#film_spoiler
मला प्रश्न पडतो, संपूर्ण आयुष्य गमावत असताना, काही स्वप्न उरतात सुद्धा? जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही मरणार आहात! किती क्रूर आहे आयुष्य, जितक्या यातना बाळाला जन्म देताना स्त्रीला होतात, तेवढ्याच वेगळ्या वेदना मरताना माणसाला होत असतात. पण मरतानाही स्वप्न उरतात,
त्याचं उत्तर माझं मलाच मिळतं. स्वप्न उरतात जर ती स्वप्न पाहण्याची हिंमत देणारं प्रेम तुमच्या आयुष्यात असेल तर… जर ते प्रेम किझी आणि मॅनीसारख असेल तर…! प्रेम ही या जगात खूप ताकदवान गोष्ट आहे, मृत्यूपेक्षासुद्धा. याची ओळख दिल बेचारा चित्रपटात होते. चित्रपटाची कथा ब्लॉगर किझी बासू आणि इमॅन्युएल राजकुमार ज्युनियर उर्फ मॅनी या दोन्ही कॅन्सरग्रस्त प्रेमींची ही जीवन मरणाची कथा. त्याहीपेक्षा जास्त सुशांतच्या खऱ्या आयुष्याचा हा शेवटचा चित्रपट. त्याच्या गूढ मृत्यूने हळहळलेला माझ्यासारखा प्रेक्षकवर्ग बऱ्याच दिवसापासून या चित्रपटाच्या प्रतीक्षेत होता. कथेचा एक फेयर अंदाज असला तरीही चित्रपट बघायचा होताच.
सुशांतसाठी हा चित्रपट बघताना जाणवते, आयुष्य एखाद्या व्यक्तीला खरंच एवढं खरं आयुष्य बहाल करतं का? सुशांतच्या आयुष्यात ज्या ज्या घटना महत्त्वाच्या होत्या, जसं त्याची स्वप्न, त्याचं प्रेम, त्याचं तत्वज्ञान, त्याचा डान्स, त्याचं डेडीकेशन, त्याचं दुःख आणि त्यावर कोथंबिरीचे पान ठेवावं तसं त्याचं दिलखुलास हसू! एवढं हुबेहूब एखाद्या लेखकाने खऱ्या आयुष्याला लिहावं? कदाचित बॉलीवुड रिमेक बनवताना स्क्रिन प्ले राईटरला आधीच त्याची कहाणी माहित होती का?
त्याला स्क्रीनवर बघणं, तो नसताना बघणं! त्याच्या अभिनयाला दाद देऊन रडणं याहून एखाद्या अभिनेत्याच्या कलेचं मोठं कौतुक नसेल. कुठूनतरी आभाळात तारा होऊन तोही आपल्याला बघून खुश होत असेल ना? तो असायलाच हवा होता, हा ठाम आवाज त्याच्यापर्यंत पोहोचत असेलच ना?
चित्रपटातील काही सिन खूप भावूक करून जातात,
जसं पप्पांनी किझी बासुबरोबर डान्स रियाज करताना तिचे पार्टनर बनताना तिचे ऑक्सीजन सिलेंडर पाठीवर घेणं. तसचं सेम मॅनीने तिच्याबरोबर डान्स करताना ते सिलेंडर स्वतःच्या पाठीवर घेणं … तो ज्या ज्या वेळी हे छोटंसं पण आठवणीने तिचं सिलेंडर जपत होता, त्या त्या वेळी त्याने तिचं असणं किती प्रांजळपणे स्वीकारून तिच्या प्रेमाची जबाबदारी घेतली आहे याची जाणीव होत होती. शिवाय एका सिनमध्ये ‘हमको मिस करेंगे ?’ असं जेव्हा मॅनीमधला सुशांत दवाखान्यात बेडवर म्हणतो… तेव्हा वाटते, लेखकाला जणू सुशांतची होणारी घटना माहिती होती, इतकी हुबेहूब दिल बेचाराची स्क्रिप्ट वाटते. या चित्रपटाच्या शेवटीसुद्धा मॅनी मेल्यानंतर त्याचा शेवटचा चित्रपट स्क्रीनवर बघताना प्रेक्षक त्याला स्क्रिनवर बघून त्याचे जिवंतपण आठवून रडतात. जो व्यक्ती जिवंत असताना नजरेआड झालेला असतो, त्याच्यासाठी तो गेल्यानंतर रडणारे, हसणारे कित्येक चेहरे असतात. तो असता तर, चित्रपटात त्याच्यावर प्रेम करणारे ते तीन चार लोक नाहीतर एक व्यक्ती त्याचा आपला असता तर? असे कित्येक ‘तर…’ त्याला बघताना मनात प्रश्न निर्माण करत असतात.
