मालिकेतला भिमराया घरी येतो तेव्हा…


उशीर झाला थोडासा, पण आज एैतवारी काहीतरी पहावं म्हणून लॅपटॉपवर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिका लावली.

मध्यंतरी भ्रमंतीच्या वेळी एका हॉटेलात ही मालिका मोठ्या रसिकतेने चालू होती. मालिकेत चालू असलेले शाळेतील एक दृश्य पाहून मन थबकल होतं. शिवाय, आंबेडकर हे आजवर दलितांचे, संविधानाचे आणि अस्पृश्यांचे… दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा देणारे आणि अस्पृश्यांप्रती सामाजिक भेदभावविरूद्ध मोहीम राबविणारे न्यायतज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक असलेला हा महापुरुष! इथवर माझी नि त्यांची समाजाने करून दिलेली भेट आणि तोंडओळख होती.

त्या पलीकडे ना ते माझ्या वाट्याला आले ना मी त्यांच्या वाट्याला गेलेले. पण आज वाटलं ते यामुळे की पत्रकारिता शिकताना बऱ्याचदा शाहू, फुले, आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. त्यांच्या मूकनायक, बहिष्कृत भारत या वृत्तपत्राचा नमुना पाहिल्यानंतर मनाची उत्सुकता वाढली होती. पाकिस्तान अथवा भारताची फाळणी, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, पुणे करार यांतील संदर्भ स्वातंत्र्यपूर्व काळातील घटनांमध्ये अनेकदा यायचे.

या महामानवाने जे केलं होतं, त्याच्या तीळभर करण्याची क्षमता या जगात कुणातच नाही. बाबासाहेबांना त्यांच्या लहानपणी या जाती व्यवस्थेचा शिकार व्हावं लागलं, एवढंच एका ओळीच त्यांचं जीवन आमच्यापर्यंत पोहोचलेलं. पण ते कसे घडले, या घडण्यामधून निर्माण झालेल्या या वटवृक्षाची कहाणी नेहमी काजळी सारखीच दाखवण्यात आली.

मनात हे थोडेफार विचार चालूच होते. तेव्हा आईने विचारलं, “काय लावतेस?”

तिला सांगितलं, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर…”

परंपरागत चालत आलेल्या विचार साच्याने तिनेही तितकीशी स्वीकारार्हता दाखवली नाही. पण तरीही मी माझा निर्णय अढळ ठेवला.

सुरुवात केली… मालिकेत पुल देशपांडे यांच्या चित्रपटात भूमिका साकारलेला सागर देशमुख दिसला. आई म्हणाली, हा तर देशपांडे चित्रपटातला दिसतोय.

तेव्हाच मलाही क्लिक झालं. त्या निमित्ताने आंबेडकरांसाठी देशमुखने भूमिका करणे म्हणजे आताच्या काहीअंशी बदललेल्या परिस्थितीचे प्रमाण वाटते. मग मालिका सुरू झाली, सुरुवात ही आंबेडकरांच्या विचारांनी, संविधानाने आणि नंतर हळूहळू शाहू महाराजांच्या भेटीने होते.

शाहू महाराजांच्या भेटीतून उलगडत जातात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्वाचे जीवन पैलू.

“सैन्य भरतीत अस्पृश्याना बंदी” हा नवा निर्णय जेव्हा जाहीर केला जातो तेव्हाच जन्म होतो भीमरावचा… नि सुरुवात करतानाच आंबेडकर म्हणतात, माझा जन्मच ‘अन्यायाच्या’ दिवशी झाला. तेव्हा या अन्यायासाठी जन्मणार वादळ कसं असतं, याची प्रचिती येण्यासाठी खऱ्याखुऱ्या वादळाची चाहूल प्रसूतीच्या दृष्यातून साकारली जाते.

तेव्हा सुरू होतो, लहानग्या भीमाचा प्रवास. त्यात येणारी वादळे, नि वादळांपेक्षाही आपल्या सारख्याच देहाच्या माणसांकडून मिळणारी वागणूक आणि त्या वागणुकीतून लहानग्या जीवाला पडणारे असंख्य बोचक प्रश्न. आपला समाज किती दुबळा, निष्ठुर आणि अमानवी आहे हे प्रत्येक पावलावर ठसत जातं.

“महार म्हणजे काय रे आनंदा? किंवा बाट म्हणजे काय? मग उच्च जाती म्हणजे कोण आणि आपल्या अंगाला घाण लागलेली असते का?” या प्रश्नांचा संच इतका बलाढ्य आहे की एखाद्या व्यक्तीचं आयुष्य टोकाला नेऊ शकतं. ही वागणूक आपल्याला दिली तर? एवढा कचरत विचार माझ्या मनात आला नि माझा प्रवास मी आंबेडकर म्हणून सुरू केला. त्या मालिकेतले आंबेडकर केवळ बघण्यापुरते म्हणून तरी जगून पाहू अशी धारणा मनी केली आणि बघू लागले.
कारण जेव्हा दुःख आपलं होतं तेव्हा सगळचं योग्य वाटतं. तेव्हा खरा चटका कळू लागतो, चटक्याचा त्रास होऊ लागतो.

