वेदना इतकीच माफक झाली होती,
मनात वणवा पेटला होता,
माझ्या मानलेल्या माणसाचा,
तो घाव जिव्हारी लागला होता,
त्यानेच विस्तव फुंकला होता!
विझवायला तेही आले नाही,
ज्यांना मी कधी हात दिला होतो… !
बघ्यांची कमी नव्हती,
ती रात्र वैऱ्याची होती,
सांगेल त्या तडजोडी करणार होतो,
पण तो माणूस त्या लायकीचा नव्हता!
तो घाव म्हणूनच जिव्हारी लागला होता,
सुरुवातीलाच दुःख देणार माहित असतानाही
मनाची तयारी कधीच होणार नव्हती,
तो माणूस कधीच दुःख देणार नाही,
हा विश्वास माझा खोटा होता…
माणूसच माणसाला वाकवतो,
दगा कधीच परिस्थिती देत नाही…
त्याच जळत्या वेदनेशी झुंज एकाकी करत राहिलो,
पडलो, झटलो, बदनाम झालो,
नाईलाज म्हणत शेवटाला
मी वेदनेशीच खुला करार केला,
माझ्याच पेटल्या हृदयाला पुन्हा वेदनेचाच स्पर्श केला,
एकदा केला दोनदा केला,
वारंवार करत राहिलो,
इतका खोलवर केला,
तिथे हैराण झाली वेदना, तिच्या संवेदना, तिचा अहंकार,
तिथे माझा संघर्ष जिंकला,
वेदनेने वेदनेचा नाश करत, मला जगण्याचा बळकट अनुभव दिला!
इतकंच मला त्या अनुभवाने सांगितलं,
ते मारुही शकतात जे तुमच्या जगण्याचं निमित्त बनतात,
– पूजा ढेरिंगे
ते जगवूही शकतात, जे तुमच्या विनाशाचा सुरंग लावणार असतात.