सतत कशाच्यातरी शोधात आहे…

  • by

आताच्या घडीला, आमच्या पिढीतली प्रत्येक मुलगा/ मुलगी कशाच्या तरी शोधात आहे. ते शांत दिसले तरी ते शांत राहत नाही, ते रस्त्याने जात असतील तरी शांत राहत नाही, मुली जवळ बसले तरी शांत राहत नाही, ते शांत बसूनही शांत राहत नाही, ते एकटक पाहत असूनही शांत राहत नाही…
ते प्रत्येकवेळी कशाच्यातरी शोधात असतात… हा शोध कधीतरी डोक्याच्या अडगळीत पडलेल्या एक एक एक एक विचारांचा असतो तर कधी एकदाचा डोकं दुकानासारख बंद करणारा असतो…

त्यांना मुलीला डेट वर न्यायचं, त्यांना कामही करायचं पण त्यांच्यावर घराची जबाबदारीही असते. हे सगळचं आधीही होतं पण तरी आता त्याला रूटीन मध्ये रमून चालत नाही. त्याला त्याचा बार शोधावा लागतो, त्याला रोज सोशली काहीतरी द्यावं लागतं. ऑडिएन्स वाढलाय त्याच्यासाठी त्याला रोज बलिदान द्यावे लागतं. सोशल मीडिया आलं तशा संधी आल्या तशी सगळ्यांची लागली. सतत डोक्यात हे करायचं ते करायचं, त्याच्यापेक्षा वेगळं कसं याच्यापेक्षा वेगळं कसं … मग ओरिजनल कसं डूपलिकेट कसं ? …
एवढं होऊनही सतत स्क्रीनच्या भिंतीवर तो सतत कशाच्या तरी शोधात असतो.

लोक त्याच्या प्रेमाला नावं ठेवतात, लोक तो आई वडिलांचा अनादर करतो त्याला नावं ठेवतात, लोक तो युट्यूबर, फोटोग्राफर आहे म्हणूनही नावं ठेवतात. या लोकांच्या नावांनी तो बेनाम होऊन भरकटत जातो.
त्याला फरक पडतो, नि पुन्हा मोकळ्या रस्त्यांवर शोधू लागतो तो काहीतरी… कशाच्यातरी शोधात तो सतत असतो…

रात्री शांत झोपणारी भारतीय संस्कृती आता मुलं चार चार पर्यंत जागता म्हणून फक्त ओरडते, कधीतरी त्या रात्रभर बसून एडिट केलेल्या व्हिडिओ पिसला बघावं ही स्पर्धा पॅशन ची जन्माला आली आहे …
ही शांतता हवीय सगळ्यांना, अगदी नोकरी करणाऱ्यापासून बेरोजगारांना… सगळ्यांना गच्चीवर झोपून आकाशातल्या चांदण्या मोजायच्या पण आता गच्चीवर चार्जर नाही म्हणून तेही बलिदान करायला तयार झालो आम्ही, तरीही सूर्य उगवण्यापर्यंत सतत शोधात असतो कशाच्या तरी….

शेवटी तुझे घरचेच आहे, तुझ्यासाठी चांगलंच बघतील, म्हणणाऱ्यांना कसे सांगायचे, आता घटस्फोट फक्त मुलीच्या आडमुठेपणामुळे किंवा मुलाच्या दारू पिण्यामुळे न होता ऑनलाईन डेटिंग, ऑफिस सेक्रेटरी, डिलीव्हरी बॉयमुळेही होतात. त्यामुळे खऱ्या प्रेमाच्या शोधात ते कधीच नसतात.. पण तरीही ते कशाच्या तरी शोधात सतत असतात.

एका क्लिकने आयुष्य बदलतं, एका क्लिक ने वाट लागते… भीती नेहमी याचीच असते त्यासाठी कायम डिप्रेस्ड राहून सतर्क राहावं लागतं. भावनिक राहून इथे भागत नाही, अभ्यासात मंद चालेल तंत्रज्ञानात अडून चालत नाही.
त्यामुळे डोकं त्यांचं आधीच्या पिढीत ठेवण्यापेक्षा त्यांना नवे मजबूत नि या पिढीत टिकून ठेवतील असे पंख बनवायला मदत करा नि मग खुशाल म्हणा, “मोठे झाले नि पंख फुटले यांना ….”

त्यांचा शोध चालूच राहील सतत अगणित, कारण त्यांचं विद्यार्थी होणं अखंड लांबलय. आधीसारखं थांबून घरचे सांभाळत नाहीत, आता ज्याचं त्याचं ज्याच्या त्याला उडावं लागतंय, त्यासाठी शोध हा कायम ठेवावाच लागतो, आयुष्यभर विद्यार्थी बनावच लागतं, जगाच्या भरकटलेल्या स्पर्धेत पडून स्वतःला शोधून जिंकावच लागतं ….

शोध हा अखंड चालू राहील…

  • पूजा ढेरिंगे
Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *