कुठल्या दिवाळीचं वर्णन करू ?
खऱ्या कि आताच्या ?
आता दिवाळी बनवली आहे. लहानपणी वाट्याला आली. ती बनवता यायची नाही.
डोक्यावर आभाळच नसावं, एवढी वाईटही परिस्थिती नव्हती.
पण दहा वर्षाच्या वयात परिस्थिती कळायची नाही, पण लोकांचं पाहून दिवाळीला लहानपणी फटाके, कपडे, मिठाई मिळायची नाही… दिवाळी सुरु होण्याच्या चार पाच दिवस आधीपासूनच लोकांची पोरं फटाके फोडू लागायचे. त्यातल्या लवंगी फटाक्याच्या लडी लावताना एखादार्धा फटाका माझ्या नशिबी यायचा. तेव्हाच मला अंगण झाडायला मनापासून आवडायचं. कारण दारासमोरचं झाडताना एखाद अर्धा म्हणत डझनभर फटाके माझ्याकडे गोळा व्हायचे. उष्ट्या फटाक्यांनी माझी फटाक्यांची हौस भागायची अन ती खरंचच भागायची.
त्यामुळे फटाक्यांची धडमधुडूम मला कमीपणा द्यायची नाही. पण गल्लीतल्या सगळ्या पोरांकडे पाहून लक्ष्मी पूजनाला मला नवा ड्रेस घालावा वाटायचा. एखादाच. डिजाइन चांगलं नसलं तरी नवा हवा… !
पण ‘फाटलं नाही तोवर सेकण्ड हॅन्ड घ्यायचं नाही’, ही परिस्थिती प्रत्येक दिवाळीत आमची पाहुणी असायची…
आज मात्र परिस्थिती बदलली, आता ऑफिसवरून थकून भागून येऊन तीन चार दिवस आधीच स्वतःची दिवाळी बनवली जाते…
वयाच्या पंचविशीत आल्यावर विकतचे फटाके नको असले तरी घेेेता येता, महागड्या दुकानाच्या काचेतून पुतळ्याला लावलेला अव्वाच्या सव्वा किमतीच्या मुठभर दर्जे एवढा ड्रेस अंगात घालता येतो. घ्यायचा नसला तरी किमान त्या महागड्या काचेच्या महागड्या दुकानात पाऊल टाकता येतंय अन ते दुकानावाले पण थोबाड नि कापडं बघून आत येऊ देताय… ही माझी कमाई (?) लहानपणीपासून आतापर्यंतचे वर्ष जणू या दिवाळीच्या लायक बनण्यासाठीच खर्ची घातले.
‘स्वतःच्या औकातीला उंबरा आपणच टाकायचा असतो’ ते लहान असताना आईच्या संस्कारानी सांगितलं होतं.
पण तरीही…
गल्लीतल्या राजा बाळ्यापासून सोन्या गण्यापर्यंत प्रत्येकाकडे असलेला तो नवा ड्रेस… तो ह्या फाटक्या मनाला सारखा आतून छिद्र पडत राहायचा. गल्लीत फिरणाऱ्या प्रत्येकाच्या अंगातला तो पिवळ्या, हिरव्या, निळ्या, पांढऱ्या कधी कधी एकत्र रंगाच्या कपड्यांनी ते चांगले का दिसत नसायचे पण ते सगळे एकत्र येऊन माझ्या परिस्थिती समोर फिरत्या रंगात मला डिवचत बसायचे.

‘कपडे फक्त अंग झाकण्यापुरते असले तरी खूप झालं!’ हे डीप तत्वज्ञान माझ्या इवलुश्या मनाला कळायचं नाही. कारण लहानपणी हट्टाची नि दिखाव्याची मौज असते. लहानपण मिरवायला असतं. तेव्हा विचारांचा थाट तिथे नसलेला बरा आणि खरा असतो. पण माझ्यासारख्या कित्येकांना लहानपणीच हा विचारांचा थाट घेऊन मोठं व्हावं लागायचं…
अशा घरांत श्रीमंती नसली तरी समाधान नांदत राहते, किंबहुना घरातली मोठी माणसे त्यासाठीच प्रयत्न करतात… त्यामुळे जेवढं आहे तेवढ्यात आम्ही खुश होण्याचा प्रयत्न करणारच असायचो, पण येणाऱ्या जाणाऱ्या, झोपडीत राहणाऱ्या बाया अनेक सवाल करत राहायच्या. काहींच्या घरी कंदील पेटायचा नाही पण एकुलत्या एका पोराच्या अंगाला नव्या कापडाचा सुगंधी वास यायचा. आई सतत म्हणायची, “समाज मुळी असतोच याच्यासाठी, जे आपल्यात कमी आहे त्याची खोचकपणे ताकदीने निंदा करून जाणीव करून द्यायला… आपण जिद्दीने पुढे जात राहायचे! “
त्यामुळे माझ्या अंगाला लहानपण संपेपर्यंत नव्या कापडाचा सुगंध लागला नाही. या देहाने कितीही अपेक्षा केली पण तो सण त्या काळात माझा झालाच नाही. माझी दिवाळी या लहानपणापासून मिळालेल्या दोन डोळ्यांना दिवे बनवून त्यात हि दिवाळीची रोषणाई भरवून घेण्यापुरतीच असायची. पण आताशा या डोळ्यांच्या स्वप्नांना सत्याचं तोरण मिळालंय तेही सुख आता तितकसं बोचत नाही… पण या जगात माझ्यासारखी दिवाळी वाट्याला येणारे मानकरी कमी नसतात. त्यांच्यासाठी हे लहानपण अन्यायकारक वाटते… पण आता भूतकाळात डोकावताना वाटते, लहानपणी उणीव जाणवून देऊन मोठेपणी काबिल बनवण्यासाठी, दिवाळीसारखे आतल्या आत खजील करणारे सण बनवले असणारे… भूतकाळ नाही मात्र भविष्यकाळ उजळून काढतात!
“एवढं सगळं असलं तरीही माझ्या इवलुष्या घरातही हक्काची दिवाळी यायची बरं का … जेव्हा झाडझूड-जाळं-कानाकोपरा पुसून घराची आरती व्हायची आणि याला रंगीत तोरण म्हणजे त्या पत्र्याच्या घरासमोर ओंजळभर पाण्याचे दाणे शिंपडत रंगीत रंगांच्या रांगोळीचा थाट नि त्यावर मातीच्या पणतीत महागड्या तेलाने टिळून भरलेल्या दोन दिव्यांची आरास यायची… अहाहा !” हा रीती रिवाजाने मिळालेला सहज आनंद, हे त्या दिवाळीचं देणं अन् आमच्या चेहऱ्यावरचं लेणं असायचं… !
मला खूप आवडली ही पोस्ट.. माझ्या आयुष्यात असाच काहीसा संघर्ष झाला आहे..
किती relatable आहे हे सर्व. खूपचं छान मनातून मांडल आहेस तू…
कपडे फक्त अंग झाकण्यापुरते असले तरी खूप झालं!’ हे डीप तत्वज्ञान माझ्या इवलुश्या मनाला कळायचं नाही 🥺🥺 खरंच ❤️🔥