चित्रपटात मॅनीची इच्छा असते, अंत्यविधीच्या वेळी मेलेल्या व्यक्तीबद्दल चार शब्द बोलले जातात, ते तो जाण्याआधी त्याने ऐकावे. त्यामुळे चित्रपटाच्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये हा सीन घडतो. तेव्हा वाटते, प्रत्येक व्यक्तीने त्याच्या मरण्याच्या आधी त्याच्याबद्दल आपुलकीचं काही ऐकुन जावं. ज्या आयुष्याच्या शेवटाला पोहोचण्यासाठी एवढी वर्ष खस्ता खाल्ल्या ते मरण सुखद होईल. हा सीन घडताना तो म्हणतो “मैं मरने के बाद भूत बनकर यहां बैठा रहुंगा।” या वाक्याच्या वेळी माहित नाही का सुशांत आसपास कुठेतरी असल्याचा भास होतो.
यावेळी मला त्याचा डोळ्यांचा कॅन्सर असलेला मित्र सर्वाधिक आवडतो. तो त्यावेळी भाषण देताना म्हणतो,
“साला हम गावं से यहां आये. ये हमारी फॅमिली बन गया! जब से मिला तभी से उसकी स्माईल कातील हैं!”
चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही वेळातच त्याचे डोळे जातात. तेव्हा शेवटच्या भाषणात तो म्हणतो,
“बहुत अच्छा हुआ हम अंधे हो गए, क्योंकि हमें ऐसी दुनिया देखनी ही नहीं जिसमें मैनी नहीं है।”
मॅनीच्या अभिनयाबद्दल खरंच काय बोलावं? यासाठी त्याचा चित्रपटगृहात बसून असलेला शेवटचा सिन पहावा. न लाजता पात्राशी एकरूप होणं काय असतं हे तेव्हा कळतं जेव्हा त्याचं कॅन्सर इन्फेक्शन वाढलेलं असतं आणि त्याच्या नाकातून चिकट द्रव्याचा डिस्चार्ज होत असतो, तो जगाचं भान विसरून तो सिन करताना दिसतो. “मला स्वतंत्रपणे माझ्यासाठी काहीतरी करायचं आहे, तू अँबुलन्स बोलावू नको”, एवढा वेळ पडद्यावर हसवणारा मॅनी तुमच्या डोळ्यात नकळत अश्रूंचे थेंब देतो. त्यावेळी त्याच्या अभिनयाला तुम्ही फील करून त्याचा आजार बघून मनातून दुखावतात. अस्वस्थ होतात. त्याला मदत करायला जाऊ का म्हणून क्षणाचा विलंब न करता पुढे सरसावतात.
या व्यतिरिक्त, सैफला गायकाच्या भूमिकेत घेणं काहीच परिणामकारक वाटत नाही. तो राजे राजवाड्यांच्या काळातील खलनायकाच्या भूमिकेसारखाच वाटतो, तो तिथे जास्त शोभून दिसतो. संपूर्ण चित्रपट ज्या घटनेकडे टक लावून आहे, ती घटनाच छाप सोडत नाही, ही पात्र आणि अभिनयातील कमतरता वाटते.
याशिवाय चित्रपटातील काही आवडलेले डायलॉग;
किझी बासू जेव्हा मँनीच्या प्रेमात पडल्याचे घरच्यांना समजू लागते, तेव्हा तिची आई तिला विचारते, तेरी वर्जिनिटी सेफ हैं?
तेव्हा ती उत्तरते, हां सैफ हैं स्विस बैंक में, जब मर जाऊंगी तब मंगा लेना।
प्रेमात पडताना तुम्ही प्रेमात हसणार नाही असा दिवस असेल का?
