मुलींच्या आयुष्यातल्या प्रश्नांची ‘दहाड’

  • by

एखादा अभिनेता एकाच वेळी हिरो, विलन, कॉमन मॅन ही पात्र साकारू तर शकतो पण प्रेक्षकांना पटवून देऊ शकतो की ही सर्व पात्र वेगळी असून एकच आहे, ती ताकद विजय वर्माच्या अभिनयात आहे.
तो नखशिखांत शांत राहण्याचा अभिनयातून प्रेक्षकांना खिळवून ठेवू शकतो, हे पटतं.
सध्या अमेझॉन प्राइमवर ट्रेंडिंग असलेल्या “दहाड” वेबसिरिजमधला त्याचा अभिनय टॉप नॉच आहे. त्याचा राग येतो, चिडचिड होते, दया येते आणि असे काबिल ॲक्टर पडद्यावर पाहिल्यावर फक्त त्या कथेत गुंतायला होतं. काही कलाकार पडद्यावर आले की त्यांची जुनी इमेज घेऊन येतात त्यामुळे बऱ्याचदा त्या पात्राला न्याय मिळत नाही. विजय वर्मा मात्र डिटेलिंगवर काम करणारा ॲक्टर वाटतो.
सोनाक्षी सिन्हा कधी खूप आवडली किंवा खूप नाही आवडली अस झालं नाही. तिच्याबद्दल कधीच ठोस मत नव्हतं. पण ही सिरीज बघताना तिचे भाषेवरील प्रभुत्व, हावभाव आणि धाकड लूक तिच्या नावापेक्षा भूमिकेला जास्त पाहायला भाग पाडतो.
“घरात मुलगी जन्माला येते, मग जन्मापासून तिची इज्जत वाचवायची, मग थोडफार शिक्षण द्यायचं आणि समजण्याचं वय झालं की लग्नासाठी स्थळ पाहायचे आणि त्यातही हुंडा घेतला जातो म्हणून मुलीचा जन्मच कसा वाईट हे सांगायचं.
हुंडा द्यावा लागतो म्हणून मुली लग्नाच्या अमिषाला बळी पडतात. मागास जातीचे असल्यामुळे मुली सहज फसव्या मुलाच्या जाळ्यात अडकतात. याला तोंड काळं करणं समजलं जातं आणि वर त्या घरून पळून गेल्या तरी घरचे त्यांना शोधण्याचा साधा प्रयत्नही करत नाही. उलट हुंडा द्यावा नाही लागला तिची ती पळून गेली म्हणून थोडे निश्चिंत होतात. याचा फायदा कसा घेतला जातो आणि यामुळे कितीमुलींचे जीव जातात” असा काहीसा या सिरिजचा विषय आहे. यात विलनच्या भूमिकेत असलेला विजय वर्मा कमालीचा कलाकार वाटतो. त्याच्यामुळे सिरीजचा मूळ गाभा अधिक सिरियस वाटतो.  सोनाक्षी आणि गुलशनमुळे सिरीजला वेटेज येते.
सिरीजमध्ये असलेली प्रत्येक मुलगी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या मुलींची भूमिका करते. काही मुली जुन्या पिढीतील नैतिक मूल्य असणाऱ्या मुलींच्या भूमिकेत आहे तर काहीजणी मॉडर्न बनून पुढे जाऊ पाहत आहे.
समाजाने घालून दिलेल्या पायंड्यातून निर्माण होणारी परिस्थिती कशा पद्धतीने सामाजिक घटकांच्या मेंदूशी खेळ करते, सामाजिक रूढी, परंपरांचा गैरफायदा घेऊन कशाप्रकारे जीव गमवावे लागतात याची लिंक खूप विचारपूर्वक दाखवली आहे.
एकंदरीत जुन्या परंपरा, जाती व्यवस्था, मुलींचे समाजातले स्थान, इंटरनेटचा वापर, स्वतंत्र स्त्री आणि कॉमन माणसात लपलेला गुन्हेगार या सगळ्यांचा मेळ म्हणजे दहाड!
सिरिजची उत्सुकता तेव्हा जास्त वाढते जेव्हा या घडणाऱ्या गुन्ह्यामागे गुन्हेगाराच्या मनात चाललेले विचार प्रेक्षकाला सुद्धा माहीत नसतात. गुन्ह्याचे कारण कळले की गुन्हेगाराबद्दल काहीतरी तर भावना प्रेक्षकाच्या मनात तयार होत असते. पण या सिरीज मध्ये ६ व्या एपिसोड पर्यंत कसलाच मागमूस लागत नाही.
त्यामुळे सिरीज बघताना इंटरेस्ट डेव्हलप होतो. मध्येच सिरीज थोडी स्लो होते, कधीतरी लिंक तुटते. पण एकंदरीत मांडणी, विषय आणि अभिनयात सिरीज बाजी मारते.
– पूजा ढेरिंगे
#दहाड #DahaadOnPrime

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *