तुझा पाठपुरावा करणं जमणार होतं का मला?
जळलेल्या राखेतून पुनः जन्मलेला निखारा आहे मी!
राखेतल्या धुळीत अस्तित्व मिटवून जगणारी मी नाही. पण जमवलंही असतं सख्या, प्रेमासाठी.
पण असं स्वतःचं अस्तित्व खोडून टाकायला भाग पाडेल याला प्रेम तरी म्हणावं का?
खरंय, प्रेमात माघार नसतेच ना घ्यायची! पण स्वाभिमानाला ठेच लागूनही प्रेमात स्वप्नांचा रंग उधळून अस्तित्वहीन आयुष्य जगेल ती प्रेयसी मी नाही!
ती प्रेयसी भेटणं सहज शक्य आहे. ती आहे प्रत्येक घरात. प्रत्येक पालकाने घडवलेली.
पण प्रत्येक घरात असा निखारा नसतो, ज्याला स्वतःला जाळून जगत राहायचं असतं!
ज्याला जाळलं तरी फिकीर नाही, पण स्वतःचं अस्तित्व विकून सुख मिळवायचं नसतं!
हाच तर संघर्ष असतो, तुम्ही विरुद्ध प्रेम विरुद्ध समाज! जर प्रेमात आपल्या दोघांशिवाय समाजाला जिंकवायचे असेल तर खुशाल अडून रहा तू समाजावर!!
प्रेम दोघांनी केलं, अस्तित्व दोघांचं समान असायलाच हवय! प्रेम जुनं झालं म्हणून समिकरणं बदलवणारे प्रेम मी नाही करू शकणार.
समाजाची गणितं आणि त्यातून बनणारी मतं या दोन्हींवर मतभेद होणारं प्रेम! प्रेमाच्या मध्ये नेहमीच समाज उभा राहतो.
प्रेमाला जिंकवायचं तर समाज या वृत्तीला भेदूनच पुढं जावं लागतं बऱ्याचदा!
-पूजा ढेरिंगे