पण ती म्हणते, कैंसर को हसी और खुशी दोनों से प्रोब्लेम्स थी।
जेव्हा ती स्मशानभूमीत जाऊन अंत्यविधी पाहायची तेव्हा मेलेल्या व्यक्तींसाठी रडणाऱ्या माणसांना पाहून ती म्हणायची,
दिल करता हैं इनको इतना टाइट हग करू की इनकी जिंदगी फिर से जुड़ जाए।
गायकाला भेटल्यानंतर गायक म्हणतो,
किसी के मरने के बाद जो अपने रह जाते वो हसकर नहीं रह सकते। वो मरने से पहले वादा लेता है, तुम मेरे जाने के बाद भी हंसकर जिंदगी जिओगे। तो फिर हंसो। त्यावेळी आपल्या आयुष्यातली ती रिकामी जागा कधीच रिकामी होऊ नये वाटत.
या सगळ्यात आपण त्याला विसरलो का? एका चांगल्या कंटेंटला…
होय!
जसं सगळ्यांनाच माहित आहे, दिल बेचारा हा चित्रपट ‘द फॉल्ट इन अर स्टार्स’ या हॉलिवुड चित्रपटाचा रिमेक आहे. पण हॉलिवुड चित्रपटाच्या तुलनेत दिल बेचारा चित्रपट काही अंशी कमकुवत वाटतो. ज्यांनी मूळ चित्रपट नाही बघितला, ते या चित्रपटाला सुशांतमुळे कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतील. पण जेव्हा तीन टप्प्यातून ही कथा पडद्यावर येते तेव्हा त्यावर होणारी प्रक्रिया बदलत जाते.
कशी?
तर, दिल बेचारा हा हॉलिवुडच्या ‘द फॉल्ट इन अर स्टार्स’ चा रिमेक आणि ‘द फॉल्ट इन अर स्टार्स’ हा चित्रपट सेम नाव असलेल्या जॉन ग्रीन लेखकाने लिहिलेल्या पुस्तकाचा रिमेक. पुस्तक वाचताना सगळ्या कथेची कल्पना आपण स्वतः करत असतो, पण चित्रपट बनवताना मात्र मुविंग इमेजेसचा वापर करतात. या इमेजेस पुस्तक वाचताना आपण स्वतः आपल्या मनात तयार करत असतो. पण चित्रपटाच्या बाबतीत मात्र सगळं आयते आपल्यासमोर असतं. पण ते कसं बनवलं हे प्रेक्षक म्हणून आपण विश्वासाने प्रामाणिकपणे सांगायचं असतं. त्यामुळे सुशांतबद्दलचे इमोशन एका बाजूला आणि चित्रपटाची मेकिंग एका बाजूला.
तर, दोन्ही चित्रपटांना बघितल्यानंतर काही जागा पोकळ वाटतात. बॉलीवुड दिल बेचारा अल्मोस्ट लोकांनी पाहिल्यामुळे हॉलिवुड चित्रपटात असलेले काही ठळक भाग आणि बॉलीवुड रिमेक बनवताना त्यात केलेले बदल जाणून घेऊ.
मूळ हॉलिवुड चित्रपटात हझेल ग्रेस(शेलेन वूडली) आणि गस (अन्सेल एल्गोर्त) हे कपल कॅन्सरग्रस्त असतात. दोन्ही चित्रपटात दाखवल्याप्रमाणे हझेलला थायरॉईड कॅन्सर असतो, जो हळूहळू फुफ्फुसांमध्ये पसरतो. त्यामुळे तिच्याकडे जगण्यासाठी खूप कमी वेळ उरलेला असतो. तसेच गस हा हाडांच्या कर्करोगावर मात करून आलेला असतो. पण चित्रपटाच्या शेवटी लक्षात येत की तो कॅन्सर पूर्णपणे बरा झाला नसल्यामुळे तो संपूर्ण शरीरात पसरला आहे. त्यामुळे गस हा हझेलच्या आधी मरणार असतो. या तकलादू काळात दोघेही मनोबल टिकवून ठेवण्यासाठी कॅन्सर सपोर्ट क्लबमध्ये जात असतात. तिथे हाझेलची गस आणि त्याच्या डोळ्याचा कॅन्सर असलेल्या मित्राशी भेट होते. तिथे झालेल्या त्यांच्या कॅजूअल भेटीत ते एकमेकांना स्वतःच्या आवडीचे एकेक पुस्तक शेअर करतात. गसने दिलेले पुस्तक हाझेल वाचते,. मात्र ते दोघे हाझेलने दिलेल्या पुस्तकाच्या शेवटाला अडतात. ते पुस्तक लेखकाने अँना नावाच्या कॅन्सरग्रस्त व्यक्तीवर लिहिलेलं असतं. पण लेखकाने त्या पुस्तकाचा शेवट अर्धवट ठेवलेला असतो. त्यामुळे हाझेलची एकमेव इच्छा असते की लेखकाला भेटून त्याच्याकडून पुस्तकाच्या शेवटाबद्दल जाणून घ्यावं, लेखकाने तो शेवट पूर्ण करणं का महत्त्वाचं समजलं नाही? गससुद्धा हझेलने दिलेल्या पुस्तकाचा शेवट असा अर्धवट का आहे? या विचाराने त्रस्त होतो. याचे उत्तर शोधण्यासाठी, मरण्याआधी आणि हझेलच्या प्रेमाखातर गस त्या लेखकाला कॉन्टॅक्ट करण्याचा मार्ग शोधतो. लेखकाचा शोध घेतल्यानंतर हा लेखक अम्स्टर्डामला राहत असल्याचे कळते. त्याचा ईमेल आयडी मिळवून तो हाझेलला देतो. लेखकाच्या मेलवरून रिप्लाय येतो, “मी तुला मेलवर कथेबाबत काहीच सांगू शकत नाही, तू ते ट्विटरवर शेअर करशील. त्यामुळे तुला खरंच शेवट जाणून घ्यायचा असेल तर मला अम्स्टर्डामला भेटायला ये!” या मेलने तिच्यातला चाहता आनंदून जातो. पण कॅन्सर असताना आणि घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने दुसऱ्या देशात प्रवास करण अशक्य असतं. तरीही हट्टाने ती तिची शेवटची इच्छा म्हणून सगळ्यांना कनविअंस करते, शिवाय गसची न डगमगता तिला असणारी सोबत तिला प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची हिम्मत देत राहते.
शेवटी सगळ्या प्रॉब्लेम्सवर तोडगा काढून ते अम्स्टर्डामला जातात. तिथे लेखकाला भेटल्यानंतर तो दारूच्या नशेत धुत असतो. ज्या गोष्टीसाठी एवढ्या क्रिटिकल परिस्थितीत ते प्रवास करून लेखकाला भेटतात मात्र लेखकाच्या उद्धट वागण्यामुळे आणि मृत्यूचा विक्षिप्त मजाक उडवल्यामुळे ते दोघेही त्याच्या वागण्याने दुखावून जातात. त्यानंतर कथा उलगडते की लेखकाने त्यांना बोललेले नसते, त्याच्या सेक्रेटरीने त्या दोघांना बोलावून घेतलेले असते… त्यानंतर या सगळ्या घटनेमुळे संतप्त झालेले ते माघारी परततात. मधल्या काही सिननंतर गसचा मृत्यू होतो. त्यावेळी अंत्यविधीला तो लेखक हाझेलला भेटण्यासाठी येतो. त्यावेळी तो हाझेलला एक चिठ्ठी देतो. तेव्हा हाझेलला कळते, लेखक गसच्या खूप विनवण्यानंतर हाझेलला भेटायला आलेला असतो. गसने त्याची मरतानाची शेवटची इच्छा म्हणून त्याचा मृत्यू झाल्यावर हाझेलला अर्धवट पुस्तकाच्या शेवटाचे गूढ सांग ही विनवणी केलेली असते. तो फील, तो ड्रामा, ती जुळवणी आणि ती मूळ मांडणी खूप खूप मिसिंग वाटते. आणि मूळ चित्रपटात त्या लेखकाचं पुन्हा कथेत येणं हे एक्स फॅक्टर ठरतो. कशाप्रकारे पुस्तकाचा अर्धवट शेवट अर्धवट आयुष्यांना जोडतो आणि कलेमागची प्रेरणाच हरवल्यानंतर जगातल्या कित्येक कलाकारांची कलाकृती अर्धवट का राहते याची अलगद पेरणी होते जेव्हा लेखकाच्या अर्धवट कथेचं रहस्य समोर येतं. त्यानंतर लेखक हाझेलला गसने दिलेली चिठ्ठी देतो. पण त्याच्या रागामुळे चिडून ती चिठ्ठी कारच्या कोपऱ्यात फेकून देते. पुन्हा आठवण येऊन हाझेल गसची चिठ्ठी वाचते. वाचून सत्य परिस्थिती समजून घेऊन मनाला त्याच्या आठवणींनी सावरते आणि ओके म्हणते. दिल बेचारामध्ये ती ‘सेरी’ म्हणते. नि चित्रपट संपतो.
बॉलीवुड चित्रपटात मरणाबाबत चित्रपट बनवताना बॉलीवुड फील देण्याकडे जास्त भर दिल्यामुळे खरी संवेदनशीलता सतत कमी वाटते.
या चित्रपटात सैफ अली खानचे या दोघांना भेटणं, ही भेट खऱ्या आजारावर मात मिळवून प्रेमाच्या विश्वासावर एवढी मोठी रिस्क घेऊन साता समुद्रापार आलेल्या प्रेमींसाठी खूप परिणामकारक घटना आहे. पण त्याचे चित्रीकरण होताना, त्यावरील खरं इमोशन सहजच गळून पडलेले दिसते.
दिल बेचारा चित्रपटात यांनी पुस्तकांऐवजी गाणे घेतले आहे. हा चित्रपट मुलापेक्षा मुलीचा जास्त आहे. पण मुलाचं असणं, मुलीला जिवंत करणारं आहे. किझिला मशहूर गायक अभिमन्यू विरचे गाणे ऐकण्याचे खूप वेड असले तरी त्याचे शेवटचे गाणे अर्धवट का राहिले ही तिची हुरहूर एखाद्या कलाकाराच्या कलेला मिळालेलं खरं प्रेम आहे. किझी मॅनीला अभिमन्यू विरची गाणी ऐकण्यासाठी विनवणी करते. त्यामुळे रोज तीच ती गाणी ऐकून मॅनीला सुद्धा शेवटचे गाणे अर्धवट का राहिले याची हुरहूर लागते. यातून ते नकळत एकमेकांच्या जवळ येतात. रोज त्याच व्यक्तीची आठवण काढून तिने सांगितलेली गोष्ट करणं हे प्रेमात पडण्याचं वेगळं रसायन असतं. पण तरीही पुस्तकांची कल्पना नेहमीच भन्नाट असते. लेखकाने शेवट अर्धवट का ठेवला यासाठी त्या लेखकाचा शोध घेणं म्हणजे वेगळाच खरा टच वाटतो.
काल लाखांहून अधिक लोकांनी हा चित्रपट बघून त्याला टॉप ट्रेण्डिंगला आणले..मात्र लक्षात घेण्यासारखी गोष्ट होती की त्यानंतर हजाराहून अधिक लोकांनी थायरॉईड कॅन्सर काय असतो याचा शोध घेतला. त्यामुळे जर तुम्ही म्हणत असाल चित्रपटांनी प्रेक्षक सुधारत नाही तर त्याचा हा पुरावा खूप महत्त्वाचा वाटतो. यापूर्वी आपल्याला कॅन्सर म्हटलं की तो कोणकोणत्या भागांचा असतो हेही माहीत नसतं. त्यामुळे हा चित्रपट त्या दृष्टीने महत्त्वाचा वाटतो.
निश्चितच सुशांतचा चित्रपट म्हणून भावूक झालेच. पण कथेचं बॉलीवुड प्रेक्षकांनुसार बदलवणे खूप अन्फेअर ठरलं. तो डीप, जो दरीत पडल्यानंतर माणूस मेल्याचा जो झटका जाणवतो ना तो हवा होता. चित्रपट सहज संपून जावा इतका साधा चित्रपटाचा विषय नाही. तो फक्त सुशांताचा चित्रपट म्हणून अडकून राहील कदाचित पण मूळ कथेवर हा अन्याय असेल. कारण तिथे भावनांना न्याय मिळणे अपेक्षित होतं. तिथे ते अधुरं राहणं स्वतः फील करून घेतल्यानंतर न येता आपोआप यायला हवे असतं.
सुशांतची कमी जितकी भावनिक होऊन जाणवते तितकीच संवेदनशीलतेची आणि कथा डेव्हलप करतानाची कमी चित्रपटात जाणवत राहते. त्याने स्वतःच्या पात्राला खऱ्या आयुष्यात आणि चित्रपटातही न्याय दिला. पण बॉलीवुड तो देऊ शकला का?