्यप्रिय होत जाईल. इथे समानता प्रस्थापित व्हायला वेळ लागणार नाही.पण आताच्या काळात घरात जरी स्त्रीला समान वागणूक नसली तरी कायद्याने तिला जवळ केलं आहे. पण म्हणून “प्रेम करू पाहणारा प्रत्येक पुरुष स्त्रीच्या शरीरासाठी येतो, हा जुना कथित वाद आता मिटायला हवा.” प्रेम हे दोघांचं स्वातंत्र्य आहे. त्यातून मिळणारा आनंद, प्लेजर, दुःख हे त्या दोघांचं आहे. पण म्हणून मुलगी बेपत्ता झाल्याची, मारहाण झाल्याची किंवा बलात्काराची केस आली की पहिला संशय बॉयफ्रेंडवर घेणारी पोलीस यंत्रणा आहे. संशय घ्यावा मान्य आहे, पण त्याच व्यक्तीला गुन्हेगार समजून तपास केल्यामुळे त्या घटनेच्या इतर बाजू बंद राहतात आणि कायद्याकडून अन्याय होण्याची शक्यता निर्माण होते. या सिरिजचे कुठलेच शॉट्स मी सांगणार नाही. कारण प्रत्येक गोष्टीला आधीच्या गोष्टीचा आधार आहे. मी नेहमी कुणाला काही बघण्यासाठी सुचवताना सांगते, एखादी सिरीज बघायची की नाही ते कुणाच्या बोलण्या लीहिण्यावरून ठरवण्यापेक्षा ४० मिनिटं त्या निर्मितीचा आनंद घ्या. पुढे वाटलं तर पहा नाहीतर व्यक्तीस्वातंत्र्य आहेच. सीरिजमध्ये खरचं प्रत्येकाचं काम इतक्या क्लासिक लेव्हलचे आहे की प्रत्येकाला त्या घटनेला न्याय द्यायचा आहे. विक्रांत मेस्सी हा छोट्या उंचीचा कलाकार मिर्झापूर नंतर क्रिमिनल जस्टिसला कमालीच्या उंचीवर नेऊन ठेवतो. पंकज त्रिपाठी बद्दल तर काय बोलावं? तो कलाकार इतका सर्वसामान्य आहे की तो आपला यार वाटतो. या सीरिजमध्ये तो फक्त आपल्या भोवती फिरत असतो. आपण या केसचे इंवेस्टिगेशन सुरू असताना कुठे काही मागे पुढे झालं की ‘त्रिपाठीजी कहां हो आप। क्या कर रहे हो’ असं आपण हक्काने मनात म्हणून मोकळे होतो.
तिसरा एक्का म्हणजे जॅकी श्रॉफ! काय तो लूक आहे. म्हणजे इतका खुफिया तरीही मोठ्ठा आधार वाटणारा एक कैदी. त्याचा भूतकाळ ही आकर्षक बाब असली तरी त्याचं या सिरीज मध्ये असणं या सिरिजला मोठ्ठं करतं. असं वाटतं या वयातही ते त्यांच्या अभिनयाला चकाकी देताय. एपिसोड दर एपिसोड श्रॉफ आपल्याला अधिक पैलू दाखवत जातो. त्याचे हात, डोळे आणि डोळ्यांच्या खुणांचा वापर करणं दिग्दर्शकाला उत्तम जमलय आणि ही सिरीज नकळत या पिढीच्या प्रश्नांना इंटरेस्टिंग पद्धतीने वाचा फोडते. सिरीज दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया याला चांगलंच माहितीये की ही सिरीज कोणता औडीएंस बघणारे. त्यामुळे त्याने ज्या पद्धतीने पडद्यावर सीन्सची अलाईंमेंट केली आहे त्याने आपल्याला काय चूक काय बरोबर यातली रेष उमगत जाते. अनुप्रिया गोयंका म्हणजे या सिरीज मध्ये अगदीच इंटर्नच्या भूमिकेत वाटते. पण तिला हलक्यात घेऊ नका. ती छोटा पॅकेट बडा धमाका ठरते. ती हळूहळू केसमध्ये येते आणि त्याचा ताबा घेते. आपलं मन काय कौल देईल याचं प्रतिबिंब म्हणणे गोयंका. ही वकील साहिबा जितकी साधी सोपी, तितकीच प्रभावी आहे. तिच्या सोबतीला अनेक सपोर्टीव कलाकार आहेत. प्रत्येकामध्ये सिरीजला जस्टिस देण्याचा जजबा आहे. तो जज्बा पडद्यावर रंगत आणून प्रेक्षकांसाठी बिंज वॉच करण्यासारखा कंटेंट क्रिएट करतो. बलात्काराच्या घटना खूप पद्धतीच्या असतात. पण कुणीतरी तळतळाटाने मरतं आणि एक हवसी पुरुष त्याला जबाबदार असतो हे दुर्दैवी आणि अमानुष असतं. पण एखाद्या निर्दोष तरुणावर हा ठप्पा जेव्हा लागतो तेव्हा काय काय घडू शकतं हे ही सिरीज सांगते.
काही घटना अशा असतात ज्याच्यावर आपण संयमाने विचार करू शकत नसतो त्यामुळे आपण नकळत एका निष्कर्षापर्यंत पोहोचतो आणि तो निष्कर्ष खरा मानून पुढच्या गोष्टींना हाताळतो. बलात्कार, अपहरण, विनयभंग या घटनांबाबत कधीकधी असच घडतं. पण कदाचित खूप कमी केसेसमध्ये. पण म्हणूनच कायदा म्हणत असतो, शंभर गुन्हेगार सुटले तरी एका निर्दोषाला शिक्षा होता कामा नये. पण आताच्या या जगात अशा गुन्ह्यासाठी अनेक पळवाटा आहेत. सत्याच्या पण अनेक बाजू आहेत. त्यामुळे नेमकं कोणाचं खरं जगजाहीर सत्य मानावं हे ठरवणं कठीण होऊन बसलं आहे. अशा अनेक प्रश्न, उत्तरांची आणि समाज, तुरुंगाची प्रतिकृती दाखवणारी ही सिरीज शेवटाला आपल्यात अनेक उत्तरं सोडून जाते, अनेक प्रश्न देऊन जाते.
– पूजा ढेरिंगे