लग्नाचा निर्णय घेताना…

  • by

काय झालं, कसं झालं ? या दर्दी डायलॉगपेक्षा दोघांच्या आणि घरच्यांच्या मर्जीने, पसंतीने, प्रेमाने आणि आनंदाने झालं हे समाधानकारक आहे! “बेस्ट फ्रेंडवाला प्यार और प्यारवाली शादी।” या एका ओळीत बसणारी ही लव्ह स्टोरी आहे. तसं मैत्रीत प्रेम आणि प्रेमात लग्न हा भावनिक लोचा गुंतागुंतीचा होता. पण जर तुमचा बेस्ट फ्रेंड तुमच्या बाजूने असेल तर इतर प्रॉब्लेम्सची शून्य भीती उरते. त्यात जर आपल्या पिढीबरोबर बदल स्वीकारणारे पालक असतील तर मुलांची आयुष्य सोपी होतात. आम्ही दोघेही याबाबतीत खूप भाग्यवान आहोत.

तसं बेस्ट फ्रेंडवर प्रेम करण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे सुरुवातीपासूनच हा बाँड कुठल्याच हेतूने तयार होत नाही. तो नॅचरली बिल्ड होत जातो. दोघांच्या आयुष्यातल्या अनेक भावनांच्या रिकाम्या जागा भरत भरत तो एकमेकांना स्ट्रॉंग बनवत जातो. तसचं या मित्राने/ प्रियकराने/ ताज्या ताज्या नवरदेवाने केलं. सुखात जेवढं हक्काने तो सोबत उभा राहिला तेवढ्याच हट्टाने दुःखात सोबत केली. सुख दुःखाच्या पुढे जाऊन त्याने मला स्त्री म्हणून निर्माण होणाऱ्या अडथळ्यांना तोडायला शिकवलं. नवीन गोष्टी सुरू करण्याला प्रोत्साहन दिलं. मुली स्वतःचं करीयर स्व बळावर करतील इतक्या भक्कम असतात पण जोडीदार जर उत्तम प्रियकर म्हणून मिळाला तर त्यांच्या स्वप्नांना पंख फुटू लागतात आणि नवं आभाळ स्पष्ट दिसू लागतं. हा हिरा त्यातलाच ! अर्थात पुढे जाऊन कधी खूप हसू आणि कधी एकमेकांवर चिडू सुद्धा. माणसाचा माणसाशी संबंध आला म्हणजे अगणित भावना आल्याच. पण त्याचे गतिरोधक ओळखायला शिकू. त्याला आयुष्याचा पार्टनर म्हणून निवडण्याआधी मी प्रामाणिकपणे त्याच्यातल्या ९०% भावनिक आणि प्रॅक्टिकल माणूस पडताळून पाहिला. उरलेले १०% हे कोणत्याही माणसात परिस्थितीनुसार घडणारे बदल असतात.

पण ५ वर्षाच्या मोठ्ठ्या काळानंतर एक मोठ्ठा लग्न करण्याचा निर्णय धडाडीने घेतला. दोघांनी सोबत राहण्याचं वचन दिलं तसचं एकमेकांच्या कामांना आदर देण्याचं आश्वासनही दिलं. लग्न झालं म्हणून दोघांपैकी कुणाचेही अस्तित्व पुसले जाईल अशा प्रथांना प्रोत्साहन न देण्याचा निर्णय घेतला आहे. “हे नातं जेवढं माझं असणार, तेवढंच त्याचं” याची उघड्या डोळ्यांनी मी खात्री केली. ती प्रत्येक प्रेमात पडणाऱ्या मुलीने करावी आणि अर्थात त्या प्रेमाची, नात्याची जबाबदारी घ्यावी. जसं मी नेहमीच म्हणत आले, लग्न हे दुसऱ्या जन्मासारख असतं. तशीच ही सुरुवात असणार आहे. अनेक नवीन बदल, नवं सुख, नवी नाती, नवी आव्हानं आणि अनेक यशस्वी अयशस्वी प्रयत्न ! पण या साथीने आयुष्यात नवीन स्वप्न पाहून पूर्ण करण्याची उमेद एकमेकांत निर्माण करू.

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *