या आताच्या क्षणापर्यंत कोण आहे सुमित्रा भावे माहिती नव्हत्या. मागे एकदा त्यांच्या निधनाच्या बातमीने शोकाकुल झालेल्या लोकांच्या मनाची स्थिती आज कळत होती. एखाद्या हाडाच्या, पक्क्या, तरबेज कलाकाराला मुकण्याचं दुःख त्यांच्या त्या स्थितीत होतं.
“म्हातारी मेल्याचं दुःख नसतं, काळ सोकावतो” तसंच, “कलाकार मेल्याचं दुःख नसतं, काळ दर्जेदार कलाकृतीला मुकतो” हे विधान ‘दिठी’ बघून आपसूक मनात येतं.
दिठी पाहताना माझी त्यांच्याशी ओळख होतेय. ही ओळख साधी नाहीये. माझी भावनिक घालमेल कुठे होते हे त्यांना कळलंय. एका ओळखीत एवढं कळतं का हो?
काल रात्री त्यांच्याशी ओळख झाली.
दिठी पाहताना…
होय, मागेपुढे कधी मराठी चित्रपट म्हणून नाव ऐकलं असेल,
तीच दिठी!
एखाद्याने आपल्याला त्याच्या आयुष्यातला खूप अमूल्य ठेवा देऊन जावा, तसं केलं भावेंनी. त्या दिठी म्हणजेच दृष्टी ठेवून गेल्या. या जगाच्या पाठीवर नवा विचार देणं, त्याची छाप सोडण हे जीवनाचं सार्थक असतं.
चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण दोन-अडीच तासांचा वेळ निवांत काढावा. दिड तास चित्रपटासाठी आणि उरलेला वेळ चित्रपट संपल्यानंतर मंथन कारण्यासाठी, पचवण्यासाठी.
“जर तुझ्या ठायी दिठी असेल गहिरी,
ऐकता, पाहता येईल अल्याडच पल्याडच” त्यामुळे चित्रपट पाहताना मन शांत करून पात्रांशी एकरूप होऊन पाहावं. चित्रपट जेवढे कमी स्पष्टीकरण देतील तेवढी गंमत असते. एका लघुकथेला चित्रपट स्वरूप देणे चॅलेंजिंग असते. पण हा चित्रपट बोलतो. पुस्तकातलं वर्णन वाचताना डोळ्यासमोर लेखक जसं वातावरणाचे वर्णन करतो तशीच फ्रेम समोर येत राहते. अहोरात्र एकसलग कोसळणारा मुसळधार पाऊस, कौलारू घरं, झाडांची सळसळ, रोजच्या जीवनात गुंतलेली माणसं, पोथी वाचून मन:शांतीसाठी जमलेली वारकरी मंडळी, वारीच्या गोष्टी, टाळ मृदंगांचा मधुर नाद, भोळ्या भक्तिभावाने चालणारे वारकऱ्यांचे पाय अन् निस्सीम भक्तीने भरलेले डोळे… या वातावरणात संपूर्ण चित्रपट पुढे सरकत राहतो.
संकलन, छायाचित्रण, वातावरण, पात्रांची अचूक निवड, त्यांचा अभिनय, टाळ, मृदूंगाचा बॅकग्राऊंड सिक्वेन्स सगळचं मनाला त्या कथेत घेऊन जातं.
चित्रपटाला सुरुवात होते, नदीच्या पुरात रामजीचा मुलगा वाहून जातो, या घटनेवर चित्रपट सुरू होतो. या दुःखद घटनेनंतर पहिल्या काही मिनिटात दोन गावकरी नदीच्या बाजूला उभे राहून ‘रामजीचा पोरगा घेऊन गेली म्हणून नदीला दूषणं देतात’, दुःख व्यक्त करतात आणि वाटेला परतताना त्यातला एकजण त्याच नदीत चप्पल तुटली म्हणून आधी एक चप्पल टाकतो आणि दुसरी काय कामाची म्हणून नंतर दुसरी टाकून देतो. नकळत त्या क्षणाला चपलेमुळे अनवाणी झालेले त्या गावकर्याचे पाय आणि पोरगा वाहून गेल्यामुळे अनाथ झालेला रामजी दोघे सारखेच वाटू लागतात.
माणूस आपल्यातून गेला की आठवणींची वारी पाठ सोडत नाही कशीच… त्यात मग कर्तृत्ववान, घराची जबाबदारी घेणारा मुलगा असेल तर मन बा विठोबाकडे आभाळ हरवल्याची तक्रार करत राहतं. चित्रपटाच्या शेवटपर्यंत रामजी देवासमोर प्रश्नांची गाथा वाचायला सुरुवात करतो. इतके दिवस त्याने वाचलेल्या पोथीची प्रश्नपत्रिका तो देवासमोर सादर करतोय, त्याच्या कौटुंबिक नुकसानाची भरपाई मागतोय.
