अरेंज प्रेम

तो असा समोर बसलाय …
काय बघतोय देव जाणे ! पण मगाचपासून बिंदास्त स्कॅनिंग चालू आहे, माझ्या शरिराला कुणी असं बघावं अशी वेळ आली नव्हती. मी घाबरले नव्हते, अशी ताणताण उठेल नि त्याला विचारेल, की ‘काय बघत आहात काही प्रॉब्लेम आहे का?’
पण नाही… कोणी बघायला आल्यावर असं नाही ना बोलत… ?
काही माणसं न सांगता बघतात. त्यांना बोलता येतं. पण लग्नासाठी सांगून बघतात, त्यांना नाही नं बोलता येत ?
तो अकरावा मुलगा होता, बघण्यासाठी आलेला. त्यामुळे घरचे आधीच खूप त्रस्त होते.
‘आता मिळेल तसा मुलगा स्वीकारायचा, तू नाही बोलायचंच नाही. त्याच्या होकाराची फक्त वाट पाहायची. ‘हा सूर एव्हाना माझ्या अंगवळणी पडला होता. त्यामुळे दोन मिनटांपूर्वी ‘तो असा का बघतोय’ म्हणून पडलेलं सुतक वॉशरूमला जाऊन आल्यावर संपलं…
पण पुन्हा तेच …
केस मोकळे सोडले की तो बघतोय. मग मी हळूच लाजून, हाताने पुढे आलेली ती कुरुळी बट मागे घेते. हे थोड्यावेळासाठी तर मलाही रोमॅंटिक वाटत होतं. पण त्याची नजर माझ्या नाजूकश्या वाफेसारख्या तरळणार्या केसाच्या बटेकडे होती? तो ‘दुसरीकडेच’ बघत होता. अर्थात त्याच्या अशा बघण्याने माझ्यावर होणार्‍या परिणामांच त्याला सुतक नव्हतं, तो आकंठ बुडालेला होता ‘बघण्यात’… विस्फोटक विचारांनी माझा तोल जाऊ नये आणि कदाचित माझ्या दृष्टिकोनामुळे मला तसे वाटत असेल,
म्हणून मी पुन्हा हळूच लाजण्याचा बहाणा करून वॉशरूमला गेले, स्वतःला हे विचारण्यासाठी की तो खरेच योग्य आहे माझ्यासाठी ?
.
आमच्या मागे वाजणारी धून बंद झाली होती, त्याने समोरुन प्रश्न केला.
‘चहा की कॉफी?’
विचारांच्या ओघात कॉफी मागवायची असून मी चहा मागवला…
त्या रेस्टोरेंटच्या बाहेर बिलकुल शुकशुकाट होता. सगळीकडे दमट आणि अंधुकसं वातावरण होतं. मावळतीला पिवळसा रंग पसरलेला होता. थंडीच्या दिवसात रात्रीच्या वेळी चहा-कॉफी प्यायला येणारे आणि ऑफीसची घोड-दौड करून आलेले असे मोजकेच लोक होते.
नखांची नेलपेंट काढण्यात मी मग्न होते.
‘तू एरवीसुद्धा शांतच असते का?’ त्याने प्रश्न केला.
यावर मी त्याला विचारू का, तुम्ही एरवीसुद्धा असेच रोखून खालून वर बघता का …?
पण त्याला माझ्या उत्तराशी कर्तव्य नव्हतं, त्याने नवीन विषयाला हात घातला…
बघ… मी आधीच सगळ सांगून टाकतो, ‘माझी एक गर्लफ्रेन्ड आहे. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. लग्नानंतरही हे असंच असेल.’
माझ्या चेहऱ्यावरचे भाव बदलत नाहीत. तो स्वतःतच गुंतुन सगळं एकसकट सांगत असतो …
‘आम्ही लग्नही करणार होतो, पण यू नो ना, जुन्या काळातले लोक. त्यांना एक सभ्य महाराष्ट्रीयन मुलगी लागते आणि त्यात तुझ्या वडलांचे आणि पपांचे खास संबंध. मग ठरलं हे सगळं. पण यात माझी चुक नाही, त्यांच्या आग्रहाखातर मी हे लग्न करणार आहे, त्यापेक्षा एक कर ना तूच नकार कळव…’
.
दोन मोठ्ठ्या श्वासांचे घोट घेऊन मी कणखर होत,
‘आपल्याला निघायला हवं ….’ म्हटलं.
‘चल मी तुला सोडतो …’ त्याने उगाच म्हणायचे म्हणून म्हटलं.
नाही, नको… मी जाईन.
‘बाय… सी… यु सून’ म्हणत त्याने मला मिठीत घेऊन बाय करण्याचा सहज प्रयत्न केला, मी विचारांच्या घोळक्यात अडकलेली असताना त्याने ती संधीही पुरेपुर घेतली.
.
बाय 🙂
.

इतका वेळ आवंढा गिळून बसलेली मी चालायला लागले. अंगात त्राण होता माझ्या एरवी कशातही थरथरून रडणारी मी, बाहेर येऊन एकट्यातही खूप रडणार होते मी. पण मला खरेच रडू येईना.
‘मी रडावं का?’ किंवा ‘का मी रडावं ? आणि तेही अशा व्यक्तीसाठी? ‘ या प्रश्नांची उत्तरं मी शोधत होते…
‘मी मूर्ख होते का ? एवढं होऊनसुद्दा होकाराची अपेक्षा करत होते.’
दोन दिवसांनी त्याच्या बाजूने होकार मिळाला.
लग्न ठरलं. सगळे खुश होते.
…….
त्या कॉफीच्या भेटीनंतर आयुष्यातल्या प्रेम नावाच्या खोचक, निरर्थक कल्पनेने माझा खात्मा केला होता, दुसरीचं प्रेम स्वतच्या आयुष्यात तसंच ठेवणारा तो खरंच महान होता ? असावाच… कारण कधी कोणत्या काळी तिलाही त्याने वचन दिलं असेल की, आपलं प्रेम आयुष्यभर जपेल मी, कसं ते नव्हतं ठरलं.
त्यामुळे माझा त्यात काडीचाही सहभाग नव्हता, ना त्याच्या आयुष्याच्या कल्पनेत मी कधी होते, त्याच्यासाठी त्याच्या घरच्यांना एक महाराष्ट्रीयन मुलगी मिळणार होती, त्याच्यासाठी लग्नाच्या फेरीत घरच्यांच्या दबावाने अडकलेला तो सुहागरातची रात्रही दबावाने पार पाडेल, नि त्या रात्रीपुरता आमचा संबंध इतका जवळचा येईल, त्यानंतरची पुढची संपूर्ण वर्षे ही त्या कॉफीच्या भेटीत ठरल्याप्रमाणे होतील.
केवढे खुश होते सगळे.
घरातल्यांच्या डोक्यावरच ओझं हलकं झालं म्हणून मीही खुश होते.
‘खुश होते मी ?’
हो 🙂

Please follow and like us:
error

4 thoughts on “अरेंज प्रेम”

  1. छान गोष्ट…
    आता लग्नानंतर त्याच कॉफी टेबलावर तो आपल्या girl friend ला भेटणार.. आणि ह्याबायकोची घुसमट वाढत राहणार… प्रत्येक स्त्री कडे घुसमट करून घेण्यापासून आपली सुटका करण्याची पात्रता असतें… ते सुद्धा post मध्ये येऊ दे..
    गोष्ट सशक्त लिहा…

    1. पुढे घडणाऱ्या गोष्टी आणि घुसमट ही क्षणोक्षणी असते, तिच्या त्या प्रत्येक क्षणांची नोंद करताना मी खूप सहज काही नाजूक क्षण मिस करेल, खूप मोठी चूक असेल ती. काही गोष्टी वास्तविक असतात. त्यामुळे जितके वाढवत जाणारं त्याची तीव्रता कमी होणार असा माझा अनुभव असल्यामुळे खूप लांबवले नाही. तरीही पुढच्या वेळी हा प्रयत्न करून पाहिल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *