मुली थोडी सजग हो!

  • by


कालचीच गोष्ट आहे. फर्ग्युसन रस्त्यावरून दहाच्या सुमारास परतत असताना ओला, उबर मिळत नसल्यामुळे मीटरची रिक्षा घ्यावी म्हणून आम्ही सोबत असलेली छत्री वगैरे सगळं बॅगेत टाकत होतो. त्यावेळी आमच्या मागे एक रिक्षावाला येऊन थांबला होता. तो आमचं बोलणं ऐकत असावा किंवा फक्त बघत असावा. पण आमच्यात जास्त अंतर नव्हतं. माझं अधेमध्ये सगळीकडे लक्ष असतं. मग आम्ही निघताना त्याने आम्हाला विचारलं, कुठे सोडवायचे का? त्याला सरळ तिथे “नाही” म्हटलं. पुढे एक रिक्षावाला होता, त्याला थांबवून विचारलं. तर मिटरचे पैसे देऊन वर तीस रुपये द्यावे लागतील म्हणे. मला ते काही पटलं नाही. मग आम्ही दुसरी रिक्षा बघण्यासाठी पुढे चाललो तर याने पुन्हा विचारलं, “कुठे जायचंय?”
मग मी त्याला कुठे जायचं हे सांगत असताना तो माझ्या कमरेपासून, छातीकडे नंतर मानेकडे असं करत सगळीकडे बघत राहिला. त्याचं लक्षही नव्हतं मी त्याला पत्ता सांगतेय याकडे. माझं बोलून झाल्याचं लक्षात आल्यावर तो म्हणे “हां चला मिटरने जाऊ, वरचे एक्स्ट्रा पण देऊ नका.”
पण त्या काही मिनिटात त्या माणसाची जी वृत्ती प्रतिबिंबित झाली. त्यामुळे बहिणी सोबत दुसरा रिक्षावाला बघण्यासाठी तिथून लागलीच पाय काढला. आम्ही पुढे गेल्यावर तो मागुन म्हणायला लागला, “काय झालं मॅडम चला ना मी नेतो, तुम्ही म्हणताय तिथे.”
त्याचे ते शब्द प्रासंगिक होते. त्यावेळी ज्या पद्धतीने त्याने ते वाक्य बोललं त्यामुळे त्याच्या वृत्तीचा कमाल अंदाज तिथे असणाऱ्या कोणालाही आला असता. कदाचित त्यामुळेच आधी तीस रुपये जास्तीचे द्यावे लागतील, म्हणणारा रिक्षावाला नंतर फक्त मीटरने जे होतील ते द्या म्हणून तयार झाला.

ही गोष्ट तशी सत्तर टक्के मुलींच्या आयुष्यात घडलेली किंवा घडणारी आहे. आपण मुली आहोत, म्हणून आपल्याला या समाजात खूप चुका दिसतात. आपल्याला वाटतं, कुणी तीसर्याने आपल्याला आपल्या परवानगीशिवाय पाहू नाही. पण समाजाचे डोळे, कान आणि वृत्ती आपल्या हातात नाही. अशावेळी आपल्याला आपली नजर आणि intuition चौकस ठेवावे लागतात. जसं पहिल्या रिक्षावाल्याची नजर वाईट होती, तशी दुसऱ्या रिक्षावल्याची नियत चांगली होती. सगळेच वाईटही नसतात पण म्हणून सगळेच चांगले असतील अस नाही. कुणीतरी आपल्याला कमी पैशात काही देऊ करतोय, म्हणून भुरळून जाऊ नका. या प्रसंगातून अनेक गोष्टी समोर येतात. या जगात नजर आणि नियत यामुळे आपली बऱ्याचदा फसवणूक होते. ती होणं साहजिक आहे. कारण काही लोकं दिखावा इतका खरा करतात की आपल्याला खऱ्या खोट्याचा अंदाज येत नाही. पण सांगायचा मुद्दा हा आहे की, या अशा पुरुषी वृत्तीचा खात्मा होईल तेव्हा होईल पण आपण सतर्क राहायला हवं. म्हणून घरकोंबडी बनून घरात रहा, हा पर्याय नाही. कारण यात आपली चूक काहीच नसते. मुलगी आहेस म्हणुन नाजुकपण, अदाकारी हे गुण दैवी आहेत. ती खूप स्पेशल आहेत, पण आपल्याला सगळीकडेच तसं वागून चालणार नाही.

मुक्त वावरावे वाटत असले तरीही वास्तविक परिस्थितीचे भान असायला हवे. कुणालाही तुमच्या परवानगी शिवाय तुमच्यापर्यंत पोहोचू देऊ नका, इतकं स्वतःला सुरक्षित ठेवा, जपा!

– पूजा ढेरिंगे
Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *