तारुण्यातील मोठा राक्षस कोणता, तर लग्न !

लग्न या संकल्पनेने जेवढं आयुष्य विभागल गेलं ते कोणत्याच गोष्टीने नाही. आयुष्यातला सगळ्यात मोठा बदल, जो प्रत्येकवेळी हवाच असतो असं नाही. पण समाजाने आखून दिलेला असतो. समाजाचा विचार सोडला तरी आपल्यासाठी घरचे महत्त्वाचे असतात आणि घरच्यांसाठी समाज. त्यामुळे एकूण एक चक्रात आपण गुरफटत अडकत जातो. तारुण्यात नोकरीची शोधाशोध, प्रेमाचे गुंते, आणि घरी लग्नाचे विषय… यामुळे मनाची लाहीलाही होत असते.

मीनाच्या, माझ्या मैत्रिणीच्या आयुष्याचं असंच गणित चालू आहे. तिचा लग्न संस्थेवर विश्वास नाही. तिला लग्न राजकारण वाटतं आणि या राजकारणात उतरायला लावणारे घरचे तिच्या विरुध्द असल्याचा भास होतो. ती आजपर्यंत या विषयाला टाळत आली, पण हा विषय कितीही टोकाला जाऊन घरच्यांशी वाद झाले आणि घरचे म्हटले की यापुढे या घरात हा विषय बंद… तरी तो विषय बंद होत नसतोच. तेव्हा मनाला ते गाणं पटू लागतं,
सबसे पहले शादी थी, यारो जहां में जिसने की
उसको ढूंढो, पकड़ो पीटो, गलती उसने की!
ॲक्शन रीप्लेचं हे गाणं आणि त्याचे लिरिक्स ती नेहमी गुणगुणायची.
गेल्या लॉक डाऊन पासून तिच्या घरी हाच गलका चालू आहे… ती आयुष्याच्या अशा टप्प्यावर होती की कशावर लक्ष लागत नव्हतं. परीक्षेच्या आणि रिझल्टच्या आधी देवाला नवस करून बोनस मिळवण्याच्या ट्रिक्स सुद्धा कामी येत नव्हत्या. ती देवाला प्रत्येक लालच दाखवून लग्नाच्या विषयापासून लांब राहण्याचे प्रयत्न करू लागली होती. पण तिच्या घरच्यांसमोर तिचे सगळे प्रयत्न फसत होते. मिळालेल्या नोकरीत चुका होऊ लागल्या होत्या. बॉसचे बोलणे ऐकण्यापेक्षा तिला स्वतःचाच राग येऊ लागला होता, कारण कामात क्वालिटी जपणारी मीना हळूहळू कुटुंब पद्धती आणि लग्न संस्थेत स्वतःला हरवून बसली होती.

वयाच्या बाविशी नंतर शरिराभोवती वेढलेला गुंता आता हळूहळू तिच्या मनाला कापू लागला होता. ती दिसायला देखणी होतच होती पण हळूहळू तिचं देखणेपण अस्ताव्यस्त टेंशनमध्ये विरून गेलं होतं. डोळ्याखाली डार्क सर्कल्स, वजन जास्तच वाढणं नाहीतर एकदाचं कमी होणं याची आता गेल्या वर्षभरापासून तिला सवयच झाली होती. घरच्यांशी संपर्क तुटला होता. घरात राहून ती घरच्यांपासून दूर जात होती.
कारण लग्न नावाचा राक्षस समाजाने वयाच्या चौकटीत बसवला होता. तिला लग्न हे मर्जीने हवं होतं, त्याला वयाची अट नको होती. पण सतत लग्न कर, लग्न कर हा हट्ट कोणी सोडत नव्हतं. दूर रानात पळून जावं कधीही न परतण्यासाठी! हा एक विचार तिच्या मनाला शांत करत असावा… पण तिच्याकडून तेही होणं शक्य नव्हतं… कारण कोणाला न दुखावण्याचा तिचा स्वभाव होता. अस असलं तरी घरातल्यांशी जोडलेल्या नाळेमुळे ती काय करेल ही हूरहूर असते मनात. तिच्या जाणिवा नेणिवा तितक्या प्रगल्भ आहेत, पण लग्न आणि त्यातील अपेक्षांमुळे मनाचा तोल जाणं स्वाभाविक आहे. कारण स्वतःच्या कुटुंबाच्या अपेक्षा आहेच पण लग्न केल्यानंतर तिच्या आयुष्यात सुरू होणाऱ्या अनोळखी प्रवासातल्या अपेक्षांशी तिची अजून ओळखही झालेली नाही.

आपल्याच घराच्यांनी लग्नामुळे एवढं निकामी केलंय, सासर म्हणून जे समोर येईल ते परकंपण अजून पोरके करून जायला नको… तिची भीती, तिच्या मनाचा अस्थिरपणा थांबत नाही. मिनासारख्या अशा अनेक मुली/ मुलं याच स्थितीतून जात असतात.
आता परिस्थिती बदलली, आमच्या काळात अस नव्हतं बाई! हे वाक्य प्रत्येक पिढीतल्या प्रत्येक व्यक्तीचं असलं तरी त्याने लग्न पद्धतीत विशेष बदल झालेला दिसत नाही.  सर्वसामान्य घरांमध्ये तर नाहीच नाही… उलट तारुण्यात आलेल्या या मुलांची डोकं सुन्न होण्याचं प्रमाण वाढलं आहे. कारण जगातल्या शिक्षणाची पातळी, नोकरी, संधी यांचा स्तर उंचावला आहे. त्यामुळे रोज काहीतरी नवं शिकून स्वतःला या स्पर्धेत कायम ठेवावं लागत आहे. पण विशिष्ट वयानंतर घरच्यांच्या या लग्नाच्या बेडीमुळे आयुष्याची घडीच मुळात पुन्हा विस्कटत आहे.
मीनाने घरी समजवण्याचे लाख प्रयत्न केले, पण घरच्यांना समाजाच्या चौकटीची इतकी सवय झाली की, हा अशाच मानसिकतेने बनलेला समाज एकासाठी उपायकारक ठरत असला तरी कितीतरी आयुष्य याच्या कापणीत छाटली जात आहे. या मिनासारख्या कहाण्या सुरू होतात मनाच्या सगळ्या कोपर्यांना दुखावून आणि संपतात नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर…

आपल्या आई वडिलांच्या पिढीशी आणि समाजाशी संघर्ष हा कठीण आहे, पण आपण आई वडील होऊ तेव्हा हा संघर्ष सोपा करण्याचा प्रयत्न करू, समाज बदलण्याची गरज आहे. फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन आणि स्पीच याची घरात अंमलबजावणी होण्याची सक्त गरज आहे, किमान आयुष्यातील वैयक्तिक निर्णयांच्या बाबतीत तरी!

– पूजा ढेरिंगे

Please follow and like us:
error

1 thought on “तारुण्यातील मोठा राक्षस कोणता, तर लग्न !”

  1. Kharach uttam ani current situation var lihila ahes tu…ani he kharach barobar lihila ahes. Kharacha jevha apan aai vadil hou tevha ha sangharsha kami karanycha praytna karu✅

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *