त्याने आयुष्य स्वीकारलंय. मला माझं आयुष्य आणि त्याचे विविध शेड्स स्वीकारणं कठीण जात आहे. वयानुसार हळूहळू तेही सोपं होईल कदाचित. या प्रवासात प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या परीने आयुष्याला ओळखून नवे लेबल्स लावतो. काहींना वाटतं, त्यांच नशीबच फुटकं त्यामुळे त्यांच्या पदरी काहीच पडत नाही. काहींना सगळं मिळूनही समाधान नसतं. मैं जहाँ रहूं गाण्यात जावेद अख्तर लिहितात, “कोई नई दुनिया के नये रंगो में खुश रहता है, कोई सब कुछ पाके भी यह मन ही मन कहता है!”
डर यहीं तो हैं. आज जो मुझे बेहद सुकून देनेवाला सपना हैं अगर कल उस सपने से मुझे सुकून नहीं हासिल हुआ तो फिर ? कितना और भागना हैं ? जिंदगी के कुछ पल जाया करना मतलब एक अच्छी जिंदगी से तलाक लेना। मुझे वो मंजूर नहीं हैं. मैं क्या चाहती हूँ जो जिंदगीभर मुझे सुकून दे ? मेरी खोज जारी हैं।
इंसान को अकेलेपन के सिवा सबकुछ मंजूर होता हैं। वो हर ख्वाइश में अपनापन ढूंढता हैं।
आपल्याला स्वतःची तुलना आपल्या स्टँडर्डच्या खालच्या लोकांशी केलेली आवडत नसते. आपण त्यांना नाकामयाबीचे ढीगभर पारितोषिके देऊन मोकळे होतो. पण ते खरंच नाकामयाब असतात का?
आपण आपल्या वाट्याला आलेली परिस्थती बदलू पाहतो म्हणून आपण दिग्गज. त्याने त्याची परिस्थिती स्वीकारून तो जगतो म्हणून तो मागास. आयुष्याच्या शर्यतीत हे जातींचे वर्गीकरण नाही लागत, इथे मात्र सगळे खुल्या प्रवर्गातले. इथले अन्याय सगळ्यांना सारख्याच प्रहाराने झेलावे लागतात. काहीजण खूप कष्टांतून स्वतःच्या नावाचं रोप लावायचा प्रयत्न करतात, काहींना आयुष्य अन्याय वाटू लागतो, तेव्हा ते आपल्या परिस्थितीला, आजूबाजूच्या लोकांना, नाते संबंधांना जबाबदार ठरवू लागतात. आपल्या आयुष्याची जबाबादारी ज्याला घेता आलीच नाही तो खरा हरला.
माझ्या आयुष्याची तुलना करायला जेव्हा बाजारात उतरते, तेव्हा घराच्या खालीच मला इस्त्रीवाला भेटतो, डोक्यात कसलाच गुंता न ठेवता तो नित्यनेमाने भावगीत ऐकून दिवसाचं स्वागत करतो. गाणी गुणगुणणारी माणसं ढोंग करत नाहीत, ते आतून खुश असतात तेव्हा ते संगीत त्यांच्या आजूबाजूला आपोआप पसरतं. याउलट मी त्याच्या समोरून जाताना उगाच त्याच्या परिस्थितीवर दयेचे लेबल लावते, स्वतःच्या वाट्याला आलेल्या आयुष्यावर खुश होते. माणूस खूप विचित्र असतो, त्याला बाहेरच्यांच्या परिस्थिती बद्दल दुःख आणि स्वतःच्या परिस्थितीचा गर्व एकाचवेळी वाटतो. ज्यातून तो कधीच डुबत्याला पूर्णपणे आधार देऊ शकत नसतो.
इस्त्रीवाल्याबद्दल मी दया वाटून घ्यावी ? कारण समाजाने आखलेल्या चौकटीत मी प्रतिष्ठेचं काम करते ? कि मग मी त्याच्या वाट्याला येणाऱ्या मानसिक सुखाचा हेवा करावा ? या हेव्यातून मला वाटावं कि, समाज गेला खड्यात, मन महत्वाचं आहे ! पैसे तोही कमावतो, मीही कमावते. त्याच्याकडे एक्सट्रा काय आहे? तर मनःशांती !
गोम हीच आहे, मनशांती पर्यंतचा प्रवास ज्याचा त्याचा करावा लागतो. इस्त्रीवाला खुश दिसतोय म्हणून मी उद्या लॉंड्री टाकून मनःशांती मिळवूच शकत नाही. स्वतःच्या मनःशांतीचे दार स्वतः शोधावं लागतं. आयुष्याच्या मध्यावर कुठेतरी सापडतं हे. त्यावेळी ते दार निवडणं कठीण असतं. कारण आपण त्यावेळी नोकरी, लग्न, हफ्ते, नातलग या सगळ्यांशी जुळवून घ्यायला लागलेले असतो. खरं सांगायचं तर आपलं आयुष्य स्वीकारण्याची मनाची तयारी झालेली असते. तिथून या दाराकडे जाणारे अस्मादिक खूप थोडे असतात, मग त्यांना प्रपंचातून सन्यास घेण्याची नवीन लेबल्स लागतात. त्यांना त्याची पर्वा नसते, कारण त्यांची भेट त्यांच्या आयुष्याशी झालेली असते.
खोज जो जारी हैं, वो रहने दे जिंदगी, तब तक मुझे दूसरों के खुशी के राज़ जीने दे।
– पूजा ढेरिंगे