लर्निंग पिरियड सुरू आहे असं वाटू लागले. तसही माणूस सततच शिकत असतो. कधी त्याला ते कळत असतं कधी नसतं कळत. पण म्हणून शिकणं थांबलेलं नसतं. जो आयुष्यातल्या संकटांना तोंड द्यायला शिकतो तेव्हा तो नेहमीच लर्निंग पिरियड मध्ये असतो. माझ्या आयुष्यात मी जे कधीच केलं नाही ते सगळं मी पहिल्यांदा करतेय. मग त्यात स्वतःच्या तत्वांना प्रायोरिटी देऊन कुणाला दुखावणे असो, नव्या आव्हानांना सामोरं जाणं असो, घरात रात्री एकटं राहणं असो. हे खूप आव्हानात्मक असतं. काहींना याची सवय असते. पण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही चॅलेंजिंग घडतच असतं.
मला यापूर्वी नेहमी वाटायचं, एकटं राहणं किती आकर्षक आहे. मला ते अनुभवायचय. पण आज नकळत माझं ते स्वप्न जेव्हा पूर्ण होतंय. माझ्याकडे लक्ष द्यावं, किंवा आजूबाजूला कुणी असावं असं खोलीत कुणीच नाहीये तेव्हा भूक लागलेली असताना फक्त रिकामी ताट समोर आल्यावर जसं वाटतं ना तसं मला वाटत आहे. मला लाईट बंद करताना भीती वाटतेय, खिडकी बंद करताना कुणी अचानक येतं की काय असं वाटून जातंय. मी मागच्या बाल्कनीचा दरवाजा चक्क घाबरून उघडत नाहीये. कसली भीती आहे ही? मनातल्या विचारांची? भूताची? सावल्यांची? माणसाची ? की मग जे आजवर कुणीतरी मनात भरवत गेलं त्याची? माझ्या घाबरण्याला मनातल्या मनात दिलासा मिळेल अशी उत्तरं येत होती. हे ज्याला मी माझं घर म्हणते, ते माणूस नसताना कित्ती परकं वाटतंय. “भीती माणसाला किती घेरून टाकते” हे मला त्या एकांतात सतत जाणवू लागलं. पण मग मी एक धाडस केलं. आरशासमोर गेले, घाबरत घाबरत! पहिल्यांदा आरशासमोर जाणं नवीन आणि कठीण वाटत होतं. कदाचित हॉरर मूव्हीचा परिणाम असेल नाहीतर मी त्यावर विश्वास ठेवण्याचा. स्वतःला पुन्हा तोच तोच प्रश्न विचारला. यावेळी मी स्वतःच स्वतःला पाहत होते. काव्यात्मक भाषेत सांगायचं तर स्वतःच स्वतःला भेटत होते. पण ही भेट खूप विचित्र होती. तुम्ही नाटकात काम करत असाल तर हे तुमचं नेहमीचच असेल. पण चेहऱ्याला फक्त रंगोटी करण्यापुरतं आरसा वापरणारे माझ्यासारखे कित्येक अशा नाजूक क्षणी विचित्र फील करतात.
मी तर यापूर्वी आतल्या भीतीला चक्क टाळायचे. उगाचच फुल वॉल्युम करून चित्रपट पाहायचे. लाऊड म्युजिक ऐकायचे. घरात शांतता ठेवायचे नाही. माझी एक बाजू अशीही आहे की मी दिवसा एकटी खायला जाऊ शकते. एकटी सिनेमाला जाऊ शकते. पण रात्री एकटं असण्याची भीती माझ्यात होती हे मलाही आताच कळत होतं. तसं याआधी मी ऐकलेल्या, पाहिलेल्या, कल्पना केलेल्या रात्रीच्या भयावह वर्णनामुळे मी रात्र आणि भूत किंवा रात्र आणि निगेटीव्हीटी ही समीकरणे अजाणत्या मनात पक्की झली होती. या तुलनेत रोमँटिक कँडल लाईट डेट, डिनर, रोमँटिक रात्रीचा किंवा क्वालिटी टाइम घालवून रात्री प्याले रिचवल्यासारख्या रात्री खूप थोडक्या! त्यामुळे गेल्या २५ वर्षात मनात भीतीचे कण अडकून राहिले आहेत. I never face the fear I’ve had since my childhood. त्या एका कारणामुळे मी नेहमीच खूप अंडर कॉन्फिडन्ट फील केलं. तर आज त्या आरशासमोर उभं राहिल्यानंतर स्वतःशीच बोलताना आधी तर सतत डोळ्यांच्या आत पाहिलं. नंतर ओठांच्या कडांना आणि त्यानंतर संपूर्ण चेहऱ्याला. हे नक्की आपणच आहोत का? असले प्रश्नही पडले… मग एक सेकंद एकदम टकाटक बोलल्यानंतर रडूच आलं. अचानक हां! काहीच संबंध नसताना. अशावेळी ना वेळेचं बंधन, ना कसली घाई, ना कुणी आजूबाजूला… त्यामूळे आपण जेवढं आरशात पारदर्शक दिसतो तसचं बोलत जातो. आरसा माझ्याकडे पाहतोय, मी आरशात आणि अशाच एका भावूक क्षणी आरशातली नजर भेटते मनातल्या भेगांना,नजरेला आधार मिळतो स्वतःतल्या धाडसी विचारांचा… त्यावेळी मी खूप बोलले स्वतःला, स्वतःच्या वाईट सवयींना, स्वतः मधल्या चांगल्या गोष्टींना, तेही मोठमोठ्याने आणि मला जाणवू लागलं मी हळूहळू निगेटीव्हीटी बाहेर टाकतेय, विष बाहेर टाकल्यासारखं आणि जे समोर आहे ते स्विकारतेय. मी तो एकांत, एकटं राहणं, तिथली शांतता, प्रत्येक गोष्टींचे आवाज, वस्तूंचं अस्तित्व आणि माझ्या श्वासांचं अस्तित्व. मी स्वीकारलं की मी जर आता या भीतीच्या फुगवट्याला घाबरले तर मी कधीच एकटी जगू शकणार नाही.
माणसाने कोणत्याही परिस्थितीत राहणं शिकायला हवं. तसं माणूस जन्मतःच फाईटर असतो. कारण नकळत त्याच्या वाट्याला त्याच्या जन्माचा संघर्ष आलेला असतो. त्याने स्वतःला जिंकलं. तिथे तो जग जिंकतो. कारण स्वतःला जिंकलेल्या माणसाला जगाची फिकीर राहत नाही. आज मला कळलं, आरशात उभं राहून आपण कसे देखणे दिसतो हे जगाला दाखवण्यासाठी चांगलंच आहे. पण आरशात पाहून खरंच स्वतःला भेटणं, सगळं खरं सांगणं, कन्फेस करणं म्हणजे स्वतःच्या भीतीवर मात करणं, आपल्याला वाटतं तितकं हे कठीण नसतं. फक्त आपल्याला ते तितकं गरजेचं वाटलं पाहिजे.
माझ्या प्रवासाचा टप्पा मी सुरू केला आहे. तुम्हीही ट्राय करा. यात मी स्वतःलाच recollect करण्याचा डीप प्रयत्न केला आणि जे अवघड आहे असं आपल्यावर बिंबवले गेले ते खरेच अवघड आणि भीतीदायक असतं का? याचा शोध घेऊ लागलेय. हा प्रवास खूप काही समृद्ध करणारा आहे