प्रेमाच्या, जिव्हाळ्याच्या, मायेच्या गोष्टी संध्याकाळी करायच्या, तो म्हणतो.
दिवसभर माणूस खूप शातिर वागतो. सायंकाळी सूर्य जसा शमू लागतो, तसतसा माणूस त्याच्या एकांतवासातल्या गुहेत शिरू लागतो.
दिवसभराचे बॅकग्राऊंडला असलेले विचार आता निवांत खाण्या झोपण्याच्या वेळेला येऊ लागतात, चक्क डोळ्यांसमोर!
त्या विचारांचा प्रभाव डोळे घट्ट मिटून घ्यायला मजबूर करतो. मन, तन सगळच जागं असतं. आपण घाबरून डोळे बंद करून घेतो.
गलबलायला होतं, अस्थिर होऊ लागतो, चलबिचल वागणारे आपण शरीराने नुसतेच पडून राहतो. डोक्यात सुरू असलेले विचार कुणाला सांगू शकत नसतो, मांडू शकत नसतो, आपणच आपली दारं बंद केलेली असतात. गोची झालेली असते.
तसं पाहिलं तर ना आपण बेकायदेशीर काही केलेलं असतं ना कुणाला हानी पोहोचवलेली असते. पण आपण आयुष्याचा लोड घेऊन त्या चक्रव्यूहात अडकून जातो आणि एकदा का आपण आयुष्यात सिरीयसली घेतलं की आयुष्य आपल्याला सीरियस करून टाकतं!
आणि या गंभीरतेमुळे आपण आपल्यातून संपत चाललेलो असतो.
अशाच विचारांच्या तंद्रीत जात असताना एका संध्याकाळी मस्त थंडगार वाऱ्याच्या झोताने खडकवासलाच्या पाण्याशी आपण उसासा टाकतो. पाण्यात दगडं टाकत नाही. कारण यावेळी आपण “पाणी” झालेले असतो. आपल्याला निव्वळ या सायंकाळच्या केशरी सूर्याच्या धीम्या प्रकाशात संथ वाहत राहायचं असतं. मनाचा तळ गढूळ न होऊ देता, वरच्या स्तरावर पारदर्शक समाधान ठेवून.
मग तिथे सूर्य दिसेल अशा जागी देहभान सोडून बसतो. आपले केस कसे, कपडे कसे, ओढणीच खाली पडली का किंवा बाजूला कुणी दुष्ट माणूस तर नाही ना…? या आणि अशा सगळ्या शक्यतांना कुठल्या कुठे सोडून फक्त त्या सूर्याच्या अस्तामध्ये डोळे रोवून बसते. पाण्याची झुळझुळ कानाला शांत करते, पाण्याचं केशरी वाहणं डोळ्यांना संथ करत, पक्ष्यांचं त्या पाण्यावर हेलकावे घेणं मनाला विश्रांती देत जातं.
गेल्या कित्येक दिवसांपासून कुणाच्या तरी कुशीत डोकं टेकवून सगळ्यातून मुक्ती घेण्याची धडपड सुरू असलेले आपण कुठल्या तरी माणसाच्याच कुशीत जाण्यास व्याकूळ नसतो. आपल्याला रडायचं असतं, मोकळं व्हायचं असतं, मनाच्या आत वाढत चाललेल्या खपल्या बाहेर काढून शांत झोपायच असतं. डोळ्यांच्या पापण्यांना हवेचा ओलावा स्पर्शेल इतकं शांत!
माणसाला बऱ्याचदा निसर्ग, परिसर, पाणी, पक्षी ठहराव देतात आणि त्यावेळी आपसूक बॅकग्राऊंडला हे कैलाश खैरचं गाणं ऐकू येत राहतं.
“तू जो, छूले, प्यार से
आराम से मर जाऊँ
आजा, चन्दा बाहों में
तुझमें ही, गुम हो जाऊँ
मैं, तेरे नाम में, खो जाऊँ
सैयां… सैयां…”
- पूजा ढेरिंगे