प्रेम लपवणं सोपं की प्रेमात लपवणं सोप्प?

  • by

आपण स्वतः केलेलं पाप आपल्याला आठवत नाही. आपण स्वतःला तितकं परफेक्ट मानत असतो. पाप आणि मी ? अशक्यच … छे छे!
हे एवढं शुद्ध बोलून आपण आतमध्ये लपवलेली ती गडद बाजू झाकू पाहतो ज्यामुळे आपली प्रतिमा ढासळणार नाही. शेवटी या समाजात स्वतःचं पाप स्वीकारून आपण स्वतःला समाजाच्या ताब्यात दिल्यासारखे होतं.


पण एक सांगू का, तुमच्या आजूबाजूचे लोक समाज नसतात. त्यांच्याशी याबद्दल बोलायचं असतं. कारण पाप म्हणजे एखादा क्षण नसतो, घटना असते. त्या घटनेत तुमच्या व्यतिरिक्त कुणीतरी असतं. त्यामुळे तुम्ही सांगितलं नाही तर ते पाप कधीच कुणाला कळणार नाही, हा भ्रम तितकाच खरा जेवढे पाण्यावर तरंग. कारण भूतकाळ कधीच भूतकाळ बनून संपलेला नसतो. तो तुमच्या वर्तमानात असतो, भविष्यातही असतो. व्याकरणात त्याचं स्थान संपल्यात जमा असतं. आयुष्य मात्र भूतकाळाच्या पायावर पुढे जात राहतं. त्यामुळे जेवढे आपण भूतकाळात एखाद्या घटनेत अडकलेले असतो, तेवढंच भूतकाळ आपल्यात अडकून जातो, आयुष्यभरासाठी!


त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या इनमीन लोकांना समाज समजू नका. त्यांना तुम्ही केलेल्या पापाबद्दल किंवा चुकीबद्दल खरं सांगून टाका. स्वतः विश्वासाने, खरेपणाने कबूल केलेली चूक जास्त त्रासदायक वाटत नाही, जेवढी ती चूक बाहेरून कळल्यावर वाटते.
आणि चूक कबूल करताना फक्त चूक सांगून मोकळे होऊ नका. त्या घटनेनंतर तुमच्यात किती वेगळे बदल झाले, कोणकोणती भावनिक आव्हानं आली तेही सांगा. यामुळे त्या घटनेचं अस्तित्व भूतकाळात राहतं, त्यातून तुम्ही जे शिकलात ते तुमच्या वर्तमानात दिसतं आणि भूतकाळात तुमच्या वाट्याला अशा गोष्टी आल्या तर तुम्ही कसा सामना कराल हे ऐकणाऱ्या तुमच्या व्यक्तीला कळतं.
मला माहितीये, आपलं पाप/ आपली चूक कबूल करणं सोपी गोष्ट नसते. पण माणसाने पाण्यासारखे असावं. जे असावं तेच दिसावं… आणि अशी माणसं कधीच कुठल्या दडपणाखाली जगत नाहीत. काही चुका अक्षम्य असतात, पण त्याने क्षण दरक्षणाला येणारं ओझं त्याहून दुप्पट असतं.

योग्य वेळेची वाट पाहत असाल तर ती वेळ कधीच येत नसते. तुम्ही ठरवता ती वेळ योग्य असते.

नातं लपवणे सोपं की, नात्यात लपवणे सोप्प? दोन्हीही तेवढेच अवघड आहे. त्यामुळे ज्या नात्याच्या तुटण्याची एवढी भीती ते नातं तुमच्यासाठी एवढं महत्त्वाचं आहे तिथे लपवण्याची चूक करू नका. किमान तुम्ही स्वतःला वेदनेतून मुक्त कराल, स्वतःशी प्रामाणिक राहणं हा गुण माणसाला समाधानी बनवत असतो आणि आयुष्यात भरभरून देत असतो.

-पूजा ढेरिंगे

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *