जाणारा पाण्यासारखा पुढेच वाहत राहतो,
आपण किनाऱ्यावर किती वेळ उभे राहतो,
आपल्या उभे राहण्याला तो पाहत असेल ना? आपल्यासाठी तो थांबेल ना? पुन्हा माघारी फिरेल ना?
एकवेळ मागे वळून पाहील तो पण परत येणार नसतो…
प्रेम करणं आणि प्रेमासोबत राहणं इतकं अवघड असतं.
प्रेम पाण्यासारखे असतं, दोघांनी सोबत प्रवास करणं गरजेचं असतं.
एक मागे एक पुढे अस करून एकजण पाण्याच्या प्रवाहात पुढे निघून जाईल,
दुसऱ्याला त्या पाण्याची गती गाठणं अशक्य असेल,
शेवटी दोघांना एकमेकांची चूक वाटत राहील.
साथ मिळणार नाही, बोलण्याची संधी मिळणार नाही, त्याच्या आयुष्यावर दुसरी कुणाची तरी पाटी लागेल. तिचं शहर बदलून ती अनोळखीची होऊन जाईल.
क्षण खूप नाजूक असतात, क्षणात हातून निसटून जातात,
नात्यासारखेच नाजूक, ज्यांना तेवढंच नाजूक होऊन सांभाळावं लागतं.
पाण्याच्या गतीत तुमच्या मनांची गती, सोबत एका लयीत राहिली तर प्रवास तुमचाच आहे की!
कारण एकदा हातून सुटलं की मग कुठलाच नवस पूर्ण करून तो व्यक्ती पुन्हा येणार नसतो, तो आयुष्यातून निसटण्याची वाट पाहू नका… कारण एकदा हरवलेली वस्तू पुन्हा मिळते, माणसं भेटूनही कधीच आधीसारखी होत नाहीत.
कुठल्याच क्षणाला गृहीत धरून पुढे जाऊ नका, माणसाला निघून जायला एक सेकंद लागत नाही. तो सेकंद कधी निर्माण होऊच देऊ नका. त्यामुळे आपल्या जवळच्या व्यक्तीच्या प्रेमाला, काळजीला गृहीत धरू नका. कारण जे या क्षणाला टिकवता येईल, तेवढंच शाश्वत आहे.
– पूजा ढेरिंगे