बिर्याणीच्या नेहमीच्या सगळ्या स्टेप फॉलो करून फोडणी पासून मसाल्यापासून ते दम लावण्यापर्यंत सगळं फॉलो केलं. पण यावेळी बिर्याणीला चवच आली नाही. खूप आपण त्या सुगरणीची तारीफ केलेली असते. पण एखादा हक्काचा आणि तिचा हातखंडा असलेला पदार्थच नेमकं गंडतो आणि अपेक्षा भंग होतो.
पण म्हणून ती सुगरण नाही असं सिद्ध होत नसतं.
तसचं आज नागराजचा घर बंदूक बिरयाणी चित्रपट पाहताना वाटलं.
नागराज मंजुळे एक ब्रँड बनला आहे. त्यांचे चित्रपट येण्याची कुणकुण जरी लागली तरी लोक उत्सुक होतात. तरुणाईतून तिशी पस्तिशीकडे जाणाऱ्या तरुणवर्गात चर्चांना उधाण येतं. गावाकडून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे तरुण तरुणी आपला माणूस म्हणून मंजुळेंकडे आशेने पाहतात. याचे कारणही तितके दांडगे आहे. कुठलाच सिनेमाचा लवलेश नसलेल्या घरात जन्मुन केवळ सामाजिक खदखद पाहिलेला कलाकार जेव्हा सैराट लेव्हलला राज्य करतो तेव्हा तो आपला वाटू लागतो.
पण अशा एखाद्या माणसाने हक्काच्या लोकांच्या मनात घर केलं की पुढच्यावेळी मात्र मोठं अपेक्षांचं आणि जबाबदारीचे ओझं नकळत त्याला जोडून येतं आणि कधीकधी लोकांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. कारण पुन्हा तेच, त्या व्यक्तीने त्याच्या नजरेतून, दृष्टिकोनातून आणि वैचारिक सबलतेतून सिनेमा घडवलेला असतो, लोकांच्या नाही.
जर नागराज मंजुळे हे नाव या चित्रपटामागून काढून टाकले, तर हा चित्रपट प्रामाणिकपणे २०% लोकांशिवाय कोणी पाहिला नसता. नागराज मंजुळे यांची मुलाखत पाहताना त्यांच्या नजरेतला केलेला सिनेमा वेगळा आणि पडद्यावर आलेला सिनेमा वेगळा वाटतो. मंजुळे स्वतः या मुलाखतीत म्हटले की हा सिनेमा मी करणार नव्हतो, आकाश ठोसरसाठी हा सिनेमा अप्रोच झालेला. हा सिनेमा अर्थात नागराज मंजुळे यांचा नाही, हे सिनेमा पाहून तुम्हीही म्हणाल. या फिल्म प्रमोशन वेळी सयाजी शिंदे म्हणाले, प्रत्येक विषय गांभीर्याने मांडावा असे नाही, तो व्यंग्यात्मक विनोदी पद्धतीने मांडता येतो, हे घर बंदूक बिर्याणी दाखवून देते. पण मला वैयक्तिक पातळीवर विनोदाचा टायमिंग चुकला असे वाटले. त्यात ॲक्शन सीन तर अवास्तव लांबवले.
चित्रपटाला तगडे कथानक नसल्यामुळे केवळ जंगलातून सुरू होऊन जंगलातच गुडूप झालेला हा चित्रपट मनोरंजन, आशय, विषय या तीनही गोष्टीत सिनेप्रेमी म्हणून माझ्या मनात अपयशी ठरला. चित्रपट केव्हा संपतोय यार, असा प्रश्न जेव्हा मागच्या सिटवरच्या प्रेक्षकाने विचारला, तेव्हा हाच प्रश्न अनेकांच्या मनात सुरू असेल म्हणजे चित्रपट सपशेल पसंतीस उतरला नाही.
पण यात थोडासा दिलासा नागराज हिरो रुपात समोर आल्यामुळे फ्रेश चेहरा वाटतो. आकाश ठोसर आणि सायली पाटील यांची १० मिनिटं लव्ह स्टोरी सुखद वाटते. सयाजी शिंदे यांनी चित्रपटाला काही प्रमाणात विनोदी करण्याचा प्रयत्न केला, तिथे थोडा हसायचा चान्स मिळाला तेवढं दिलासादायक!
तुम्ही म्हणाल, याआधी नागराज यांनी फॅन्ड्री, सैराट, नाळ, झुंड असे वेगळे चित्रपट दिले. त्या सामाजिक साच्यातून बाहेर पडून “आता चालच बिघडवायची” हे ते म्हणताय खरंय!
पण मला वाटतं, त्यांना खरं सांगायला हवे, आरसा दाखवायला हवा. कलाकार जेव्हा अविश्वसनीय कला निर्मिती करतो, तेव्हा त्याला उचलून घेतलं पाहिजे. तेवढंच त्याची कला आवडली नाही तर त्याला सांगायला हवे. प्रेक्षकांना काय आवडते, काय नाही हे पोहचायला हवे.
जेणेकरून जे अस्खलित असेल तेच मनोरंजन लोकांच्या मनावर राज्य करेल आणि तसेच चित्रपट बनवण्याचे काम नव्या काळाच्या दिग्दर्शकांकडून होईल आणि मनोरंजन आणि कलेचा दर्जा ढासळणार नाही.
पण असे अपेक्षाभंग व्हावेत, जेणेकरून लोकांना अपेक्षा ठेवून थिएटरात जाण्याची गरज नसेल आणि जे पाहायला मिळेल ते सरप्राइज राहील, या चित्रपटाच्या शेवटी जसं तो राजकीय चेहरा सरप्राइज म्हणून राहिला आहे अगदी तसं.
या पूर्ण लेखावर नागराज मंजुळे एका वाक्यात उत्तर देतात, हा सिनेमा कोणाला आवडेल, कुणाला आवडणार नाही. पण असही या जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी सगळ्यांना आवडेल.
पूजा ढेरिंगे