प्रेम हे वृत्तीत असेल तर खरंच लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज किंवा मग लिव्ह इन यांनी फरक पडतो? ज्या व्यक्तीला प्रेमच करायचे किंवा द्यायचे त्याला अशा लेबल्स आणि कारणांची गरज वाटत नाही.
लिव्ह इन रिलेशनशिप कल्चर आपल्या संस्कृतीत मोठ्या प्रमाणात प्रॅक्टिस केले जात नसले तरी काल दिल्लीत झालेली घटना आपल्याला हादरून टाकते आणि लिव्ह इनमध्ये राहून लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचणे खरंच वर्थ आहे का? ही शंका निर्माण करते.
मन व्याकूळ होतं कारण त्या दोघांनी स्वतंत्र निर्णय घेऊन सुद्धा एका आयुष्याची राख झाली. तीही तिच्या हक्काच्या म्हटल्या जाणाऱ्या, ज्याच्या सोबत ‘जगण्याची’ स्वप्न रंगवली त्याने मरण्याचा अमानुष प्लॅन केला. यात सगळे लोक कोणाचं चुकलं, कोणाचं बरोबर याचे निष्कर्ष लावतील. तसं पाहायला गेलं ना येणाऱ्या अनेक पिढ्या आता पूर्वी सारखं डीप प्रेम करणार नाही. कारण उपलब्ध असलेले मोबाईल आणि त्यामुळे सतत भरकटणारे, प्रेमात गटांगळ्या खाणारे मन… इनबॉक्सला चॅटिंगचे पर्याय, त्यासाठी उपलब्ध असलेले तरुण-तरुणी यामुळे प्रेम या भावनेला क्वचितच एकमताने (म्यूचुअली) जवळ केले जाईल.
विचार केला तर लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे प्रेम भावनेतून दोघांच्या संमतीने लग्न न करता एकत्र राहणे. मग यात “लग्न न करता आणि दोघांची संमती” या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक विषयाचे काही तोटे, काही जमेच्या बाजू असतात. दिल्लीत झालेल्या केसमध्ये दोघांची संमती होती. तिची सुद्धा होती. अरेंज मॅरेज करून घरच्यांच्या संमतीने केलेल्या लग्नांमध्ये सुद्धा रॉकेल टाकून बायको, सुनेला पेटवले जाते. त्यामुळे हा बदलत्या नात्यांचा दोष नाही.
माणसं चुकतात. माणसांच्या वृत्ती वाईट असतात आणि हे सगळं होताना आपण माणसं ओळखायला चुकतो. आपला प्रियकर/ प्रेयसी आपल्याला आदराने बोलत नाही. शिव्यागाळ करते, थोडं काही झालं तर हात उगारते. ही सगळी मानसिक आणि शारीरिक हिंसाच आहे. शिवाय ज्या माणसाला तुम्ही स्वतः निवडतात, त्याला तुमच्याकडून हे हवे आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारा. प्रेम केलं म्हणून प्रेम तुमच्याकडून या गोष्टी मागत नसतं.
प्रेमातसुद्धा तुम्हाला स्वतंत्र आयुष्य जगता आलं पाहिजे. फक्त एकाचेच विचार ऐकले जाताय, त्यावरच अंमल केलं जातंय याला प्रेम नाही म्हणत.
या केस मधून एवढंच शिकणं शक्य आहे की, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या परिस्थितीत माणूस बदलत असतो. आपली माणसं आणि प्रियकर/ प्रेयसी हे सुद्धा माणसं असतात. त्यामुळे त्यांच्या कृतीचा पदोपदी अर्थ आणि हेतू लक्षात घेणं आवश्यक आहे. याचा अर्थ प्रेमात शंका घेत रहा असा नाही. पण “माझा तुझ्यावर विश्वास आहे” या भ्रमात राहून समर्पण करू नका. शंका आल्यास प्रथमदर्शी जोडीदाराशी बोलून पहा, तरीही काही वाटल्यास त्याची पडताळणी करून ती शंका सिद्ध करायला हातात काही असेल तरच तर्क लावा.
प्रेमात अनेक गोष्टी शक्य आहे, तडजोडी कराव्या लागतात. पण ‘प्रेमाचा’ फायदा घेतला जात असेल तर तुम्ही फसवले गेले आहात.
- पूजा ढेरिंगे