तो मेसेज करतो, तीन चार महिने उलटले की एकदा.
मेसेज मध्ये लिहिलेलं असतं, “सॉरी”
जेमतेम तीन चार भेटीतली ओळख !
तो माझा सिनियर होताा.
त्याला कोणत्या तरी मुहूर्तावर माझ्यावर प्रेम झालं.
बरेच दिवस शांत राहून त्याने मला न्याहाळल. नजरेतला आसमंत प्रेमाच्या कल्पनेने तुडुंब भरला. त्याच्या नजरेत त्याच्या मित्रांनी प्रेम पाहिलं. अन् तिथेच त्याचा आसमंत माझ्यासमोर आला.
मित्रांनी सांगितल्यावर त्यावर विश्वास न ठेवणाऱ्या मला घेऊन ते क्लासरूममध्ये गेले.
आम्हाला दोघांना बोलायला एका क्लास मध्ये ठेवलं.
माझं उत्तर ठरलेलं होतं. त्यामुळे त्यात बदल होणार नव्हता. त्याला म्हटलं काय झालं? बोल.
तो एकदम शांत झाला. पाच मिनिटाच्या त्या वेळेत एकही आवाज त्या खोलीत नव्हता.
मी तिथून निघून आले.
त्याला वाईट वाटले. त्याने दुसऱ्या दिवशी कॅफे मध्ये भेटूया? म्हणून विचारलं. मी नाही म्हटलं.
पण माझं कॉलेज सुटल्यावर तो तिथेच उभा. तो म्हणाला इथे आवाज नको असेल तर कॅफेत शांततेत बोलूया!
मी सामंजस्याने विचार करून त्याच्या सोबत गेले. तो आजही पाच मिनिटं शांत राहिला. मला अनोळखी बरोबर पाच मिनिटं म्हणजे शिक्षा वाटते. मी पुन्हा तिथून निघणार… तोच तो म्हटला, “मला आवडते तू.”
“बरं मग?”
“आपण रिलेशनशिप…”
“शु…शु…
यापुढे विचारही करायचा नाही…
जो मुलगा मला धमकी देऊन म्हणतो की, इथे आवाज नको असेल तर कॅफेत चल… आणि समजा कॅफेमध्ये न नेता त्याने दुसरं कुठे नेल असतं तर?
याला प्रेम म्हणता?
एखाद्यावर हक्क दाखवून त्याला आपल्या ताब्यात घ्यायचं. ते का तर आपल्याला समोरचा आवडला म्हणून? ज्याच्या शब्दांना आणि निर्णयाला किंमत नाही तिथे प्रेम नाही, फावल्या वेळात केलेलं प्रेम म्हणतात. चला, निघा! पुन्हा कधीच नका भेटू!”
इतके दिवस मी त्याच्या बघण्याला, त्याच्या शांततेला त्याची निरागसता आणि लाजाळूपणा समजत होते… कारण काही मुलांना खरंच प्रेम व्यक्त करता येत नाही. पण पहिल्या भेटीतच तुम्हाला तिच्या भोवती उंबरठा तयार करायचा असेल तर काय डोंबलाच आलंय प्रेम…रोमँटिक प्रेम तुमच्यावर दबाव आणतय का ते एकदा तपासून पहा. प्रेमाची सुरुवात “तू होगा जरा पागल तूने मुझको हैं चुना।” अशीच वाटते. पण त्यानंतर तुम्ही खरोखर आयुष्यभर पागल सिध्द होऊन दबले जाऊ नये म्हणून प्रेमात अडकण्याआधी ते प्रेम आहे का ते पहा. त्यामुळेे खरा पुरुष ओळखण्यासाठी एकदा कठोर होऊन पाहा…
मी तपासल म्हणून आजही तीन चार महिने उलटले की येतो त्याचा मेसेज “सॉरी”
मी रिप्लाय देत नाही. कारण एकतर्फी प्रेमाला समोरच्याने उत्तर दिलं की त्याचे अनेक अर्थ तयार होतात. तिथून पुन्हा आपण फाडलेल्या नकाशात जुन्या खुणा आणि आशेचा किरण दिसू लागतो. त्यामुळे कुणाला आशेवर ठेवू नका. कारण सुरुवात छानच असेल, मोह जाळ्यात अडकवणारी. शेवट तुमच्या समोर असेल!
शेवटी, प्रेम विणकामाएवढीच गुंतागुंतीची कला आहे. तुम्हाला धागे कळायला हवे, त्याचा गुंता लक्षात यायला हवा, नात्याला विणायला समंजस विचारांचा क्रोशे मनात जपायला हवा, क्रोशे शिवाय नात्यांची वीण बसणार नाही, म्हणून विचारांतून नात्याला भक्कम टाके घालणं जमवायला हवं. प्रेम एका टाक्यात विणलं जाणारं वस्त्र नाही. त्यासाठी दोन रंगांना एकमेकांत एकरूप व्हावं लागतं, समर्पण द्यावं लागतं. विणलेल्या गोष्टींमध्ये ऊब खूप असते. ही ऊब तुमच्या प्रेमात एकमेकांच्या साथीत अन् त्यातील हक्कात जाणवली पाहिजे.
कसय ना, प्रेम म्हणताना, दिसताना, बघताना, अनुभवताना, वाचताना बेछूट वाटलं तरीही ज्या व्यक्तीवर प्रेम करत आहात त्याचं प्रेम बेछूट आहे का, हे तुम्हाला समजायला हवं. त्यासाठी आपण समोरच्याची कोणती गोष्ट ऐकत आहोत, यावर लक्षपूर्वक विचार करायला हवा.
जर मी त्या सिनियरच्या त्या वाक्यावर विचार नसता केला तर?
तर त्या क्षणापासून त्याला माझ्यावर ‘हक्क’ या अधिकाराखाली माझा आवाज दाबण्याची सवय झाली असती. त्यामुळे व्यक्तीच्या वाक्यातून त्याची वैचारिक क्षमता समजून घ्या.
~ पूजा ढेरिंगे