रामजी म्हणजेच किशोर कदम यांची अवस्था मुलाच्या अकाली मृत्यूमुळे तितकीच सुन्न, थिजलेली आणि गोठलेली झाली आहे. एकीकडे मिळेल ते वाहून नेणारी नदी, दुसरीकडे आठवणींच्या दुःखानी तुडुंब साचलेलं रामाजीचं मन! त्याच्या डोळ्यात साचलेल्या पाण्यात सुद्धा नदीच्या पुराचा भास होतो. एका डोळ्यात त्याची तीस वर्षाची वारी तरळते, दुसऱ्या डोळ्यात कसलाच आवाज न करता अचानक पोराचं जाणं विठोबाला प्रश्न विचारत राहतं.
ते डोळे विचार करताय, पोरगं वाहून नेलय, तक्रार तरी कोणाकडे करायची, न्याय तरी कोणाकडे मागायचा आणि बदला तरी कोणाचा घ्यायचा हो?
सगळ्या गावाचा वाली असलेला रामजी जेव्हा स्वतःच्या पोराला गमवतो, तिथे त्याची कुठलीच तत्व त्याला या त्रासातून मुक्त करत नाही. तेव्हा वाटतं, जोपर्यंत दुःख आपलं नसतं तोपर्यंत आपण शहाणपणाचे सल्ले वाटत फिरतो. स्वतःच्या वेळी पंगू होऊन जातो. रामजी नुसता आठवणीच्या वारीत एकटक गुंतून जातो. निशब्द, सताड उघड्या डोळ्यांनी जुनी सुखं गिरवत बसतो.
यात मध्येच कुठेतरी प्रभावळकर म्हणतात,
“विठ्ठलाच्या पसाऱ्यात आपण किती सूक्ष्म, आपली सुख दुःखही तेवढीच!”
हे वाक्य मनाला लागतं. खरंच ह्या जगाच्या पसाऱ्यात आपण विठ्ठलासाठी खरंच इतके सूक्ष्म असू का ?
एकीकडे बापाचं दुःख, दुसरीकडे जेवढं वाहून गेलेल्या मुलाच्या बापाचं सुख तेवढंच त्याच दिवशी धसका घेतलेल्या बाळंतीण होणाऱ्या त्याच्या बायकोच दुःख आहे… तिच्या मनाची कल्पना करणं म्हणजे दुःखाचा डोंगर…
अन् त्या दुःखात सासरा तिच्याकडे त्याचा लेक मागतो. किती हतबल होऊन जातो माणूस. साखळीच असते ही माणसा माणसांची, एकजण गेला तरी मन, भावना, सुख, दुःख आणि अक्ख कुटुंबच अस्ताव्यस्त होऊन जातं.
चित्रपटात रामजींचे सख्खे मित्र म्हणून डॉ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी आहेत. हे त्रिकुट रामजीची अवस्था दुरून पाहत असतात. कोणाच्या दुखात आपला वाटा केवढा असतो? या तिघांएवढाच !
कारण ते केवळ ऐकू, पाहू, बोलू शकतात. त्यांना रामजीचं दुःख वाटून घेणे जमत नाहीये. ते मित्र म्हणून मौल्यवान आहे पण ज्याचं त्याचं दुःख ज्याला त्याला पेलाव लागतं. त्यामुळे रामजीची समजूत काढण्यासाठी ते हेल्पलेस आहे, त्यांना जमेल ते सगळं करण्याचा प्रयत्न चालू आहे.
या तिघांचे काही संवाद खूप समकालीन आहेत.

प्रभावळकर एके ठिकाणी म्हणतात, “रामजी आपल्याला एवढा जवळचा, तरी त्याचं दुःख आपल्याला तितकं कळत नाहीये. तसं कळवळतय पण तरी वाटतंय, आपल्यावर तर काही बेतलं नाही ना. आतलं मन आपलं सगळं ठीकय म्हणतय. आतलं काही हालतं की नाही ?
तेव्हा गिरीश कुलकर्णी विचारताय, एक माणूस दुसऱ्यासाठी संsssपूर्ण म्हणजे संपूर्णपणे पूर्णपणे दुःखी नसतोच कवा? …
हे काही प्रश्न आतला माणूस जिवंत करतात,
यावर टेलर जोशिबुवा म्हणजेच डॉ. आगाशे म्हणताय, तरी बरं देवाने माणसाला इसराळू केलंय…
या एका वाक्यात अनेक दुःखाची तीव्रता कमी होत जाते. खरंच, वेळेनुसार आपण विसरत जातो. त्यामुळे निदान आपलं आयुष्य पुढे सरकत राहतं. आयुष्याची प्रत्येक घडी अचूक घातलीय देवाने. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथेच आहे. जिथे उत्तर नाही सापडत तिथे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग ठेवला आहे.
पण जवळचा माणूस गमवलेल्या माणसाचा आयुष्यावरचा विश्वास उडून जातो. दिठी अस्पष्ट होऊन जाते. मग ना अल्याडच दिसतं ना पल्याडच, नाहीतर दोन्हीकडे अंधार!
तरी ही वारी आणि हा वारकरी संप्रदाय “तू तो माझे मी तो तुझे” या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगातून वारीचा गाभा सांगून जातो.
हे होऊनही “त्यो विठ्ठल खरंच हाय का?” हा नास्तिक प्रश्न नवीन नाही. पण हा प्रश्न रामजी सारख्या कट्टर वारकऱ्याच्या मनातून यावा, हे आश्चर्यचकित करणारे आहे. रामजी म्हणतो,
“मी विठ्ठलाला दोष नाय देत, फकस्त माही तीस वर्षाची वारी त्याच्यासमोर टाकतोय. त्याच्यात पुण्य नसतं का? मग काय असतं वारीत? ते पुण्य कुठे गेलं? पोथी अर्धवट सोडायची नसते, का? पोथितल्या शब्दांचा अर्थ काये?”
हे आणि असे अनेक प्रश्न… असे प्रश्न ज्याला उत्तरं आहेत का? विठ्ठलाला माहित.
चित्रपट शेवटाकडे येतो तेव्हा, येथे चित्रपटात अधेमध्ये येणारी गावकरीण पारुबाई आणि तिची बाळंतीण गाय मुख्य भूमिका साकारते.

एकीकडे बाळंतीण होणाऱ्या सगुणेला कारवड व्हावी, अशी इच्छा व्यक्त करणं आणि रामजीला त्याच्या सुनेच्या पोटी जन्मलेली मुलगी नको असणं…
दुसरीकडे एवढ्या दुःखात बुडालेला असताना रामजीचं पारुबाईच्या गाईच्या नाजूक काळात वेळेला धावून जाणं आणि सुनेला मुलगी झाली म्हणून घरातून कायमचं निघून जायला सांगणं. किती विरोधाभास आहे ना जगण्यात!
हा शेवट जन्म- मृत्यूची दिठी देणारा क्षण आहे.
लेकरू गमावलेल्या बापाच्या हातून गाईचं बाळंतपण करतानाचे दृश्य आणि गाईचा आणि रामजीचा संवाद अनुभवणे एक आर्त अनुभव आहे. प्रेक्षक म्हणून थक्क करून टाकणारा आहे. रामजीचा गाईशी होणारा संवाद जणू ब्रम्हांडाशी एकरूप होणारा आहे. जन्म मृत्यूचा प्रवास करून त्याची उत्तरं सोडविणारा आहे. मग तिथे प्रेक्षक म्हणतो, दिठी साफ असेल तर अल्याडच पल्याडच साफ दिसतं.
आणि तिथे रामजी म्हणतो “जन्म असाच असतो, मरणाला शिवून येणारा…”
आणि शेवटी…
एखाद्या मृत्यूच्या गर्तेतुन बाहेर पडून बाळानं जन्म घ्यावा तसा दिसू लागतो रामजी. मेलेला माणूस जितका यातनेतून जात नाही त्यापेक्षा त्याच्या मागे उरलेला माणूस त्याच्या आठवणीने कणकण मरत असतो.

जेव्हा रामजी या दुःखातून सावरतो तेव्हा तो मुक्त होतो आणि नदीचं पाणीही ओसरते, गाय सुखरूप जन्मही देते, सुन त्याच चिमुरडीला घेऊन सासरीच नांदू लागते आणि निसर्गाला नवा बहर येतो….
एकाचा जन्म दुसऱ्याचा मृत्यू विसरायला मदत करत असावा… जन्म मृत्यूचा प्रवास सांगणारी दिठी प्रेक्षक म्हणून मला दुःखाची आर्तता सांगते आणि दुःख पचवण्याची शक्ती देते, नवा दृष्टिकोन देते, दुःखाच्या पल्याड नेहमीचं एक आपलं आयुष्य वाट पाहत असतं, सांगते.
चित्रपटात मोजून पाच दृश्ये आहेत. मुलाचं नदीत वाहून जाणं, रामजीचं आभाळाएवढं दुःख, वारीने दुमदुमलेल रामजीचं मन, त्याच्या आप्तस्वकीयांचं त्याच्यासाठी कळवळणे आणि पोटश्या गाईचं बाळंतपण इतकाच मोजका आणि नेमका चित्रपट आहे. मला फिलॉसॉफिकल चित्रपट भारी आवडतात. या चित्रपटाने त्याबाबतीत मन जिंकून घेतलं. सुमित्रा भावे खऱ्या अर्थाने मनाने मनापर्यंत पोहोचल्या.
-पूजा ढेरिंगे
तुम्हाला हेही आवडेल – http://manmarziyaan.in/dear-comrade/
तुझ्या लेखनाचा पूर्ण पणे दिवाना झालो एकदम खतरनाक इतकी भारी शब्दश्रेणी वापरतेस तू कमाल एकदम मी ही नक्की बघणार ❤️