ऑफिसच्या रोजच्या व्यापात कुठलाच कप्पा पाहायला सुद्धा वेळ नसतो. कपड्यांचा कप्पा मात्र चोख ठेवावाच लागतो, ऑफिससाठी ते एकमेव महत्त्वाचं असतं. प्रेजेंटेबल राहणं वगैरे! काय करतो त्यापेक्षा काय घालतो यावरून माझं असणं ठरवलं जातं.
पण या निवांत वेळात कप्पे आवरताना कपड्यांची रेलच्या रेल काल धापकन खाली पडली, त्यात एका नारंगी टॉपच्या दोर्यामुळे लागूनच असलेल्या पुस्तकाच्या कड्याला जाऊन अडकली. ती ओढायला जाताना हळूच पुस्तकाचा कोपरा बाहेर आला. ‘हा सिन जरी प्रेमात पडलेल्या मुलाच्या घड्याळात तिची ओढणी अडकल्यासारखा असला’ तरी या सिनमुळे मी लालचीपणाने का असेना त्या पुस्तकाच्या कड्यात अडकलेल्या दिवसांमध्ये गेले. किंचित धूळ साठली होती, पुस्तकाच्या पानांच्या कडेलाही आणि आठवणींनी भरलेल्या डोळ्यांनाही…
मनातला कप्पा तो कायमचा झाला होता. पण त्या टॉपने त्याच पुस्तकाच्या कड्याला का अडकावं? म्हणत मी निमित्ताने का असेना पण त्याच्या आठवणीत पोहोचत होते. पुस्तकांचं जग वेगळं असलं तरी पुस्तकही आपल्याला वेगळं जग गिफ्ट करत असतात, मला त्याच्याकडून कळलं होतं.
कारण दोन वर्ष आणि काहीसे एक्स्ट्रा दिवस, तो आयुष्यात येण्याचा तो दिवस होता.
माझ्या वाढदिवशी त्याने मला पुस्तके दिली होती.
उम् …
काहीतरी साताठ पुस्तकं असतील. काही कविता, कादंबऱ्या आणि इंग्रजीतले सुधा मूर्ती आणि पाउलोचे दोन पुस्तके.
त्याने पुस्तके का दिली…? म्हणजे तो मला काहीही अगदी काहीही देऊ शकला असता. प्रेम व्यक्त केलं नव्हतं, पण प्रेम होतं, ते जगजाहीर होतं फक्त मला जाहीर करायचं बाकी होतं. पण आमची तर मैत्रीही तितकीशी झाली नव्हती, तरी आकर्षण आणि त्यातून लपून डोकावणार प्रेम मात्र ओथंबून वाहायच, माझ्या अपेक्षांनी मोहाचे डोंगर पार केले होते. पण तो आयुष्यात आल्यानंतरच्या पहिल्याच वेळी पुस्तकं? …

मी थोडी नाराज झाले होते. कारण माझी आवड जरी पुस्तकं होती पण मला त्याच्याकडून अजुन काहीतरी अपेक्षित होतं. अजुन असं काहीतरी जे पाहून मी जगाला सांगू शकेल, “माझा वाढदिवस आहे आणि याने या माझ्यावर प्रेम करणाऱ्या वेड्याने माझ्यासाठी हे मला नटवणारं गिफ्ट दिलंय… “ अर्थात साजशृंगार हे गिफ्ट असतं, या विचारांच्या काळातील मी ही होते.
पण तस काही झालंच नव्हतं…
मी नाराज झाले होते आणि खूप नाराज होते. आवडत्या मुलीला कोणी पुस्तकांचा संग्रह देतं का? शाळेत वाचली ती कमी होती का? माझा तो पूर्ण दिवस नाराजीत आणि चिडचिडीत गेला होता. लोकांच्या मुलींचे प्रियकर किंवा एकतर्फी प्रेम करणारे त्यांच्यासाठी काय काय करता, क्काय क्काय! किती सजवता, नटवता. पण आपलं नशीब हे ऋषी महाराजांच्या काळातल आहे, हे कुठे माहीत होतं.
ही चीड आणि राग हळूहळू ओसरू लागला होता, जेव्हा त्याच्याशी प्रेमाआधी मैत्री झाली होती. मैत्रीचा हक्क गहिरा होत चालला होता, त्यामुळे हळूहळू मी त्यालाही माझं रुसणं, चीडणं व्यक्त करू लागले होते. तो आता मला बनावटी वस्तूंची शौकीन म्हणून ‘सस्ते तौफे’च्या नावे चिडवू लागला होता.
आमचा मैत्रीचा कट्टा बहरू लागला होता. आता तो रुसवा फुगे घेऊन उडून गेला होता. मैत्रीच्या नात्याला पूर्ण करत माझा तेविसावा वाढदिवस उद्यावर आला होता. यावर्षी मात्र मी अनेक तूक्के लावत काहीही स्वप्न रंगवत होते. यावेळी अपेक्षांचा भार नव्हता, कारण मला तो कळला होता… आणि कदाचित…
कळला होता म्हणूनच त्याच्यावर …
आह … नको आत्ताच नको ! त्याच्यावर प्रेम करायला म्हणून मी आमच्या नात्यातल्या दुसऱ्या वाढदिवसाला फक्त त्या प्रेमाच्या फिलिंगमध्ये जगाायचं ठरवलं होतं.
यावेळी त्याने सात आठ नाही, तेवीस पुस्तके आणली … त्याचं लॉजिक म्हणजे तेविसावा वाढदिवस! पुस्तके पाहून यावेळी मी थोडी नरमले!
पण सोबतीला अजून काहीतरी होतं, झुमक्यांची रुणझुण, एक ड्रेस आणि एक रसरशीत लाल रंगाची लिपस्टिक.
आणि हो, एक प्रपोजलही! लाल गुलाबावालं नाही, प्रत्येक पुस्तकाच्या पहिल्या पानांवर त्याचं माझ्यावरचं प्रेम त्याच्या शब्दात लिहून केलेलं प्रपोज…!
त्यामुळे पुस्तकांशिवाय आणलेल्या तीन गोष्टी पाहून झाल्या, त्याचा मला विसरही पडला पण ओढ मात्र पुस्तकांची होती. कारण एका वर्षाच्या मैत्रीत त्याने मला नि मी त्याला विचारांनी प्रगल्भ केलं होतं आणि आता हे पुस्तकावर लिहून दिलेलं प्रेम…
उफ्फ़… केवढं मौल्यवान प्रपोजल ते!
त्याला कुठल्या शब्दांची आणि कुठल्या क्षणाची जोड देऊ?
माझा हट्ट हा एका वर्षात इतका बदलला? मीच थक्क होत होते.
“आपल्या आयुष्यात एखाद्याची सोबत किती पौष्टिक असू शकते.” याचं उदाहरण ‘तो’ होता.
आज आम्ही दोघे सोबत आहोत, अजुन वाढदिवस आला नव्हता. पण ओढ मात्र नेहमीसारखी होती. कारण प्रत्येक वाढदिवसाबरोबर आमच्या दोघांचं नात्याचं पुस्तक विणलं जात होतं, लिहिलं जात होतं नि नातेबद्ध होत होतं.
आज अचानक ऑफिसच्या व्यापाला दूर ढकलून पुस्तकांनी त्यांच्या जवळ खेचत मला त्या दुनियेत नेलं होतं…
“जमाना वो चंद लम्हों का था ज़रूर, यादें मजबूत दे गया,
आज भी सवारूं यादों को, जिंदगी के पन्ने खुद को खूबसूरत बना देते हैं।”
त्यामुळे आज कपड्यांच्या कप्प्यातून पुस्तकांच्या कप्प्यात अडकलेला टॉप ही साजिश होती पुस्तकांची किंवा प्रेमाची…
सामंजस्याच्या आजच्या वयात मला त्या वयात दिलेला सगळ्यात सुंदर तौफा आजही भरभरून जगता येतोय.
त्या दिवशी तू नटवणार गिफ्ट तर दिलच पण पुस्तके दिली, किती पुढच्या विचाराने तू ते केलं होतं.
पण तरीही मला त्याने आणलेला साज त्याला दाखवायचा होता, त्याच्यासमोर त्याच्यासाठी नटायचं होतं.
मी आधीच्या वाढदिवशी झालेल्या किस्स्याने खजील होतं त्या तिन्ही गोष्टींवर हात फिरवला… तो पक्का तयारीनिशी आला होता. त्याने कानातले, ड्रेस आणि लिपस्टिक माझ्या हातात दिली.
छोटा आरसा जमिनीवर ठेऊन मी हौसेने झुमका कानात घालताना तू म्हणालास,
“इस झुमके की रुमझुम तुम्हारे हंसी का एहसास देती हैं,
कल ज़माना चाहें सस्ता हो जाए लेकिन तेरे हंसी का गहना हर साल महंगा होता जाएगा।”
तुझ्या त्या झुमक्याला मनाशी कुरवाळत मी ड्रेस घालून तुला दाखवायला आले, त्यावर तू फर्मावले,
“तुमने पहनी वो जो ड्रेस है उसपर जो रंग हैं,
दिखता तो लाल हैं लेकिन तेरे गालों के गुलाबी रंग ने उसे मोहब्बत जैसा सजा दिया है।”
‘उफ्फ! इतने कातिल तौफे जमाने में होते हैं?’ त्याचे शब्द ऐकत मी त्याला विचारलं…
जी हां… प्रेम करणाऱ्या व्यक्तीसाठी असतात ते. तुला नाही सापडणार.
तरीही माझं प्रेम मी मनात दडवत लागलीच ओठांच्या कडांना त्या रसरशीत लाल रंगाच्या दामनाने रंगवू लागले, लिपस्टिकच्या रंगाला पाहून तो म्हणाला,
‘बस भी करो मार डालोगे क्या?’
‘आप यूंही सजती जाएगी हमारी अलफाजों की फुलझडियां खिलती जाएगी।’ म्हणत म्हणत तो श्र्वासांच्या धाकधूकीजवळ आला….
“तुम्हारे इश्क के इंतजार का रंगsss कुछ ऐसाsss ही था,
शुरू होने पर बहुत नया था, फिर गाढ़ा हो रहा हैं।”
आणि तो क्षण ओठांशी ओठांनी बांधला जाणार तोच हळूच एक पुस्तक उचलुन मी ओठांवर ठेवलं… इश्यsss ! प्रेमातल आमचं पहिलं चुंबन ते हे असं झालं … मुकं, गहिरं आणि मादक!

आज ना तेव्हाचे शब्द आठवत होते, आठवणीत थोडेसे धूसर झाले होते … आणि त्या वस्तू? त्या तर वापरून संपून गेल्या होत्या, दोन वर्षापूर्वीच्या वाढदिवसाबरोबरच… वाढदिवसाच्या दोन महिन्यात या वस्तूही बाविसाव्या वाढदिवसाएवढ्या जुन्या झाल्या. कधीही परत न येण्यासाठी….
पण आज टॉपमध्ये अडकलेल्या पुस्तकाने त्याच्या प्रेमाला पुन्हा माझ्या ओंजळीत आणून ठेवलं होतं, पुन्हा प्रेमात पडण्यासाठी, पुन्हा नव्याने ऑफिस व्यतिरिक्त त्याच्याबरोबर हे प्रेम वाटण्यासाठी…
पुस्तके वस्तुंसारखी मरत नाही, आपल्याला जिवंत करत राहतात…
© Pooja Dheringe
#पुस्तक_दिन