आरशात पाहून पुढाकार घेतला तिने.
यात काय विशेष असा कटाक्ष रस्त्यावरून जाणारा बाहेरचा ऐरागैरा टाकेल. इतके दिवस घराला जाळं लागलं होतं तसं तिच्या आयुष्याला लागलं होतं. तिच्या घराकडे वळणारी पावलं आता दोन वर्षांनी पाऊलखुणा झाली होती. वाटेवर कसल्याच सजीवाचा वावर नव्हता. मोडक्या आयुष्याची तिला सवय नव्हती. पण एक घटना घडते नि सगळा डोलारा पडून जातो.
एक व्यक्ती आणि हाती आलेली आयुष्याची राखरांगोळी!
त्या आरशातल्या डोळ्यांत डोळे घालून ती स्वतःला शोधू लागली…
नजर रोखून तिने पुन्हा बघितलं.
रोज दिवस रात्र एकाच चुकीची शिक्षा स्वतःवर गिरवित बसणे याचे ओरखडे शरीरावर दिसूच लागता. आज स्वत:ला बघताना कुछ बरस पेहले झालेले डार्कसर्कल तिला खोचत होते. जटा झालेल्या केसांच्या भुरभुरीत धुरा झाकत होत्या त्या काळ्या धब्यांना. चेहऱ्याच्या पुष्टीला तर कुठलं वळणच राहिलं नव्हतं. तिने डोळे विस्फारले, गाल फुगवले आणि ओठांच्या रेषा शक्य तितक्या ताणवल्या, ती स्फोटक दिसत होती.
काही वर्षांपुर्वी आरशात तीला ‘तो’ही दिसायचा सोबत. आता ती स्वतःच क्वचित दिसते. तीने प्रेम केलं, तिच्यापेक्षा वयाने १५ वर्षे मोठ्या असलेल्या दुबळ्याशी, हो दुुुबळाच मनाने आणि विचारांंनीही!
‘स्वतःचा आवाज व्यक्त करू देणारी जागा मिळाली की कोणीही फसतोच, तीही फसली.’
नाही… ती फसली नव्हती.
‘त्याने फसवलं होतं. तिने प्रेम केल होतं.’
तिला स्वतःचे विचार उरले नव्हते. किंबहुना तिला विचारच उरले नव्हते. ती चपटी झाली होती चहूबाजूंनी. त्याने शोधून दिलेलं अस्तित्व त्याच्याबरोबरच नाहीस झालं होतं.
तो गेला …..
तो गेला म्हणजे त्याने दुसरं लग्न केलं किंवा मग आधीच लग्न झालं होतं किंवा मग त्याने हिला लुबाडून खोटी ओळख दाखवून पलायन केलं, यातलं काहीच घडलं नाही.
तो गेला, कारण तिने त्याला मारलं….
हो ..
हे खरयं!
प्रेमापोटी, प्रेमासाठी आणि प्रेमामुळे!
हात चळचळला होता का तिचा ? हा प्रश्न मलाही पडला, पण एका टोकाला जाऊन संयम सुटला नि तिने मारलं.
घटका दीडघटका दोन वर्षानंतर तिने आरशाला फेस केलं होतं. स्वतःला त्यात पाहण्याचा धाडसी निर्णय तिने घेतला होता. या निर्णयाला लागूनच तिने तिचा आत्मविश्वास गोळा केला होता. मनाची, आत्म्याची आणि त्यातल्या भावनांची झालेली पडझड, मोडतोड तिने डागडुजीने वरचेवर सांधली होती. मारण्यात जमा असलेला तिचा वावर आताशा ठिकाणावर आला होता. विचारांच्या वावटळीत ती अशीच आरशात ऊभी होती, पण अचानक लगातार दरवाज्यावर पडणार्या थापेवर तिचं लक्ष गेलं…आता तिने घाई करुन, केस बांधुन, तोंडावर पाणी मारुन, तोंड पुसतपुसतच दार उघडलं….
समोर ‘तो’ होता.

हो ‘तो’ निशंक जिवंत होता. तिने मारलं तिच्या कल्पनाशक्तितल्या ‘त्याला’. आपल्या अस्तित्वाला कुणी स्पर्श केला कि तडक क्षणालाही न जोपासता, डीलिट करावं त्या व्यक्तीला. तिनेही तेच केलं. तितकं सोपं नसतं ते. पण अवघडही नाही. ‘फक्त कधीतरी स्वतःला आरशात बघावं त्यासाठी. ‘स्वत:चच अस्तित्व नसेल,तिथे त्याला ठेऊन काय करणार होती ती ? म्हणून मारलं. हात चळचळला तिचा,पण आता अस्खलित जिवंतपणा आला त्या हातांमधे. आता तो आला होता पण तिचा त्याच्याशी कुठलाही संबंध नव्हता कारण यावेळी स्वतःच अस्तित्व तिला जपायचं होतं, त्याच्या अस्तित्वापेक्षा… त्याला पाणी विचारून माठातून पाणी घेत घेतच चक्क एका वर्षानंतर ती गुणगुणली तेही गौर कारण्यासारखंच,
“खुद से आँख मिला पाओगी, खुद से मोहब्बत कर पाओगी, कई भूले नगमे मजबूत करेंगे तुझे,
आइना ग़ौर से तू देख ले|”
वाह नेहमीप्रमाणे अनोखं अन् तितकेच अलवार लेखन…