मीही त्याला मेसेज करून कळवते माझंही लग्न ठरलंय… मेसेज टाईप करायला घेते. अर्धवट खोडते.
ओह नो, नो, नो…
डोन्ट मेक इट डर्टी…
आज सकाळी त्याचा मेसेज आला होता. त्याचं नाव वाचून मनात ओळखीचं काहीतरी दाटून आलं होतं. पण पुढचं सगळं वाचून एवढ्या दिवसाचं हृदयात चाललेलं कुरूप फिलिंग आताशा कळलं होतं. पण त्या एका मेसेजने आज त्याच्याबद्दलचे आणि त्याच्यापर्यंत जाण्याचे सर्व फिलिंग पूर्ण झाले. ‘तो लग्न करतोय’ त्याचा मेसेज होता.
मला वाईट नाही वाटलं. हे खूप खूप जास्त प्रामाणिक फिलिंग होतं. यामागे कदाचित ब्रेकअपला झालेला मोठ्ठा काळ असेल? किंवा आमच्यातल्या ब्रेकअपचं कारण असेल… पण शेवटी खेळ सगळा भावनांचा असतो. दिसणं, असणं, बघणं, बोलणं, व्यक्त होत जाणं, भांडणं, त्रास करून घेणं, सगळ्याचा टप्पा पार झाला की जे उरतं आणि उरलेलं टिकवण्याची भावना उरते ते उरतं प्रेम!
प्रेम तीन वर्षाचा काळ कधीच नसतो, ती कळ आयुष्यभराची असते. त्यामुळे ब्रेकअप झालेली कित्येक प्रेमं ही प्रेमात हरलेली असतात. आम्हीही कधी काळी हरलो होतो.
या काळात एकमेकांतून सुटून एकमेकांना तोडून जेव्हा पुढे आलो तेव्हा त्याने लग्न करायचं ठरवलं, मी प्रेम केलं दुसरं कोणावर तरी!
क्योंकी ब्रेकअप के बाद,
बात थोड़ी-बहुत ऐसी भी थी,
कोई जगह दिल में खाली भी थी।
एक रुमाल अपने तौर से दिल की जगह पर रख दिया था,
फिर भी बिता हुआ इश्क वहां पर सुई जैसा अडा हुआ था।
तेव्हा अडलेला हा इश्क आज इजाजत घेऊन माझ्यातून बाहेर पडला होता. मला समाधान याचं होतं की, प्रेमात हरलो असलो तरी दोघांची आयुष्य संपली नव्हती. प्रेमाचा आदर करून नवीन आयुष्याकडे दोघेही वळलो होतो.
जसं वागण्या बोलण्यातून त्याने प्रेमाला दूर केलं तसं हळूहळू माझाही मोड बदलला. माझं गाणं मी बदललं. तो गेला त्रास झाला, त्यालाही मलाही!
कारण, पिंजरे की आदत हो गई थी, लहानपणीच्या घरच्या पिंजऱ्यातून सुटून त्याच्या पिंजऱ्यात जाण्याची आदत!
तरुणपणात हा प्रियकराचा/ प्रेयसीचा पिंजरा असा असतो, जिथे तुम्हाला आझादी दिली जाते पण पिंजऱ्यात आणि पिंजऱ्यापुरतीच, प्रेमात असताना हे कैद होणं कळत नाही. पण बाहेर पडल्यानंतर सुरुवातीला त्रास झाला त्याउलट मुक्त वाटू लागलं होतं.
प्रेमाच्या काठावर त्याची वाट बघत उभं राहण्यापेक्षा मी तिथून निघून जाणं पसंत केलं होतं. खूप फरक पडला होता, भावना, एकमेकांबद्दल झालेले गैरसमज मत मतांतरे. सगळं विकृत झालं होतं.
‘प्रेमाच्या सुंदर नदीला वाहती गटार संबोधावी’ एवढ्या टोकावर ही इर्षा गेली होती.
त्यामुळे हळूहळू मी प्रेम नावाच्या अटळ स्पर्शाला टाळत होते. पण तरीही ‘तो’ आलाच ना!
मैं वो खुशबू नहीं जो हवा में खो जाऊं। इतका जवळचा कुणीतरी माझाही मित्र झालाच ना? उलट आधीच्या प्रेमासारखं मी याच्यावर घाई, गडबडीत प्रेम करण्याची चूक करणार नव्हते. जुनं प्रेम तुम्हाला नवं काहीतरी सुरेख निवडायला मदत करतं.
मी त्यालाच सतत दोष देऊन, जिथे वळायचं नाही तिथे माझा वेळ का घालवत बसावा?
तेव्हा प्रेमाला नावं ठेवणारी मी तशीच असतानाही हा आला. हा तीन वर्षासाठी नाही, जास्त काळासाठी आला. तेव्हा मला आधीच्या प्रेमाची स्थिती समजू लागली. ब्रेकअपची कारणे कितीही असेना पण आमच्यातल्या प्रेमाचा शेवट आदर देऊन संपणारा होता! त्यामुळे त्याचं लग्न हा त्रासाचा नाही तर समाधानाचा भाग होता.
कारण आमच्यातल्या प्रेमात अहंकार चिकटलेला नव्हता. अहंकार असलेल्या प्रेमात नातं असतानाही तुटत जातं, तुटल्या नंतरही जोडीदाराच्या सोडून जाण्याचा बदला म्हणून चुकीचा निर्णय घेतला जातो.
अहंकार असता तर, आज तो लग्न करतोय हे ऐकुन मी त्याला म्हटलं असतं त्याला काय ? माझंही लग्न ठरलं, आणि तो तुझ्यापेक्षा कित्ती पटीने समजूतदार आहे. नाहीतर किती हँडसम आहे, उच्च पदावर आहे, घरी पण आवडलाय. हे ते आणि अजून बरच काही.
पण एखाद्या नात्याचा शेवट कधीच हा नसावा. कारण नातं तयार होताना त्याचं महत्त्व जगातल्या कुठल्याही गोष्टीहून अधिक होतं, त्यामागे जे कारण होतं त्यासाठी तरी जपावी त्या नात्याची वीण! त्याला बंद करायचं तर त्याच्या वाट्याचं सुख नात्याला देऊन तिथून निघून जावं, कधीही न परतण्यासाठी!
ब्रेकप नंतर पण नातं कसे टाकवावे किंवा समोरच्याला कसे स्वीकारावं हे तुझ्या कडून शिकावं… 👌👌👌🖤🖤🖤