तोंडावर तोंड येतं, वाद वाढत जातो,
माघार घ्यावी म्हटलं तरी त्यासाठी उच्चारलेला एखादा शब्द सगळं नातं कापत नेतो.
आपल्याला वाटतं म्हणून निघून जाणं कधीच पर्याय नसतो.
कारण निघून गेलेल्या ठिकाणचा भूतकाळ तुमची पाठ सोडत नसतो.
नातं तोडायला हजारो कारणं मिळतात प्रत्येक पावलावर,
टिकवायला एक पुढाकार घ्यावा लागतो.
कारण तोडायचा एकदा मनात विचार आल्यावर तुम्ही पुन्हा तितक्या ताकदीने प्रयत्नच करत नाही.
भांडणांवर विचार करून चालत नाही, कारण खूप वेळ समोरचा आपल्याला असं बोलला, तसं बोलला या विचारात आपण खूप खोल दरीत कोसळतो, जिथे फक्त विष तयार होत असतं.
नातं तोडायचा निर्णय घेण्यापर्यंत तुम्ही जातात, म्हणजे तुम्ही आधीच तुमचे मार्ग शोधून ठेवलेले असतात.
पण तुम्ही शोधलेले मार्ग तुम्हाला योग्य ठिकाणी नेणारे असतीलच असं नाही. कारण मागचा बॅकलॉग आयुष्यभर उरतो,
मनाला खात राहतो,
त्यामुळे सांधायचं ठरवलं की ते सांधलच जातं.
नाती जपायची म्हटल्यावर स्वभाव थोडा बदलावा लागतोच…
एकमेकांना समजून घेईल असा मध्यम स्वभाव निर्माण करावा लागतो,
थोडं मनाविरुद्ध वागावं लागतच,
पण म्हणून बिघडत काही नाही. उलट नातं सुधारायला मदत होते.
नात्यात कितीही भांडण होवो, जर तुम्हाला एकत्रच यायचं यावर तुम्ही ठाम असाल तर उणीधुणी काढून उपयोग नसतो.
कारण त्या भांडणात बोललेले असंख्य शब्द नंतर नात्यात चोचीसारखे टोचत राहतात. त्यामूळे कोण चूक, कोण बरोबर याचा हिशेब कुठल्याच नात्यात शक्य नसतो. कारण
टिकतं तेच नातं जे योग्यवेळी माघार घेतं.
जितकी तत्काळ भांडणं, तितका मोठा नात्याचा प्रवास बर का!
अशावेळी एकमेकांना एखाद तासाची स्पेस द्यावी, त्याचं त्याला शांत होऊ द्यावं, तुम्हीही शांत व्हावं!
आणि सुरू करावा नवा अध्याय…नवी सकाळ, नवा चहा, नव्या गप्पा!
-पूजा ढेरिंगे