हा चटका लागतो, जेव्हा आर्मीतील रिटायर्ड शिक्षक म्हणजे वडील रामजी जात समजू नाही म्हणून त्यांचं सकपाळ आडनाव बदलून गावाच्या नावावरून ‘अंबवडेकर’ आडनाव लावतात… या अंबवडेकरने दिवस सरू लागतात, पण आता भीमाला शाळेत टाकण्याचा दिवसही समोर येतो. वडील भीमा आणि आनंदाला शाळेत नेतात. शाळेतील मास्तर गुरुजी म्हणजे आंबेडकर गुरुजी यांच्याकडे ते प्रवेशाची चौकशी करतात. नाव – आडनाव सांगेपर्यंत गुरुजी नेहमीसारख्याच मूडमध्ये असतात. पण जेव्हा शालेय पटावर ‘जात’ टाकणं अनिवार्य असतं, तेव्हा मात्र रामजी ‘ महार ‘ म्हणतो. तोच गुरुजी म्हणतात “ठीके ठीके, आजपासून नको, उद्यापासून त्याला शाळेत पाठवा (कारण आज त्याच्याबरोबर त्याचं बसणं नसतं) त्यांच्या सोबत बसणं द्या आणि मगच शाळेत पाठवा.!”

भिमजी आणि आनंदपासून मुले आजूबाजूला पळतात, दूर बसू लागतात, स्वतःच्या डब्ब्यातला खाऊ देत नाही, खेळायला घेत नाही, कचरा टाकतात, तू शिवला तर तीनदा अंघोळ करावी लागेल म्हणून मनावर जातीचा पगडा घट्ट करू लागतात… असं पोळणारं वास्तव, त्या वास्तवाचे निखारे इतके का कठोर की खरा जाळ इतका पोळत नसेल… अन् इथून सुरू होतो प्रवास भिमारावाचा!

या ऐतवारी लावलेल्या या मालिकेने जास्त काही नाही, मनोरंजनाच्या या प्रयत्नांमुळे किमान घरातली माय हे पाहू लागली, तिला गोडी लागली. तिला त्या लहानग्या भिमात नि त्याला सोसाव्या लागणाऱ्या वेदनेत तिचं मुल दिसलं, तिला त्या समाजातील लोकांच्या वागणुकीची कणव आली, तिला राग आला, द्वेष आला, माणूस म्हणून तिने मला मोठं केल्याचा अभिमान हळूहळू बळावत चालला. तिने तिच्या मुलींच्या विचारांचा मजला आंबेडकर विचारांचा केल्याचा तिला अभिमान वाटला. जोपर्यंत प्रत्येक समजातल वास्तव समोर येत नाही, नि त्यातली अढी सुटत नाही, तोवर हा समाज एकमेकांपासून जातींच्या किडीने किडत जाणार. त्याला एकत्र करायचं असेल तर प्रत्येक धर्माला मनापासून स्वीकारणं जमायला हवे, आणि या बदलाची सुरुवात ‘ स्व_पासून करायला हवी. जेव्हा आपल्याला दुसऱ्याच्या जातीतला बनुनही पाहता येतं तेव्हा आपल्याला माणूस होता येतं. कारण प्रत्येक धर्माचा संघर्ष वेगळा निर्माण झालाय, त्या समाजातला माणूस एकसंध सांधायचा असेल तर त्यासाठी हे छोटे छोटे बदल स्वीकारायला हवे.

हे बदल इतके स्वीकारायला हवे की, एकेक जात मुळासकट नष्ट होऊन लाल रक्तासारखा समाज उरायला हवा, आडनाव नाही, ना त्याला चिकटून येणारी जात. जे उरावं ते निखळ नि माणूस म्हणून एकमेकांना प्रेरित करणार असावं!
“कारण खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे!”

कर्तुत्वाला जातीची जळमटं न उरावी, हा समाज इतका शिक्षित व्हावा! एवढीच काय या महामानवाची अपेक्षा!

  • पूजा ढेरिंगे
Dr. Babasaheb Ambedkar
Please follow and like us:
error

2 thoughts on “मालिकेतला भिमराया घरी येतो तेव्हा…”

  1. आजच्या दिवसातला सर्वात सुंदर लेख.अप्रतिम लिहिलंय हे फक्त वाचून सोडून देण्यासारखं नाहीये. हे आत्मसात करायला हवं.खरे महापुरुष आजच्या पिढीला समजायला हवे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *