घरात पाऊल टाकताच आत आपल्या माणसांचा आवाज नसेल तर त्या निर्जीव भिंती एक भीषण देखावा वाटतो… गणपतीत उभारतात तसा अबोल देखावा!
या घरातला एक व्यक्ती नाराज आहे. कारण त्याच्या घरात आई नाही, दिवाळी जवळ आली की कमी भासते. आजी नाही तर फराळाला पूर्वीची चव नाही, कमी भासते. दिवाळीला नवे कपडे नाही, बापाची कमी भासते. दिव्यात तेल घालताना घर उजळत पण दिव्यातला प्रकाश मनापर्यंत पोहोचत नाही… बहीण भावंडं भेटत नाही तर मामाच्या गावची आठवण येते… सरकार फटाक्यांवर बंदी टाकतं, त्याचं फारसं दुःखही होत नाही… आकाश कंदिलाला आता आकाश दिसत नाही…
जगात सगळीकडे दिवाळी आहे, पण या घरात गमावलेल्या अनेक गोष्टी आहेत. त्या व्यक्तीची सणांवर नाराजी साहजिक आहे. पण तरीही त्या घरात सणाचं पावित्र्य अबाधित आहे. जपलं जात आहे.
त्याला आईचं नसणं खायला उठतं, त्रास देत राहतं. आजीच्या सुरकुत्या पडलेल्या हातांमधला गोडवा डोळ्यात ओलावा आणतो. बापाचं हक्काने कटाक्ष टाकणं सगळं एखाद्या खोट्या स्वप्नासारखं वाटू लागतं. गावी जाऊन सणाची मजा लुटावी तर गावचं घर त्यालाच प्रश्न विचारतं, “या घरातली माणसं कुठं गेली?” तो फ्लॅटमध्येच दिवे लावून एकटक पाहत राहतो, शेजारच्या घराकडे…
त्याच्या शेजारच्या घरात सगळं आहे. पूर्ण कुटुंब, मोकळं आकाश, प्रत्येक माणसाकडे चैनीच्या वस्तू आहेत. घरात आई, आजी, बाप आहे… पण घरात वाद आहेत. भांडण तंटे इतके नेहमीचे आहेत की तिथे कुठल्या दिवाळीचं हसणं नाही, ना बागडणं आहे. त्यामुळे शेवटी घरात फक्त माणसं असून भागत नाही. ती माणसं एकमेकांना धरून राहणारी हवी. मुक्त व्हायला कोणाला आवडत नाही, पण त्या मुक्ततेत कोणाचं तरी पारतंत्र्य बंदिस्त नको व्हायला. एकमेकांना त्यांचं आयुष्य जगू देणारं, सामंजस्याने एकमेकांच्या अस्तित्वाचा आदर करणारं आणि एकत्र आल्यावरही मुक्त राहू देणारं कुटुंब असायला हवं. ज्याला कुटुंबाची कमी भासते ती कमी शेजारच्या घरात पूर्ण होते. पण शेजारच्या घराला त्याची किंमत नाही. त्यामुळे याने गमावलेली माणसं आता नसली तरी त्यांचा सहवास त्याला आजही सुखावतो. त्यामुळे जे आपल्याकडे आहे त्याची कोणालातरी नितांत गरज असेल. या विचाराने तरी त्या क्षणी परिपूर्ण जगा, त्या क्षणाला न्याय द्या !
शेवटी सगळं मानण्यावर असतं, काही उदरनिर्वाहासाठी सणाची आतुरतेने वाट पाहतात. काहीजण कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी वाट पाहतात, तर काहीजण नव्या वस्तूंची रंगत लुटावी म्हणून वाट पाहतात. माझी दिवाळी कोणासाठी तरी पोटा पाण्याचा प्रश्न आहे. कोणाचीतरी दिवाळी माझं भविष्यातील स्वप्न असेल. सणाच्या दिवशी कुणाला नाराज करायचं नाही. पण एवढं नक्की सांगेल, जगातल्या प्रत्येक माणसाने त्याच्या आयुष्यात खूप मौल्यवान अस काही गमावलेले असतं किंवा गमावणार असतो. त्यामूळे इतर कोणाचं बघून तुमचा सण साजरा करण्याची पद्धत बदलू नका. तुमच्याकडे जे आहे ते नक्कीच या जगात शंभर लोकांकडे नसणारे, तरीही ते खुश असतात. त्यामुळे जे अस्तित्वात आहे त्याला माया लावा, आपलं परकं हा भेदभाव न करता. एकदा लळा लावायला शिकलो की मग आयुष्यात आपल्याला कुठलीच गोष्ट कमी पडत नाही.
वाचताना सर्व वास्तविक वाटत होते… 😍😻