डोन्ट बी अ मिनिमम गाय!

डोन्ट बी अ मिनिमम गाय!

सच बात हैं! पण साले हे बॉस, मॅनेजर लोकं खूप जास्त बोलतात, कधीकधी त्यांच्या आयुष्याचा भर पण आपण सोसायला पाहिजे इतकं गुलामासारखं बोलतात, वागवतात. पण सतत तेच ते बोलून नेहमीच ते एखादं सिग्नेचर वाक्य एखाद्या एम्प्लॉयीला टोचेल असं बोलतात आणि त्यांच्या नकळत ते वाक्य त्या एम्प्लॉयीला त्याची काबिलियत शोधायला भाग पाडतं!
श्रीकांत तसाच आयटी गाय…
मजबुरीत नोकरी करणारा करोडोंसारखा एक कीटक! कोण श्रीकांत तिवारी? असा प्रश्न कोणी विचारणार नाही. कारण एव्हाना सगळीकडे गाजलेली फॅमिली मॅन २ (Family Man 2) कोणाला माहित नाही असे क्वचितच राहिले असतील.

हां, तर श्रीकांत तिवारी,

जो भूतकाळात, काही वर्षांपूर्वी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्ये गुप्तपणे देशासाठी देशाला वाचवण्याचे काम करायचा. परंतु या सगळ्यात त्याला त्याची बायको आणि एक मुलगा, मुलगी अस छोटंसं कुटुंबही आहे. बायको व्यतिरिक्त त्याच्या मुलांना त्याच्या या नोकरीचं सिक्रेट माहित नाही. ऑफ कोर्स माहित झालं तर ते सगळेच गर्व करतील, पण त्याच्या या नोकरीमुळे त्याच्या कुटुंबाला धोका निर्माण होईल. या भीतीने श्रीकांतची नेहमीच नोकरी आणि कुटुंब यांच्या मध्ये तारांबळ उडाली आहे. म्हणून पहिल्या सिजनमधला हा डॅशिंग मॅन दुसऱ्या सीझनमध्ये केसांपासून नखापर्यंत फॅमिली मॅन बनलेला दाखवला आहे. महिन्याचा पगार, नोकरीची फिक्स वेळ, टापटीप राहणं, दुपारी जेवण, चार वाजता चहा सट्टा आणि घरी आल्यावर कुटुंबाबरोबर जेवण…

एवढं असूनही “दिल हमेशा चाहत के पिछे भागता हैं|” आणि श्रीकांतची चाहत त्याची भूतकाळातली नोकरी आहे. ज्याच्यात तो नेहमीच टपरीवर वडापाव खातो, तिथेच चहा पितो, डोकं खाजवायच म्हणून एका तासात ८-१० सिगारेटी सहज आत ओढून आतड्यांना जागं करून त्याच्या केसेसना नवं वळण देतो. त्याला बायकोची ओढ आहे पण याच्या अनियमित असण्यामुळे आणि जगण्यामुळे तिचा आणि याचा संवाद खूप आधीच तुटलाय. दुसऱ्या सीझनमध्ये तो हे सगळं नीट करण्याचा प्रयत्न करतोय, पण तिथेही तो अपयशी होतोय.

दुसरीकडे याचं मन कॉम्पुटर स्क्रीनसमोर बसूनही आज देशावर कोणतं संकट डबा धरून बसलय याच टेन्शनमध्ये आहे. या सगळ्यात त्याचा तळपदे नावाचा मित्र खूप टिकाऊ आहे. भले तो याच्या एवढा हुशार नाही पण त्याने त्याच्या नोकरीला वाहून घेतलं आहे. पण श्रीकांत म्हणजे प्रत्येकाला आयुष्यात हवा असणारा चटपटीत मसाला आहे. त्याचा प्रामाणिक हेतू त्याच्या प्रत्येक क्रियेला साधं आणि इफेक्टिव बनवतो. त्याचा क्रिस्पी सेन्स ऑफ ह्युमर सीरिजला खुसखुशीत बनवतो.

तर हा आय टी गाय, एका नव्या टिपिकल आयुष्याची सुरुवात करणारच असतो. पण त्याचा आत्मा त्या कॉम्पुटर स्क्रीनसमोर कधीच नसतो. त्याच्या मनात सतत नव्या ॲडवेंचर केसचा विचार चालू असतो. त्याच्या मनात चालणारं हे जुन्या नोकरी बद्दलचं प्रेम कधीही या नव्या जागेतून दगा देऊन पळणार होतं.
आणि ते घडतही. “जगातलं सगळ्यात शक्तिशाली शस्त्र बंदूक नाही, आपलं डोकं असतं.” श्रीकांतचं हेच डोकं या सीझनला नेक्स्ट लेव्हलला नेतं.
बऱ्याचदा तुमची नोकरी तुम्हाला निवडत असते. त्यामुळे तुम्ही कितीही तिच्यापासून दूर जा, तिने तुम्हाला ऑलरेडी निवडलेले असतं. तसचं यावेळी श्रीकांतला जागं करण्यासाठी त्याची नोकरी त्याच्या घरात हा धोक्याचा सुरुंग लावायला सुरुवात करते. वडिलांना कमजोर करण्यासाठी मुलीला शस्त्र बनवणाऱ्या अनेक सिरीज आजपर्यन्त आल्या. पण या सिरीजची कथा वेगळी आहे. कथेचा क्रम नवीन असल्यामुळे तोचतोपणा जाणवत नाही.

तुम्हाला हेही आवडेल- /http://manmarziyaan.in/bookshelf-statue/

या सिरीजमधल्या प्रत्येकाचा रोल समाजात वावरताना कसं आणि कोणकोणत्या पद्धतीने सुरक्षित राहायला हवे हे दाखवून जातो. सीरिजमधला सलमान आपल्या समाजातही आहे. तो वयाने कोवळा असला तरी तो मुलींसाठी घातक आहे. याची समज मुलींमध्ये वृद्धिंगत व्हायला हवी. त्याच्याबद्दल लिहिण्यासारखं खूप आहे, पण एवढं सांगेल, घरात न मिळणारं प्रेम, अटेंशन बाहेर शोधू नका. ते तुमचा गैरफायदा घेणारं असेल. पुरुषाच्या वागण्याचे, हालचालींचे योग्य अर्थ लावणे समजले की तुम्हाला योग्य पुरुष निवडायला सोपं जातं. तो पुरुष मित्र म्हणून असो, किंवा जोडीदार म्हणून. त्यासाठी तुम्ही सजग राहावं लागतं.

त्याशिवाय राजी…
सुरुवातीच्या काही एपिसोड मध्ये जोपर्यंत राजी अनोळखी असते तेव्हा तिचं पात्र कळणं कठीण जातं. तेव्हा वाटतं, राजी या जगातली तीच असुरक्षित स्त्री आहे, जी कोणाच्याही आयुष्यात दखल न देता स्वतःचं आयुष्य जगतेय. पण या जगातल्या पुरुषांना तिला तसं जगू द्यायचं नाहीये. मग पदाचा गैरवापर करून मजबुरी म्हणून काम करत असणाऱ्या स्त्रियांच्या शरीराला भुकेल्या नजरेने सुंगणारा मॅनेजर असो नाहीतर, बसमध्ये वासनेच्या शोधातला मवाली असो. मात्र, स्त्रियांचा उपभोग घेण्यासाठी तापलेल्या अनेक नजरांना राजी उत्तर देते.

राजी सगळ्या पुरुष सत्ताक ऍटीट्युडला उत्तर आहे. राजी म्हणजेच समंथा अकनेने ज्या पद्धतीने ते पात्र साकारले त्याला आतापर्यंत बॉलीवुडमध्ये तोड नाही. तिच्या नजरेतला तोच तापलेला ज्वालामुखी जो तिच्या प्रत्येक ऍक्शनला जस्टीफाय करणारा आहे. यापूर्वी बऱ्याच अभिनेत्रींनीं स्ट्राँग व्यक्तिरेखा केल्या, त्या व्यक्त करण्याचा अतोनात प्रयत्नही केला. त्यांचा प्रयत्न प्रामाणिक असला तरी हिचं दोन हात करणं खूप तगडं आहे. ही सीरिज राजीची आहे. तिने स्त्री असण्याचे सगळे सामाजिक पैलू आणि सामाजिक नजरा उघड्या केल्या आहेत. ज्या काही टप्प्यांवर खूप लाजिरवाण्या आहेत, काही टप्प्यांवर नवा दृष्टिकोन देणाऱ्या आहेत.


याशिवाय देशाला गरज असताना देशाचा होणारा आणि कुटुंबाला गरज असताना तत्क्षणी कुटुंबाकडे धावणाऱ्या या श्रीकांतसारख्या अनेकांच्या जिंदगीला सलाम आहे. शेवटी “पापा तुम्हें कुछ होने नहीं देंगे” हा मुलीला दिलेला दिलासा आणि “कैसी हो” हे शेवटच्या एपिसोडमधील वाक्य अथवा संवाद श्रीकांतला फॅमिली मॅन बनवून जातं. नात्याची सुरुवात कोणत्याही क्षणी होऊ शकते, सोबत राहण्याची इच्छा असायला हवी.

आणि या सोबत त्यांच्या मिशनची कुठलीच वाच्यता न करता त्याची मजा सिरीज बघूनच घ्यावी असे वाटते. ऍमेझॉन प्राईमला या सीरिजचे दोन्ही सीजन आहेत.

सिजनच्या शेवटी येणाऱ्या सिझनची झलक, यामध्ये दाखवलेला चायनीज माणूस ज्या इंटरनेट खटापटी करत आहे त्या कोरोना व्हायरसशी संबंधित नसल्या म्हणजे झालं. 😛

-पूजा ढेरिंगे.

Please follow and like us:
error

3 thoughts on “डोन्ट बी अ मिनिमम गाय!”

  1. Pingback: युपीएसी शर्यत उमेदीची... -

  2. Pingback: दिठी... वेदना शमवणारी! -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *